श्री विश्वास विष्णु देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
रवींद्रनाथांची भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझ्या मते आपल्या भारताचं राष्ट्रगीत ‘ जन-गण -मन ‘ ही आहे. कारण रोज भारतातील लक्षावधी शाळांची सुरुवात या राष्ट्रगीताने होते. कोटी कोटी कंठातून हे राष्ट्रगीत निनादते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी ध्वजाला प्रणाम करताना जेव्हा राष्ट्रगीताचे सूर कानी पडतात, तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जाताना जेव्हा पडद्यावर राष्ट्रगीत सुरु होते, तेव्हा चित्रपटगृहात उपस्थित असलेली सगळी माणसे आपली भाषा, जात, धर्म, पंथ विसरून उभे राहून मानवंदना देतात, तेव्हा अभिमानाने रोमरोम फुलून येतो. कधी कुठे जाताना राष्ट्रगीताचे सूर कानी पडले तर नकळत पावले थांबतात. उभे राहा असे कोणी सांगावे लागत नाही. केवळ ५२ सेकंदात गायिले जाणारे हे राष्ट्रगीत रोमरोम पुलकित करते. जोपर्यंत हे सूर्य चंद्र आहेत, जोपर्यंत ही सस्यश्यामल भारतभूमी अस्तित्वात आहे, तोपर्यंत जन-गण-मन आहे आणि जोपर्यंत जण-गण-मन आहे, तोपर्यंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरही अमर आहेत.
अशा या जन-गण-मन आणि रवींद्रनाथ टागोरांवर काही लोकांनी नको ते आरोप केले. ज्या रवींद्रनाथांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली, स्वदेशीच्या चळवळीत पुढाकार घेतला, वंगभंगाला विरोध केला अशा देशभक्त आणि राष्ट्रभक्त रवींद्रनाथांना इंग्रजधार्जिणे म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. तर काहींनी याच्याही पुढे जाऊन त्यांनी लिहिलेले जन-गण-मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिले असे म्हटले. या सगळ्या गोष्टींमुळे रवींद्रनाथांच्या संवेदनशील मनाला अपार वेदना झाल्या.
१९११ साली इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारतभेटीवर येणार होता. याच सुमारास वंगभंगाचा निर्णयही रद्द ठरवण्यात आला होता. तेव्हा तो आनंद साजरा करावा आणि पंचम जॉर्जचे स्वागत करावे असे ठरवण्यात आले. इंग्रज सरकारप्रती आपली निष्ठा अर्पण केलेले प्रद्योतकुमार ठाकूर हे रवींद्रनाथ टागोरांचे दूरच्या नात्यातील होते. प्रद्योतकुमार हे उच्चविद्याविभूषित होते पण इंग्रजांची चाकरी करण्यात धन्यता मानणारे होते. त्यांनी रवींद्रनाथांना पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी एक गीत लिहायला सांगितले. या गोष्टीचा रवींद्रनाथांना धक्का बसला आणि वाईटही वाटले. ब्रिटनचा स्वार्थावर आधारित राष्ट्रवाद त्यांना मान्य नव्हता. आपल्या प्रगतीसाठी दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून त्याचे स्वातंत्र्य नष्ट करणे हे रानटीपणाचे लक्षण आहे असे त्यांचे मत होते. यालाच जर ही मंडळी ‘ आधुनिक राष्ट्रवाद ‘ म्हणत असतील, तर राष्ट्रवाद या शब्दाची ही क्रूर चेष्टा आहे असे त्यांना वाटत होते.
इंग्रजांच्या चुकीच्या विचारांचा आणि धोरणांचा त्यांनी आपल्या भाषणातून आणि लेखनातून वेळोवेळी निषेध केला. त्यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतार्थ गीत लिहिण्यासाठी प्रद्योतकुमार यांना स्पष्ट नकार दिला. कोणी सांगितले म्हणून एखाद्याच्या स्तुतीप्रित्यर्थ आपली लेखणी झिजवणाऱ्या कवींपैकी रवींद्रनाथ नव्हतेच. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी पंचम जॉर्जला उद्देशून लिहिण्याऐवजी ‘ भारतभाग्यविधात्याला ‘ उद्देशून हे गीत लिहिले.
