श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ साता समुद्रापल्याडही शिवरायांचा जयघोष! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
वीर सैनिक नामदेवराव रामजी जाधव!
इटली देशातल्या त्या नदीकाठाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव काही नवं होतं, असं नाही! सुमारे तीन शतकांपूर्वी इटलीत जन्मलेल्या निकोलाव मानुची नावाच्या एका सैनिक, तोफखाना तज्ज्ञ, वैद्यक तज्ज्ञ, प्रवासी लेखक माणसाने राजांविषयी Storia do Mogor या ग्रंथात मध्ये भरभरून लिहून ठेवलं होतं..आणि त्या गोष्टी या नदीच्या कानावर आल्या होत्याच! फक्त तिने त्या तीन अक्षरी मंत्राचा गगनभेदी जयघोष मात्र कधी ऐकला नव्हता…तो प्रसंग आज प्रत्यक्षात आकाराला आलेला होता!
रक्तबंबाळ अवस्थेत एक आधुनिक मावळा देहातील सर्व शक्ती एकवटून घोष करीत होता…बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! आणि काही क्षणांतच नदीच्या पलीकडच्या दरीतून प्रतिध्वनीही उमटू लागले…जय! जय! जय! आणि मग घटकाभरात मराठ्यांनी रणक्षेत्र काबीज केलं…इतिहासाची पुनरावृत्ती करावी ती शिवरायांच्या मावळ्यांनीच!
इंग्रज माणसं हेरण्यात पटाईत. त्यांनी काही शतकांपूर्वी छत्रपती ‘सिवाजी’ महाराजांच्या गनिमी काव्याचे जिवंत ‘काव्य’ अनुभवले होतेच. महाराजांना आणि पुढे छत्रपती संभाजी महाराजांना देवाचे अकालीच बोलावणे आले म्हणून इंग्रज बचावले. इंग्रजांनी भारतात अधिकृत राज्य स्थापन केल्यावर स्थानिक तरुणांना हाताशी धरीत सैन्य भरती केली. पण बंडाची शक्यता गृहीत धरत त्यांनी मराठयांचे मोठे दल उभारण्यात आखडता हात घेतला होता…कारण त्यांनी मराठ्यांच्या समशेरींचे पाणी चांगलेच चाखले होते. पण कालांतराने ब्रिटीशांना मराठा गडी यशाचा धनी! ही गोष्ट उमगली!
सहा वर्षी सुरु असलेलं दुसरं जागतिक महायुद्ध संपुष्टात येण्याच्या सहा महिने आधीची ही घटना. दोस्तांच्या फौजांना जगभरात बरेच ठिकाणी मोठे यश मिळू लागलेले होते. पण त्यांच्या इटलीमधील मोहिमेत एक मोठा अडथळा होता. सेनियो नदीचे सुमारे सहाशे किलोमीटर्सचे खोरे, त्यापुढील प्रचंड मोठा पठारी भूभाग ताब्यात आला असता म्हणजे जर्मन फौजांना आणखी मागे रेटता आले असते. आणि अर्थातच जर्मन सैन्य दोस्तांच्या फौजांना ही नदी ओलांडू देत नव्हते. सुमारे ९० किलोमीटर्स लांबीची ही नदी. एके ठिकाणी या नदीचे पात्र सुमारे १५ फूट रुंद होते. पाणी फार नव्हे, केवळ चार-पाच फूटच खोल होते. मात्र दोन्ही काठ भले मोठे म्हणजे ३५ फुट उंचीचे होते. नदी ओलांडून जायला हाच एक मार्ग होता…आणि अर्थात इथेच जर्मनीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. मुळात दोस्तांच्या फौजांचा मार्ग जर्मनांनी आणि इटलीतील उंच पर्वत, द-या यांनी एक वर्षभर रोखून धरला होता..एकदा इथे विजय मिळाला असता म्हणजे जर्मनीचा पराभव निश्चित झाला असता.
पण इथेच जर्मनांची ‘गोथिक लाईन’ आडवी उभी होती. ३२० किलोमीटर्स लांबीचा हा आडवा अडथळा…हजारो बंकर्स, मशीन गन्स पोस्ट्स आणि भूसुरुंग असलेली भक्कम भिंतच जणू. ही भिंत फोडूनच पलीकडे Po Valley म्हणजे पो नावाच्या नदीचे खोरे गाठता येईल…आणि नेमके हेच कठीण होते. जर्मनांची अतिशय कुशल, सुसज्ज parachute units इथेच तर तैनात होती!
