सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ “तेव्हा आणि आता…” – लेखिका : सुधा मूर्ती ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆
तेव्हा आणि आता – –
(१) १९७९ चा एप्रिल महिना
मी त्यावेळेस अमेरिकेला पहिल्यांदाच गेले होते.
मला बोस्टनला जायचं होतं. तेव्हा एकूणच भारतातून लोकांचं परदेशी जाण्याचे प्रमाण फार कमी होतं.
माझा नंबर येताच इमिग्रेशन ऑफिसरने माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
” मॅडम, तुम्ही अमेरिकेत कशासाठी आलेला आहात? “
” माझे पती येथे डेटा कंपनीत नोकरीस आहेत, त्यांना भेटायला आले आहे.”
” तुम्ही किती महिने राहणार आहात? “
” जास्तीत – जास्त ६ महिने.”
” तुम्ही भारतात नोकरी करता का? करत असलात तर तसे प्रमाणपत्र व सॅलरी स्लिप दाखवा.”
मी ती कागदपत्रे दाखवली.
” तुम्ही बोस्टन मध्ये किती दिवस राहणार आहात? “
” मी थोडे दिवस येथे राहीन व नंतर माझ्या भावाकडे बर्कलेला जाईन.”
” मला तुमचं परतीचं तिकीट दाखवा आणि तुम्ही येताना किती पैसे आणले आहेत ते सांगा.”
” माझ्याकडे ५०० डॉलर्स आहेत, असं म्हणून मी परतीचे तिकीट दाखवले.
त्यानं माझ्याकडे अविश्वासाने पाहिले आणि माझ्या पासपोर्टच्या व्हिसाच्या पानावर ३ महिन्यांचा शिक्का मारून तो मला परत दिला.
मग माझ्याकडे पाहून तो म्हणाला,
” तुम्ही अंगात काय प्रकारचा पेहराव घातला आहे? “
” मी भारतीय परंपरेनुसार साडी नेसलेली आहे. हा आमचा राष्ट्रीय पोशाख आहे.”
” हं, तुम्ही भारतातून आला आहात तर!
कुठे आहे हा देश?
जपानच्या जवळ आहे का आफ्रिकेत आहे? “
” नाही, आशिया खंडात आहे.”
” मग तुम्हाला इंग्रजी कसं काय येतं.”
” भारतात खूप वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.
शाळेत आम्ही इतर भाषांबरोबर इंग्रजीसुद्धा शिकतो.”
त्या ऑफिसरची शिफ्ट आता संपत आली होती.
तेवढ्यात दुसरा ऑफिसर कामावर हजर झाला.
तो म्हणाला,
“तुम्ही कपाळाला काय लावलं आहे?”
“त्याला आमच्याकडे बिंदी किंवा कुंकुम म्हणतात. अनेक भारतीय स्त्रिया ते लावतात.”
” हो, एका डॉक्युमेंटरी मध्ये मी भारता बद्दल बरीच माहिती पहिली होती. मी असं ऐकलंय की तुमच्या देशात विधवांना जाळून टाकतात म्हणे. तुमच्याकडे २ वर्ग असतात, एक महाराजा व एक भिकारी. तुम्ही लोकं साप पाळता व तुमच्याकडे हायवे वरून गाई फिरतात, हे सगळे खरे आहे का? “
त्याचं ते उर्मटपणाचे बोलणं ऐकून मला धक्काच बसला.
” या सर्व प्रथा फार पूर्वीच बंद झाल्या आहेत.आमच्याकडे गाई हायवे वरून फिरत नाहीत.”
” तुमच्या मालकीचा हत्ती आहे का? “
” हत्ती पाळणे काही तेवढे सोपे नाही, पण मी अनेक हत्ती पाहिले आहेत” मी हसून म्हणाले.
” ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता.”
मग कस्टम काउंटर पाशी गेल्यावर मी घेऊन गेलेल्या मसाल्यांची, जणू काही रोगराई पसरवणारे भयंकर जीवजंतू घेऊन आलेली स्त्री, अशी काटेकोर तपासणी केली गेली.
त्या सगळ्यातून बाहेर पडून बाहेर आल्यावर मला खूप निराश, उदास व थकल्यासारखे वाटू लागले होते.
(२) साल २००९ महिना बहुदा जुलै.
मी दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगोटा येथे काही भाषण देण्यासाठी गेले होते.
माझा नंबर आला.
व्हिसा ऑफिसर एक तरुण बोलका आफ्रिकन-अमेरिकन होता.
मी रांगेत शेवटचीच असल्याने तो निवांत टेकून बसला व प्रश्न विचारू लागला.
आता तो नेहमीचेच रटाळ, कंटाळवाणे प्रश्न विचारणार, अशी मी मनाची तयारी केली होती, पण या वेळेस तसे काही घडले नाही.”
” ओह! बाई तुम्ही भारतातून आलात का?”
मी म्हणाले, ” हो मी भारतातून आले आहे.”