हा ‘ भारतभाग्यविधाता ‘ कोण हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला हा भाग्यविधाता म्हणजे केवळ एखाद्या भूप्रदेशावर आपले वर्चस्व असलेली पंचम जॉर्ज यांच्यासारखी एखादी व्यक्ती कदापिही शक्य नाही. रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला हा भाग्यविधाता म्हणजे सर्व सृष्टीचा ईश्वर ज्याला ते मास्टर निर्मिक किंवा मास्टर पोएट म्हणून वेगवेगळ्या वेळी उल्लेख करतात. त्याशिवाय रवींद्रनाथांच्या कवितेत वेळोवेळी असे निनावी व्यक्तिमत्व पाहायला मिळते. त्या शक्तीला त्यांनी जगन्नियंता किंवा विश्वाचे संचालन करणारी शक्ती अशा स्वरूपातच पाहिले आहे. उदा. मागील एका लेखातील या काव्यपंक्ती पहा. एका प्रसंगी त्यांनी पाहिले की शरदातले ढग निळ्या आभाळात विहार करताना खाली असलेल्या भाताच्या पिकावर छाया धरीत तरंगत होते. ह्या अद्भुत दृश्याचा त्यांच्या मनाने ताबा घेतला. त्यांना हे सुंदर दृश्य निर्माण करणाऱ्या कारागिरांच्या हातांची आठवण झाली. आपल्या कवितेत ते म्हणतात
खेळ चालिला आज लपंडावाचा
छाया आणि प्रकाशाचा
भाताच्या शेतातून,
झपाट्याने जाताना,
निळ्या आकाशात
तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांचा,
ताफा हाकणारा तो कोण आहे बरं?
या अदृश्य हातांचा शोध घेण्याची त्यांना नेहमीच उत्कंठा असायची. तोच त्यांचा ‘भारतभाग्यविधाता’ आहे.
भारतभूमीवर त्यांचे किती प्रेम आहे ते त्यांच्या एका कवितेच्या ओळींमधून स्पष्ट होईल. या ठिकाणी या ओळी लिहिताना मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची आठवण येते. रवींद्रनाथ म्हणतात
सार्थक जनम आमार जन्मेछि एइ देशे ।
सार्थक जनम मा गो, तोमाय भालबेसे ।।
जानि ने तोर धन रतन, आछे कि ना रानीर मतन ।
शुधु जानि आमार अंग जुडाय तोमार छायाय एसे ।।
‘या देशात जन्माला आलो म्हणून माझे सार्थक झाले. माते, तुझ्यावर प्रेम केल्याने माझा जन्म सार्थक झाला. तुझ्याकडे किती रत्नभांडार आहे, ते मला माहिती नाही. तू राणीसारखी आहेस का हेही ठाऊक नाही. मला फक्त एवढेच ठाऊक आहे की तुझ्या सावलीत मला शांती मिळते. ’
त्यांचं देशप्रेम इतकं उत्कट आहे की या देशात त्यांना विश्वदेवाचं दर्शन घडतं.
हे बिश्वदेब, मोर काछे तुमि देखा दिले आज कि बेशे ।
देखिनु तोमारे पुर्बगगने, देखिनु तोमारे स्वदेशे ।।
विश्वदेवाचे रूप त्यांना कसे भासते? तर नील गगन त्याचे भाल आहे. स्वच्छ प्रकाशात त्याला अखंड उज्ज्वलता प्राप्त झाली आहे. हिमालय जणू आशीर्वादरूपी कर उंचावून निर्भयतेचा वरदहस्त देत आहे. हा सागर त्याचे चरण धुतो आहे. जान्हवीरुपी हार त्याच्या वक्षावर रुळतो आहे. आपल्या देशातच आपल्याला परमेश्वराचे दर्शन होऊ शकते हेच जणू त्यांना सांगायचे आहे.