दोस्तांच्या फौजेतील ८व्या ब्रिटीश आर्मीसमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले होते…पण त्यांच्या समवेत होती ५वी मराठा लाईट इन्फंट्री. डोंगर-द-यातील गनिमी कावा युद्धनीती रक्तात भिनलेले गडी! महाराष्ट्रापासून सहा हजार किलोमीटर्स अंतरावर अत्यंत कठीण परिस्थितीत, विपरीत हवामानात, प्रचंड थंडीत मराठे लढत असले तरी जिद्द मात्र तसूभर कमी नव्हती. ‘आम्हांला या युद्धात मदत करा, आम्ही तुम्हांला स्वायत्तता प्रदान करू’ असे म्हणत ब्रिटीशांनी भारतीय शूरांना साद घातली होती. त्यामुळे या युद्धात विजय झाला तर भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग अधिक सुकर होणार…ही आशा होतीच…शौर्याला यावेळी एक निश्चित ध्येय होते!
निकराचा प्रयत्न म्हणून ब्रिटीश फौजेची पहिली तुकडी या नदीपात्रातून पुढे निघाली…आणि तिच्यावर तीन मशीनगन्स पोजिशन्स वरून प्रचंड गोळीबार झाला…दोन सैनिक आणि त्या सैन्यतुकडीचे कंपनी कमांडर वगळता इतर सर्व ठार झाले…आणि जखमी झालेले हे दोन सैनिक आणि कंपनी कमांडर पाण्यात कोसळले!
या तुकडीच्या अगदी मागोमाग आणखी एक तुकडी नदी पार करणार होती…५वी मराठा लाईट इन्फंट्री…या तुकडीत ‘रनर’ म्हणून एक मराठा गडी तैनात होता. घोडा, वाहन किंवा प्रसंगी पळत जाऊन सैन्य-तुकड्यांना लष्करी निरोपांची त्वरीत देवाण-घेवाण करणे हे रनर चे मुख्य काम असते. ते शस्त्रशिक्षित तर असतातच. युद्धात या रनर वर शत्रूचे खास लक्ष असते!
१८ नोव्हेंबर, १९२१ ची गोष्ट. आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज-वीरगाव या खेड्यात गरीब शेतकरी श्री.रामजी जाधवांच्या पोटी नामदेव जन्माला आले. अतिशय बारीक चणीचे पण तत्कालीन अंगमेहनती शेतकरी कुटुंबांतील अनेक तरुणांसारखे प्रकृतीने काटक असलेले नामदेवराव जात्याच चपळ, शूर आणि धाडसी होते. इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकणारा एक विषारी सर्प नामदेवरावांनी स्वत: हिंमत करीत मारल्याचे सांगितले जाते!
पुढील काळात जाधव कुटुंबास आणि नामदेवरावांना विविध कारणांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. शेतकरी असल्याने शेतमजुरी करावी लागली. बाल नामदेवराव त्यावेळी लोकांची जित्राबं अर्थात जनावरं चारायला नेण्याचे काम करीत रानोमाळ भटकत असत. या दरम्यान गावाजवळ असलेल्या नदीचे विस्तीर्ण पात्र एका दमात पोहत पार करणे आणि त्याच वेगाने माघारी येणे, हा त्यांचा नेहमीचा छंद होता!
त्या काळात लष्करात नोकरीच्या संधी सर्वाधिक असत. किंबहुना दुष्काळग्रस्त भागांतील अनेक तरुणांना लष्करातील नोकरी हा मोठा आधार वाटू लागला यात नवल नाही. शिवाय अंगभूत शौर्य गाजवण्याची संधी दुस-या कुठल्याही नोकरीत नव्हतीच. त्यामुळे नामदेवरावांनी ब्रिटीश फौजेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १९२१ मध्ये जन्मलेल्या या तरुणाने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षीच म्हणजे साधारणपणे १९३९ मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यातल्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये शिपाई म्हणून पाऊल ठेवले…दुसरे महायुद्ध याच वेळी सुरु झालेले होते!
आणि एकेदिवशी नियतीने महाराष्ट्रातल्या एक खेड्यात जन्मलेल्या नामदेव रामजी जाधव नावाच्या तरुणाला दूर इटली देशात लढायला धाडले…एक इतिहास घडणार होता!
