श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘वाहे गुरु :: गुरु नानकदेव – –’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
(आज कार्तिक पौर्णिमा. शीख धर्माचे प्रवर्तक श्री गुरु नानक यांची ५५६ वी जयंती. त्यानिमित त्यांचे हे पुण्यस्मरण!)
गुरु नानकदेव
(जन्मः १५ एप्रिल १४६९ – – मृत्यूः २२ सप्टेंबर १५३९)
प्रास्ताविक
‘शीख’ म्हणजे ‘शिकवण’, ‘शिकणारा’. शीख धर्म हा जगातील सर्वात तरुण धर्म आहे. याला हिंदु धर्माचाच एक उपपंथ म्हणता येईल. याचा उगम भारतीय उपखंडातील पंजाब प्रदेशात १५ व्या शतकाच्या अखेरीस, अतिरेकी, रानटी, कर्मठ, जिहादी, इस्लामच्या धार्मिक छळातून मुक्त होण्यासाठी विकसित झाला. हिंदु धर्मातील अतिरेकी आणि छळवादी प्रथा- परंपरा श्रद्धा यांपासून मुक्त होण्यासाठीही या काळात अनेक लोक हिंदू आणि मुसलमान या नव्याने स्थापन झालेल्या धर्मात धर्मांतरित झाले.
पुढे भारतातील मुघल सम्राटांनी खालील दोन शीख गुरूंचा अनन्वित छळ केला, त्यांना मृत्युदंड दिला कारण काय तर त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला!
१ गुरू अर्जन (१५६३-१६०५) आणि
२ गुरु तेग बहादूर (१६२१-१६७५)
इस्लामिक काळात झालेल्या शिखांच्या अत्यंतिक क्रूर, अमानुष छळामुळे अखेर १६९९ मध्ये दशमगुरू गोविंद सिंग यांनी याच शीख धर्मातून ‘खालसा’ या जहाल, अति आक्रमक पंथाची स्थापना केली. या विशिष्ठ पंथाच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे हिंदूचे, हिंदुधर्माचे रक्षण करणे. या पंथातील सदस्यांना “संत-सिपाही” म्हणजे ‘संत वृत्तीच्या व्यक्तींनी सैनिकाचे गुण धारण केलेले सदस्य’ असे म्हटले जाते.
खालसा पंथातील ‘माझा ‘निर्भय संत सिपाही’ हजारोंच्या गर्दातूनही उठून दिसला पाहिजे’ म्हणून गुरु गोविंद सिंहजीने त्याला विशिष्ठ वेशभूषा धारण करायला सांगितले. केस, कृपाण, कच्छा, कंगी किंवा कंगवा, कडे हे पाच ‘क’ कार धारण करणारे आणि माथ्यावर वाढलेले केस आणि ते अच्छादित करण्यासाठी, झाकण्यासाठी धारण केलेली पगडी असे, समाजात कुठूनही उठून दिसणारे शीख बंधू ते हेच खालसा संत सिपाही!
चला तर, या मूळ शीख धर्माविषयी, त्याच्या प्रवर्तकाविषयी थोडक्यात माहिती करून घेऊन, त्यांच्या पुण्यस्मृतींस कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण अभिवादन करूया!
शीख धर्माचे आदिगुरु नानक – जन्म व बालपण
शीख धर्माचे प्रवर्तक व आद्य गुरू नानकदेव त्यांचा जन्म लाहोर जिल्ह्यातील ‘तळवंडी’ (सध्या पाकिस्तानमधे आहे) या गावी वेदी शाखेच्या एका खत्री (क्षत्रिय) हिंदू कुटुंबात, कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौणिमेला, १५ एप्रिल १४६९ साली झाला. (तळवंडी गावाला आता ‘नानकाना साहिब’ ह्या नावाने ओळखले जाते.) त्यांच्या आईचे नाव ‘त्रिपताका’ व वडिलांचे ‘काळूचंद’ होते.
