श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ अखेरची कविता… – लेखक : श्री मंगेश मंत्री ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

१४ डिसेंबर, १९७७ रोजी ‘आधुनिक वाल्मिकी’ असा गौरव झालेल्या गदिमांचे अचानक देहावसान झाले. त्यांचे चिरंजीव शरतकुमार यांनी गदिमा व त्यांचा काळ रेखाटणारे ‘कळशीच्या तीर्थावर’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘ब्लू बर्ड’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील माडगूळकरांच्या अखेरच्या कवितेची ही हेलावून टाकणारी हकीकत.

रात्रीचे आठ वाजून गेलेले होते. टेलिफोनची बेल खणखणली. आपल्या दुखऱ्या छातीवर एक हात धरून पप्पांनी रिसीव्हर उचलला. मघापासून बाहेर येऊ पाहणारी खोकल्याची उबळ थोपवत त्यांनी रिसीव्हर कानाला लावला, ”हॅलो…! ”

दुसरीकडून आवाज आला, ”हॅलो, स्वामी आहेत काय? मी पी. एल. (पु. ल. देशपांडे) बोलतोय. ”

”बोला बोला! काय खबरबात? ”

”तुमची तब्येत कशी काय? बरेच दिवसांत गाठभेट नाही. ”

”आमच्या तब्येतीची रडकथा नेहेमीचीच आहे. नवीन काय काढलंत? ”

”गेल्या महिन्यात बाबा आमट्यांची गाठ पडली होती. त्या उभयतांनी तुमची खूप आठवण काढली. म्हणाले, ‘कविश्रींचे पाय अजून ‘आनंदवना’ला लागले नाहीत. एकवार त्यांच्या येण्याचा योग घडवून आणा. ‘ तिथं बाबा आणि साधनाताई यांनी एक ‘आनंदमेळावा’ योजला आहे. ”

”त्या थोर पुरुषाचं आमंत्रण कशाला पाहिजे? माझी फार इच्छा आहे येण्याची. पण प्रकृतीनं इथं अगदी जायबंदीच करून ठेवलंय मला. ”

”बाबांनी तुमच्याकडं एक मागणी केलीय. ‘आनंदमेळ्या’साठी त्यांना एक गाणं लिहून पाहिजेय तुमच्याकडून. तुमच्या वतीनं मी होकार देऊन बसलोय. मग कधी देताय? ”

”पीएल्, माझी प्रकृती धडधाकट असती तर तुला मी फोनवरसुद्धा ओळी सांगितल्या असत्या. प्रयत्न करतो. त्या महात्म्याला नकार देणं महाकर्मकठीण. ”

”उदईक सेवकास धाडतो, लेखनाचा कागुद आणण्यासाठी. ”

संभाषण संपलं. रात्रीत जागून पपांनी एक सुरेखसं गाणं लिहिलं. नव्या पिढीचं प्रतीक म्हणून ‘बालतरूची पालखी’ काढण्याची बाबांची अभिनव कल्पना पपांना इतकी आवडली की, त्यांनी त्याला साजेसं गीत सहज लिहून हातावेगळं केलं. इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी फोनवरच ते पी. एल्. देशपांड्यांना ऐकवलं. मुखडा ऐकताच पी. एल्. ची कळी खुलली. ते गाणं होतं नवागताच्या स्वागताचं :

*

कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा

भूषवी अंगणा येऊनिया।

*

माणसाची प्रीती घेई रे संगती

मानाचा अतिथी आमुचा तू।

*

श्यामसुंदराच्या देहुड्या ढंगात

येइ या घरात आनंदाने।

*

आनंदाचा नाद मंजुळ संगीत

शाखापल्लवात घेऊनी ये।

*

कोवळ्या पानात तुझिया नवीन

सूर्याचे किरण नाचू देत।

*

वनाचा वल्लभ नाचताहे वारा

देई उपहारा गीताचा त्यां।

*

वर्षतो श्रावण आशीर्वाद त्याचा

मुकुट माथीचा होवो तुज।

*

इंदपुरीतून धारा वर्षताती

पडू दे त्या माथीं पानांवर॥

*

पपांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे शेवटचंच गीत. या गाण्यासाठी त्यावेळी आग्रह धरणाऱ्या पी. एल्. ना मात्र या अदृष्टाची यत्किंचितही चाहूल नसावी. अवघ्या चार-पाच दिवसांनी असं काही घडेल आणि पपांचा अखेरचा निरोप घ्यावा लागेल, अशी पुसटशीही जाणीव त्यांना शिवलेली नसावी.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : श्री मंगेश मंत्री

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments