श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ मराठी ‘ झेंडे ‘ असे खाली का ओढले जातात? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
भारतीय चित्रपटसृष्टी आणि त्यातल्या त्यात हिंदी चित्रपटसृष्टीने पोलिसांची प्रतिमा अतिशय मलीन करून ठेवलेली आहे. मराठीत दादा कोंडके यांनी पोलिसांना पांडू हे नाव दिले आणि पुढे लोकांनी या पांडूचा मामाही करून ठेवला. हिंदीत काम करणा-या मराठी कलाकारांच्या भूमिका काय असतात हे सर्वच जाणतात… अहो, एक सौंदर्यवती मराठी अभिनेत्री काही वर्षे परदेशी राहून पुन्हा भारतात परतली… तर तिला पुन्हा सुरुवात म्हणून एका साबणाच्या की फरशी पुसण्याच्या रसायनाच्या जाहिरातीत चक्क कामवाल्या बाईची भूमिका करावी लागली..!
पोलिसांची लाचखोरी आणि इतर गैरवर्तन हा गंभीर मुद्दा असला तरी अनेक शूर, कर्तव्यदक्ष आणि अतिशय दर्जेदार कामगिरी करून दाखवलेल्या पोलिसांची, अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे का? मुंबईवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात काय चित्रपटातले कलाकार आले होते काय? कसाबला जिवंत पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनीच तळहातावर शीर घेतले होते! मानवत बाल हत्याकांड असो किंवा इतर शेकडो गुन्हे असोत, इंग्लंडच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना केले जाणारे आपले मराठी पोलिस दल आहे. असो.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई दौरा सुरु होता.. मुंबई पोलिस अर्थातच बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभे होते. पंतप्रधानांनी अचानक त्यांची गाडी थांबवायला सांगितले… आणि त्यांनी एका पोलिस अधिकारी साहेबांना जवळ बोलाववून घेतले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केलं… पंतप्रधान एका (प्रोटोकॉलनुसार) पदाच्या बाबतीत कनिष्ठ पदावर असलेल्या पोलिस अधिका-याशी एवढी सलगी कशी दाखवतील?
मुंबईच्या अधोजगतात त्यावेळी खूप दरारा असलेल्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर एका मोठ्या राजकारणी व्यक्तीचा याच पोलिस अधिकारी साहेबांना अगदी प्रेमळ फोन आला होता…. साहेबांनी फोन करणाऱ्या महान व्यक्तीस अत्यंत विनयाने सांगितले होते.. साहेब, माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाशी तुम्ही बोलणं काही बरं दिसत नाही… तुम्ही आमच्या आयुक्त साहेबांशीच बोलावं हे तुमच्या योग्यतेला धरून होईल!
सामाजिक नियम, कायदे यांच्याविषयी कमालीची असंवेदनशीलता दर्शवणा-या काही लोकांना याच वर्दीधारी साहेबांनी रस्त्यावर सामान्य लोकांसमोर पद संचलन करीत नेलं होतं.. सामान्य लोक याला धिंड काढणं असं म्हणतात बहुधा!
पण एवढं सगळं करूनही ‘हा तर माझ्या कामाचाच एक भाग आहे’ म्हणून नामानिराळे राहू शकणारे हे साहेब… जणू क्रिकेटच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील सर्वांत स्फोटक फलंदाजाचा अफलातून सूर मारून झेल घेणारा अष्टपैलू खेळाडू….. पुन्हा शांतपणे डीप फाईनलेगला उभा राहतो…. तसे! म्हणूनच पोलिस दलात प्रत्यक्ष लोकांत, समाजात जाऊन काम करण्याला फील्डवर असणे, अशी कंमेट केली जात असाव!