नानकदेव एकुलते एक पुत्र असल्यामुळे लाडात वाढले. वडील काळूचंद वेदी हे शासकीय पटवारी होते. नानकदेवांचे शिक्षण घरीच झाले. लहानपणी ते गणित, हिंदी, अरबी, फार्सी ह्या भाषा शिकले. वेद व कुराणाचेही त्यांनी अध्ययन केले. ते बुद्धीने कुशाग्र होते. बालपणापासूनच त्यांची वृत्ती सात्त्विक व धार्मिक होती. त्यांचा बहुतेक वेळ साधुसंतांच्या व फकिरांच्या सहवासात आणि एकांतात बसून चिंतन करण्यात जाई.
वडिलांना त्यांची ही विरागीवृत्ती आवडत नव्हती. गुरे चारणे, शेत राखणे इ. कामे त्यांनी नानकांना दिली, तरी त्यांची वृत्ती पालटली नाही. त्यांचे मन लौकिक व्यवहारात, संसारात रमावे म्हणून त्यांनी नानकांचा विवाह वयाच्या अठरा वर्षी (१४८७) ‘बटाला’ येथील ‘मूलचंद खत्री’ यांच्या ‘सुलखनी’ या कन्येशी करून दिला. त्यांना सुलतानपूर येथील शासकीय धान्यकोठारावर (मोदीखाना) नोकरीस लावून दिले. यथावकाश नानकदेवांना ‘श्रीचंद’ व ‘लक्ष्मीदास’ असे दोन पुत्र झाले. त्यांनी नोकरी व्यवस्थितपणे केली, लौकिक अर्थाने संसारही ‘नेटका’ केला. तरीही त्यांचे मन परमार्थाकडेच धाव घेत राहिले. ते सदा ईशचिंतनात मग्न असत. प्रत्यही सकाळी उठून ते जवळच्या ओढ्यावर स्नानास जात व नंतर काठावर येऊन प्रार्थना, ध्यानधारणा करत.
ज्ञानप्राप्ती
एके दिवशी नित्याप्रमाणे ते स्नानानंतर जवळच्या एका गुहेत जाऊन ध्यान करू लागले. बघता बघता त्यातच त्यांची समाधी लागली. समाधी अवस्थेत त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला, दिव्य ज्ञानमार्ग दिसला. ह्या दिव्य मार्गानुसार उपदेश करण्यासाठी, समाजातील लोकांचे दुःख दूर करण्यासाठी ते गुहेतून बाहेर पडले.
गुहेतून बाहेर येताच ते ‘कोणी हिंदूही नाही व कोणी मुसलमानही नाही’ असे उच्चरवाने लोकांना सांगू लागले. हिंदु-मुस्लिम हे भेद खरे नसून सर्वजण प्रथम मानव आहेत व सर्वजण त्या एकमेव परमेश्वराची लेकरे आहेत असे त्यांचे म्हणणे असे. त्यांनी आपल्या या नव्या धर्मकल्पनेत पुढील पाच तत्त्वांच्या आचरणावर भर दिला:
१) नाम व गान : ईश्वराचे नामस्मरण करून त्याचे गुणगान करणे.
२) दान : सर्वांना दानधर्म करणे.
३) अश्नान (स्नान) : प्रत्यही प्रातःकाळी स्नान करून शुचिर्भूत होणे.
४) सेवा : परमेश्वराची व मानवाची सेवा करणे.
५) सिमरन (स्मरण) : आत्मसाक्षात्कारासाठी, ईश्वरी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्याचे अखंड नामस्मरण करणे, त्याची कारुण्यभावे प्रार्थना करणे.
धर्मस्थापना व धर्मप्रचार
ईश्वरी साक्षात्कार व दिव्य ज्ञानप्राप्तीपश्चात यांनी शासकीय सेवा सोडून दिली आणि सद्धर्मप्रचारार्थ घराबाहेर पडले.