“तुम्ही अंगात घातलाय, तो तुमचा राष्ट्रीय पोशाख-साडी आहे ना? खूप छान आहे आणि तुम्ही ती छान पद्धतीने नेसलेली आहे.”
मग मी हसून ‘ थँक्स ‘ एवढेच म्हटलं.
” तुम्ही भारतातून कुठून आलात? “
मी जरा चाचरत सांगितले की भारतात दक्षिण भागात बंगळुरू नावाचं एक शहर आहे-तेथून.”
” येस येस, बंगळुरू माहीत आहे की. ते तर सॉफ्टवेअरचे हब आहे. तेथून खूप लोकं मायामीला सुट्टी घालवायला येतात.
बरं बाई, आमच्या देशात तुमचा किती दिवस राहण्याचा बेत आहे?
मी भाषणा साठीचं गेले असल्याने म्हणाले,
” ३ दिवस.”
” का बरं तीनच दिवस का? “
“मला स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत थोडं काम आहे, नंतर मी माघारी जाणार.”
” नाही, नाही तसं करू नका. तुम्हाला माहीत आहे का?
आमच्या देशात उत्कृष्ट दर्जाच्या युनिव्हर्सिटीज आहेत.अत्यन्त सुंदर राज्ये आहेत. ३ दिवसात तुम्ही आमचा देश कसा काय बघणार? “
मग त्याने माझ्या पासपोर्ट वर ६ महिने वास्तव्यास परवानगी देणारा शिक्का मारला आणि म्हणाला,
” अहो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? एनी वे, तुमच्याकडे आता वास्तव्याची परवानगी आहेच.”
” तुम्ही भारतीय लोकं एवढी चांगली कशी काय?
भारतीय माणसं अगदी सरळ असतात.
काही छक्के-पंजे नाहीत.
तुमचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत कधीच नसतं. तुमच्यापैकी बरेच लोक प्रोफेशनल असतात.”
मी अभिमानाने स्मितहास्य करीत म्हणाले,
” आमच्यावर संस्कारच तसे असतात.”
आता प्रश्न विचारण्याची पाळी माझ्यावर होती.
” तुम्हाला भारताविषयी एवढं कसं काय माहीत? “
तो म्हणाला, ” ओह, ते काही कठीण नाही.मायामी मध्ये भरपूर भारतीय रेस्टॉरंट्स आहेत. विकेंडला मी तेथे जेवायला जातो ना! “
” मग तुम्हाला तिथे काय आवडतं?”
” मला भारतीय जेवण खूप आवडतं. तंदुरी चिकन, चिकन टिक्का, कबाब आणि बिर्याणी! “
असं म्हणून काम संपवून तो उठला.
मी बॅग घेऊन कस्टमकडे निघाले.
तो माझ्या बरोबरच चालू लागला.
म्हणाला,
” मला तुमच्या बॉलीवूड ची गाणी खूप आवडतात. मायामी मध्ये बॉलिवूड डान्स शिकवणारे क्लासेस सुद्धा आहेत. मला काजोल खूप आवडते. ती खूप टॅलेंटेड
आहे! “
एव्हाना आम्ही कस्टमशी पोहोचलो होतो.
निरोप घेताना, तो म्हणाला,
” तुमच्याशी बोलून बरं वाटलं.तुमचा मुक्काम सुखदायी होवो.”
एवढं बोलून जाताना अमेरिकन स्टाईल ने गाणं गुणगुणत होता,
“सुरज हुआ मद्धम
चांद ढलने लगा
कभी खुशी कभी गम! “
मी पुढे गेले, तर कस्टम ऑफिसरने मला अडवले नाही.
फक्त जाण्याची खूण अदबीने केली!
मी हातात पासपोर्ट धरून विमानतळा बाहेर आले.
गेल्या ३० वर्षांत एवढे काय बरं बदललं.
असा मी विचार केला.
केवळ सॉफ्ट-वेअर च्या क्रांतीने हा बदल घडून आलेला नाही.
खरं तर पाश्चात्यांच्या नजरेतील भारताची प्रतिमा बदललेली आहे.
हे फार महत्त्वाचे आहे.
आता भारत एक नागा-सापांचा,
गारुड्यांचा व हत्तींचा देश राहिलेला नाही. भारतातून जाऊन इतर देशांत स्थायिक झालेले भारतीय लोक, भारतात राहून संपत्तीची निर्मिती करणारे बुद्धिमान धनिक लोक, आपली पुढची पिढी – जिने परदेशात जाऊन, काबाडकष्ट करून नाव कमावलेले आहे- साऱ्या विश्वाची नागरिक बनलेली आपली मुले, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मायामीच्या विमानतळा पाशी सुद्धा मला ही भारताची नवी प्रतिमा पाझरलेली दिसली.
मी मनाशीच हसले व हातातील भारतीय पासपोर्ट कडे अभिमानाने पाहू लागले!
लेखिका : सुश्री सुधा मूर्ती
(“आयुष्याचे धडे गिरवताना” या लीना सोहोनी यांनी अनुवाद केलेल्या व मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकातील एक आठवण)
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