यांची कहाणी काही फार विशेष म्हणावी अशी नाही…. काही नाही सुमारे वीस खून केलेल्या, (यातील ब-याच महिला होत्या) कित्येक वेळा तुरुंगातून निसटून गेलेल्या (यात दिल्ली पोलिसांच्या तावडीतून तिहार तुरुंगातून याचं निसटून जाणं ही तर दिल्ली पोलिसांच्या तोंडावरचा कधीही पुसला जाणार नाही असा डाग म्हणावा लागेल) एका कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला या साहेबांनी एकदा नव्हे… दोनदा अटक केली होती! मुंबई पोलिस दलातील यांची सेवा फक्त सदतीस वर्षांची…. ए. सी. पी. म्हणून सेवानिवृत्त झाले. मुंबई पोलिस दलातील सर्वजण त्यांना मानतात. जातीय दंगलीदरम्यान लोकांच्यात थेट जाऊन लोकांना शांत, नियंत्रित करू शकणारे, हाती येतील त्या साधनाने मोठी आग विझवण्याची कामगिरी करून दाखवणारे, शांत आणि संयमी राहून गुन्हेगारांच्या आतल्या गोटातल्या बातम्या मिळवण्यासाठी अगदी जमिनीवर राहून (ग्राउंड लेवल, फील्ड वर्क)
मा. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान झाला आहे… आणि ते असे दोनदा सन्मानित होणारे एकमेव पोलिस अधिकारी ठरले होते!
सबंध भारतातील सर्व पोलिस, गुप्तहेर यंत्रणा ज्याचा जीव खाऊन शोध घेत होत्या त्या चार्ल्स शोभराज नावाच्या गुन्हेगाराला गोव्यातून या साहेबांनी अगदी नाट्यमयरीत्या पकडले होते… त्याप्रसंगात त्यांनी चक्क हॉटेलमधील वेटरचे काम केले होते… असे सांगतात. या साहेबांच्या आयुष्यावर काही पुस्तके, चित्रफिती आणि नाटकेही निघाली होती. एकूणच अगदी दखल घेण्याजोगे, तमाम मराठी माणसांना आणि विशेषत: पोलिसात असणा-या सर्वांनाच अभिमान वाटावा, असे हे निवृत्त पोलिस अधिकारी आहेत… मधुकर बापूराव झेंडे त्यांचं नाव.
या साहेबांच्या पोलिस म्हणून केलेल्या कामगिरीवर चित्रपट निघाला पाहिजेच होता… पण कसा? जसे इतर शूर लोकांवर निर्माण केला जातो तसा… जसा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर काढला जातो तसा. पण… आपल्याच एका मराठी लेखक, दिग्दर्शकाने या शूर, कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान पोलिस अधिका-याचे जीवन पडद्यावर रेखाटताना चक्क विनोदी जॉनर वापरला आहे! Genre (जॉनर) म्हणजे प्रकार किंवा शैली. हे असं करणं हाच एक विनोद वाटावा. त्यापेक्षा या विषयावर मराठी वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमात एखादे skit (नाट्यप्रवेश) सादर करून त्याचे शुटींग चित्रपट म्हणून दाखवले असते तर खर्च वाचला असता. नाहीतरी या चित्रपटात घेतलेले बरेच कलाकार अशाच skit मध्ये काम करण्यात वाकबगार झालेले आहेतच!
चित्रपटात नाव मात्र वास्तविक जीवनातील माणसाचे वापरायचे… अगदी पद सुद्धा तेच. इन्स्पेक्टर मधुकर बापूराव झेंडे. गोव्यातील पोलिस इन्स्पेक्टर विनोदी दाखवायचा आणि त्याच्या तोंडी झेंडे नावाचा उच्चार ‘जेंडे’ असा दाखवायचा…. यामागे काय विचार असावा? आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराचा विषय असेल म्हणून असावे कदाचित, म्हणून चार्ल्स ऐवजी कार्ल (झेंडे साहेब मराठी म्हणून त्यांना कार्ल उच्चार करता येणार नाही म्हणून त्यांना कार.. लं म्हणायला लावायचं हे सुद्धा भारीच!) शोभराजचे भोजराज करणं अनिवार्य झालेलं असावं. कमीत कमी पदवीधर (इंग्लिश विषयासह) आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एम. पी. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच पी. एस. आय. होता येतं! काही पोलिस अधिकारी modus operandi ला ऑपरंडाय ऐवजी ऑपरंडी म्हणत असतील सुद्धा… हा काही रूढ शब्दप्रयोग नाही पोलिसांचा!
मनोज वाजपेयी आता खरे पोलिस अधिकारी वाटू लागले आहेत. त्यांना मुख्य भूमिकेत घेऊन दिग्दर्शक, निर्मात्यांनी एक(च) बरे केले आहे! पण याही भूमिकेत दुसरा एखादा मराठी विनोदी कलाकार चालून गेला असताच!