साक्षात्कारानंतर (१४९७) पासून दोन तपे त्यांनी चार प्रदीर्घ यात्रा केल्या. यात्रांमध्ये त्यांनी विविध धर्मांच्या अधिकारी व्यक्तींशी, साधुसंतांशी, फकिरांशी, योग्यांशी, सूफींशी चर्चा, विचारविनिमय, संवाद केले. विविध चालीरीती, रूढी, परंपरा श्रद्धांचा परिचय करून घेतला. अहितकारक दुष्ट रूढींविरुद्ध प्रचार करून त्यांच्या निर्मूलनाचेही प्रयत्न केले.
देशाटन, पंडितमैत्री, लोकसंग्रह
त्यांनी केलेल्या चार प्रदीर्घ यात्रा :
१) पूर्वेकडील यात्रा (१४९७ ते १५०९) : बांगलादेश व ब्रह्मदेशापर्यंत.
२) दक्षिणेकडील यात्रा (१५१० ते १५१५) : श्रीलंकेपर्यंत.
३) उत्तरेकडील यात्रा (१५१५ ते १५१७) : हिमालय व तिबेट, चीनपर्यंत.
४) पश्चिमेकडील यात्रा (१५१७ ते १५२१) : मध्यपूर्वेतील इराक, इराण, मक्का-मदीना, बगदाद, अफगाणिस्तान पर्यंत.
या देशाटनात त्यांना सहस्रावधी लोकांशी, विविध धर्मपंडितांशी, साक्षातकारी महापुरुषांशी, साधु – सन्यासी – बैगाग्यांशी, विचारवंतांशी संपर्क साधता आला.
गायक नानक
नानकदेवांचा कंठ मधुर होता. त्यांना भारतीय शास्त्रीय संगिताचेही चांगले ज्ञान होते. स्व-रचित उत्स्फूर्त भजने ते विविध रागदारीत आपल्या मधुर वाणीने आळवीत. त्यांची भक्तीने ओथंबलेली भजने ऐकण्यासाठी अनेक लोक जमत. ते स्वतःला नानकदेव म्हणवून घेण्यापेक्षा त्यांना ‘गायक नानक’ म्हणून घेणे अधिक प्रिय वाटे, संगितकलेवर त्यांचे अतोनात प्रेम होते! तळवंडी येथील ‘मर्दाना’ नावाचा एक मुसलमान नानकदेवांच्या भजनात त्यांना ‘रबाब’ वाद्य वाजवून साथ करीत असे. तोच त्यांचा पहिला अनुयायी होय.
नवा गाव कर्तारपूर
चौथ्या यात्रेहून परतल्यावर (१५२१) त्यांनी रावी नदीच्या पूर्व तटावर ‘कर्तारपूर’ नावाचे एक नवीन गाव वसविले. तेथे ते स्वतः नांगर चालवून शेती करू लागले. सकाळ – संध्याकाळचा त्यांचा वेळ कीर्तन, भजन, निरूपण व धर्मोपदेश यांत व्यतीत होई. त्यांना तेथे अनेक अनुयायी लाभले. त्यात हिंदू प्रमाणे मुसलमानही होते. त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य तेथेच आपल्या कुटुंबियांसमवेत व अनुयायांसमवेत व्यतीत केले.
अवतार विसर्जन
मृत्युची चाहूल लागताच त्यांनी आपला पट्टशिष्य ‘भाई लेहणा’ याचे ‘अंगद’ असे नामकरण करून त्याला आपला वारस नेमले. ‘अंगद’ म्हणजे ‘स्व-शरीराचा भाग’. १५३९ मध्ये त्यांनी आपली ज्ञानतपस्याज्योती अंगददेव यांच्या देहात स्थापित करून देहत्याग केला. हिंदू आणि मुसलमान अनुयायांनी त्यांच्या मृत देहावरील वस्त्र अर्धे अर्धे वाटून घेतले आणि आपापल्या धर्मांनुसार त्यावर अंत्यसंस्कार केले. मधे एक आडवी भिंत उभारून दोन्ही समाजांनी गुरु नानक देवांचे कर्तारपूर येथे स्मारक उभारले.