रवींद्रनाथांचे आप्त आणि इंग्रजांचे निष्ठावंत सेवक प्रद्योतकुमार ठाकूर यांनी त्यांना पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीपर गीत लिहिण्यास सांगितले होते. परंतु राष्ट्रप्रेम नसानसात भिनलेल्या रवींद्रनाथांनी अशा प्रकारचे स्तुतीपर काव्य लिहिण्यास नकार दिला. स्तुतीच करायची तर ती मायभूमीची का करू नये या भावनेतूनच त्यांचे जन-गण-मन हे अप्रतिम राष्ट्रभक्तीपर गीत त्याच वेळी जन्मास आले. २६ ते २८ डिसेंबर १९११ या कालावधीत कलकत्याला राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. २६ डिसेंबरची म्हणजे पहिल्या दिवसाची सुरुवात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम गीताने झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ डिसेंबर रोजी रवींद्रनाथांनी लिहिलेले जन-गण-मन गायिले गेले.
या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी देशविदेशातील पत्रकार उपस्थित होते. पण या ठिकाणी उपस्थित असलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी कार्यक्रमाबद्दल आणि जन-गण-मन या गीताच्या आशयाबद्दल पुरेशी माहिती न घेताच या गीताला पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी रचले गेलेले खास गीत असे म्हटले. या वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने इंडिया, स्टेटसमन, इंग्लिशमन या सारखी वृत्तपत्रे होती. यामुळेच या गीताबद्दल लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला.
पुढे २८ डिसेंबर १९१७ मध्ये कलकत्याला पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन भरले. या अधिवेशनात जन-गण-मन समूहगीत म्हणून गायिले गेले. त्याप्रसंगी देशबंधू चित्तरंजन दास उपस्थित होते. त्यांनी या गीताबद्दल ‘ It is a song of the glory and victory of India ‘ असे उद्गार काढले. बेंगाली वृत्तपत्राने या गीताला The Magnificent Song असे म्हटले. अमृतबझार पत्रिकेने या गीताला An Inspiring Patriotic Song म्हटले. स्टेटसमन या इंग्रजी वृत्तपत्राने मात्र या वेळी या गीताचे ‘ A National Song ‘ म्हणून वर्णन केले.
या गीताच्या संदर्भात रवींद्रनाथांनी २० नोव्हेंबर १९३७ रोजी पुलिनबिहारी सेन यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, ” त्या वर्षी भारतसम्राटाच्या आगमनाची तयारी चालली होती. राज्यसरकारमध्ये प्रतिष्ठित असलेल्या माझ्या एका मित्राने सम्राटासाठी स्वागतगीत लिहिण्याचा मला आग्रह करताच प्रथम मी चकित झालो आणि नंतर मनात क्षोभाची लाट उसळली. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून जन-गण-मन अधिनायक या गीतात त्या भारतभाग्यविधात्याचा जयजयकार केला. हा भाग्यविधाता पंचम, षष्ठ किंवा कुठलाही जॉर्ज कधीच असू शकणार नाही. हे माझ्या राजनिष्ठ मित्रालाही कळले, कारण तो कितीही प्रबळ राजभक्त असला तरी बुद्धिमान होता. आज मतभेदामुळे लोक माझ्यावर चिडलेत, हे काळजीचं कारण नाही; पण लोकांचा जो बुद्धिभ्रंश झालाय, ते लक्षण बरं नव्हे. ”
२४ जानेवारी १९५० या दिवशी घटना समितीने कविवर्य रवींद्रनाथ यांनी लिहिलेल्या ‘ जन-गण-मन ‘ या गीताला राष्ट्रगीताचे स्थान दिल्याचे जाहीर केले. २६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारताची राज्यघटना अधिकृतरीत्या अमलात आली आणि त्याच दिवशी स्वतंत्र भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘ जन-गण-मन ‘ चे स्वर निनादले. पण आज भारतीय स्वातंत्र्याला ७७-७८ वर्षे होऊन गेली तरी १९११ मध्ये लिहिल्या गेलेल्या या गीताबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहेत.
‘वंदे मातरम’ ला राष्ट्रगीताचा मान मिळायला हवा होता, हे मान्य केले तरी ‘ जन-गण-मन ‘ बाबत गैरसमज पसरवून आपण एका अत्यंत अप्रतिम राष्ट्रभक्तीपर साहित्यकृतीचा आणि रवींद्रनाथांसारख्या महाकवीचा अवमान करीत आहोत याचे भान आपण राखायला हवे.
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