झेंडे साहेबांचे सर्व सहकारी एकजात वेंधळे दाखवताना, साध्या भोळ्या चेह-याच्या भाऊ कदमांना चक्क पांडू हवालदारच दाखवले गेले आहे… आणि हे हवालदार साहेब चक्क घाबरट रंगवले गेले आहेत! ही पोलिसांची बदनामीच नव्हे काय? पांडू या शब्दाशी उच्चार जुळणारा एक मोठा शब्द मात्र वापराला जाईलच याचीही काळजी घेतली आहे. टांगा पलटी झाल्यावर घोडे फरार होतात… हे फरार होऊ पाहणा-या आरोपीस पकडताना म्हणले गेलेले खुपते प्रकारातले वाक्य वापरून आधीच अतिशय गंभीर असलेल्या प्रसंगात हलके फुलकेपणा आणण्याचा (केविलवाणा) प्रयत्नही झाला आहे. एक पोलिस (मग तो साधा भाऊ किंवा साध्या गणवेशातला का असेना) स्वत:च्या डोक्यात बादली (उपडी) घालून घेऊन गुन्हेगाराला त्या बादलीने धडक मारतो… किती अचूक दृश्य. ती बादली थेट गुन्हेगाराच्या डोक्यात नसती का घालता आली? असा बाळबोध प्रश्न पडायला पाहिजे खरं तर.
पण मधुकरराव झेंडे साहेबांची कामगिरी पहायला मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने पडद्यासमोर बसलेल्या किमान मराठी माणसाला तरी या प्रश्नपत्रिकेतील एकही प्रश्न समजत नाही… सोडवायचा तर प्रश्नच येत नाही! या सवालांचे जबाब खुद्द लेखक, दिग्दर्शकाकडे तरी असतील का?
जगप्रसिद्ध पोलिस दलातील एका अधिका-याच्या जगप्रसिद्ध कामगिरीवर आधारीत चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना संबंधित लोकांनी पोलिसांना गृहीत धरले आहे की काय? खुद्द झेंडे साहेबांशी हे लोक संपर्कात असतीलच… म्हणजे असावेत. मग साहेबांनी याला कशी संमती दर्शवली? कलात्मक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे असेल तर कायदेशीरदृष्ट्या योग्यच आहे म्हणा! मग मधुकर झेंडे ऐवजी सुधाकर पांडे हे नाव काही कमी आकर्षक वाटले नसते!
आता विषय जगात पोहोचला आहे… तो काही परत घेता येणार नाही. पण यापुढील काळात पोलिसांच्या कर्तबगारीवर चित्रपट, नाटक काढताना संबंधित खात्यातील ज्ञानी, अनुभवी लोकांचा एकदा सल्ला घेतला गेला पाहिजे, असे वाटते.
आणि हो, भारतीय सैन्याविषयी चित्रपट, नाटक लिहिण्यापूर्वी, आणि ते प्रकाशित करण्यापूर्वी संरक्षण खात्यातील जाणकार लोकांना दाखवलेच जावे, असा नियम असावा. नाहीतर सैनिकी चित्रपटात प्राणार्पण केले असे दाखवले गेलेले सैनिक प्रत्यक्षात सुखरूपपणे जिवंत आहेत, असे नंतर समजते! Cinematic Liberty घेण्यापूर्वी सारासार विचार आपले कलाकार, लेखक, दिग्दर्शक कधी करणार? निर्मात्यांना काय… पैसे वसूल झाल्याशी मतलब!
(श्री. मधुकरराव बापूराव झेंडे साहेब यांच्या कामगिरीविषयी पुस्तके उपलब्ध आहेत. ती शोधून वाचावीत. आता OTT वर आलाच आहे, subscription केलेच आहे म्हणून कोणताही चित्रपट पाहण्यात काही हशील नाही, असे मला संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर प्रामाणिकपणे वाटते. अर्थात, हा लेख म्हणजे माझेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. काय पहायचं आणि काय नाही हे सर्वस्वी वैय्यक्तिक निर्णय असतो. न्यायासाठी उत्तम काम केलेल्या आणि करणा-या, प्रसंगी प्राणांचे बलिदान देणा-या सर्वच पोलिस अधिका-यांना, कर्मचा-यांना अभिवादन!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