ग्रंथसाहिब, जपुजी, मूलमंत्र
ग्रंथसाहिब ह्या शीख धर्मग्रंथात नानकदेवांची एकूण ९४७ पदे आहेत. या ग्रंथात आरंभी ‘जपुजी’ म्हणजे ‘ईश्वर चिंतन’ या नावाचा ३८ कडव्यांचा एक भाग आहे. तो पंजाबी भाषेत रचला आहे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरकृत ‘ हरिपाठा’ला आणि समर्थांच्या ‘ मनोबोधा’ ला जसे महत्व आहे तसेच शीख धर्मात या ‘जपुजी’ ला महत्व आहे. उदात्त सौंदर्य व दार्शनिक, आध्यात्मिक समृद्ध आशय यांचा उत्स्फूर्त काव्याविष्कार त्यात दिसून येतो. जपुजीची संहिता प्रत्येक शीख व्यक्तीच्या घरी नित्यनेमाने म्हटली जाणारी प्रातःप्रार्थना झाली आहे.
जपुजीच्या आरंभी ‘मूलमंत्र’ नावाचे लहानसे स्तोत्र आहे. त्यात ईश्वराच्या स्वरूपाचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. उर्वरित जपुजीत याच मूलमंत्रातील प्रमुख विषयाचा विस्तार आहे.
याखरीज ‘सिधगोष्ट’ अर्थात् ‘सिद्धांशी वा योग्यांशी संवाद’, ‘अशदीवार’, ‘बारमाह’ म्हणजे ‘बारा महिन्यांचे गीत’ इ. रचना आहेत. ह्या सर्व काव्यरचना त्यांनी संगीतातील विविध रागांत निबद्ध केलेल्या आहेत.
उत्तमोत्तमाचा स्वीकार
त्यांनी इस्लाम धर्मामधील एकेश्वरवाद, ख्रिस्तीधर्मातील ईशकृपेची कल्पना आणि हिंदूधर्मातील आत्म्याच्या अमरत्वाची कल्पना यांचा आपल्या शीखधर्मात स्वीकार केला आहे.
‘यदायदाहि धर्मस्य…. संभवामि युगेयुगे’ या गीतावचनाप्रमाणे आवश्यकतेनुसार ईश्वर पृथ्वीवर मानवरूपात अवतार घेतो ही हिंदूंची अवतार कल्पना मात्र त्यांना मान्य नाही.
समारोप
एक शांतीदूत, प्रेम व विश्वबंधुत्वाचा पुरस्कर्ता, मानवतेचा पूजक म्हणून नानकदेवांनी केलेले कार्य व स्थापित केलेला शीख धर्म महत्त्वपूर्ण आहे. त्या माध्यमातून त्यांनी केवळ सदाचार संपन्न असा नवा धर्मच स्थापन केला नाही, तर उत्तर भारतातील जातिव्यवस्था, अस्पृश्यता, सतीची चाल, मूर्तिपूजा, पुरोहितवर्गाने लादलेले जाचक कर्मकांड, वाईट अनिष्ट रूढी इ. विरुद्ध सतत लढा देऊन सामाजिक क्रांतीही घडवून आणली.
संगत व लंगर
‘संगत’(धर्मसंघ) व ‘लंगर’(अन्नदान, अन्नछत्र) ह्यांचा त्यांनी पाया घालून त्यांद्वारे जातिधर्मातील भेदाभेद दूर करण्याऱ्या प्रत्यक्ष आचरणात्मक सामाजिक परंपरेस आरंभ केला. आजही समता व लोकशाही पद्धतीचा उत्तम आदर्श म्हणून ह्या दोन संस्थांचा उल्लेख अनिवार्य आहे.
गुरु नानकदेवांना शतशत नमन!!!!!
वाहे गुरु, वाहे गुरु ।
सतनाम वाहे गुरु l
(५ नोव्हें. २०२५ त्रिपुरी पौर्णिमा)
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








दिवाकर बोरसे सर,
गुरूनानक बद्दल छान माहिती मिळाली.फक्त एक शंका आहे.१५एप्रिलला त्रिपुरारी पौर्णिमा कशी काय?