९ एप्रिल, १९४५. मेजर विंटर, मेजर क्राफर्ड, मेजर व्हान इनगेन, मेजर हावर्ड इत्यादी अधिकारी हिटलर विरोधातील मित्र सैन्यात आघाडीवर होते. त्यांच्या सोबत.३/१५ पंजाब, १ जयपूर या सैन्य तुकड्याही होत्या. यात ५वी मराठा लाईट इन्फंट्रीही होतीच…आणि त्यांच्यावर भयावह हल्ला चढवला गेला…!
आपल्या पुढची तुकडी नामोहरम झालेली पाहताच…रनर नामदेवराव जाधव हातातली tommy gun सरसावत पाण्यात उतरले…कमांडर साहेबांना खांद्यावर घेतले…पाण्यात तीन बाजूंनी गोळीबार सुरु होताच…नदीकाठच्या भरावामध्ये ठिकठीकाणी सुरुंगही पेरून ठेवलेले होते…त्यातून वाट काढीत नामदेवरावांनी कमांडर साहेबांना एका काठावर सुरक्षित आणले. तोवर जर्मन सैन्याला अंदाज आला होता. त्यांनी आणखी जोरदार गोळीबार सुरु केला…पण नामदेवराव माघारी आले…त्यांनी आणखी एका जखमी सैनिकाला खांद्यावर घेतले…त्याच धोकादायक मार्गावर पुढे जात त्यालाही आणि त्यानंतर दुस-याही सैनिकाला काठावर नेऊन ठेवले…तीन जीव वाचवले त्यांनी!
एवढ्यावर थांबून त्यांना मागे पळून येता आले असते…पण नामदेवराव त्या पाण्यात पुन्हा उतरले…नामदेवराव सैन्यात रनर चे काम करीत असले तरी त्यांना गन्स चालवण्याचे कौशल्य हस्तगत होतेच…त्यांनी tommy gun हातात पेलली आणि त्या मशीनगन्स पोझिशिन्सला आपले लक्ष्य केले…एक एक करीत त्यांनी तिन्ही मशीनगन शांत केल्या…तोवर त्यांच्या हाताला गोळ्या लागून प्रचंड जखमा झाल्या…त्यांची पर्वा न करता त्यांनी जवळचे हातगोळे शत्रू सैनिकांवर फेकले…खंदकात लपलेल्या जर्मन सैनिकांना एवढा प्रतिकार केला जातो आहे, याचे आश्चर्य वाटत राहिले. जवळचे हातगोळे संपल्यावर नामदेवराव वेगाने पोहत या किना-यावर माघारी आले…आपल्या तुकडीतील सैनिकांकडून हातगोळे मागून घेतले…आणि पुन्हा जर्मनांच्या मागावर गेले! जन्मगावी मोठे खोल नदीपात्र एका दमात पोहणा-या नामदेवरावांना ही पाच सहा फूट खोलीची आणि पस्तीस एक फूट रुंदीची नदी अगदी सोपी होती…सोपं नव्हतं ते जर्मनांच्या गोळीबारातून निसटून जाणे…समोर मृत्यू उभा असताना धैर्य टिकवून ठेवणे…शारीरिक वेदना विसरणे आणि सैन्यधर्माला जागणे.
काहीच क्षण आधी त्या नदीच्या अल्याडच्या आणि पल्याडच्याही काठांनी शौर्य, हिंमत, पराक्रम, जिद्द, शर्थ या शब्दांचे जिवंत अर्थ अनुभवले होते..नामदेवराव त्या मरणाच्या वर्षावात त्या नदीचा तो चढ चढून वर टेकाडावर उभे राहिले…आणि मग त्या नदी काठच्या एका उंचवट्यावरून एक गगनभेदी गर्जना ऐकू आली…बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय!…सेनियो नदीने पहिल्यांदा हा गजर ऐकला असावा…तीन अक्षरी मंत्र…ज्याच्या उच्चाराने दगडांनाही जीभा फुटाव्यात! या आवाजाच्या दिशेने जर्मनांनी मोर्टार म्हणजे छोटे विस्फोटक डागायला सुरुवात केली…पण नामदेवराव मागे हटले नाहीत…छत्रपतींचे नाव ऐकताच मराठ्यांच्या रक्तातील शौर्याला पुन्हा एकदा बळ मिळाले…आणि डोळ्यांत आग आणि हृदयात राग असलेल्या मराठा सैनिकांचा एक मोठा लोंढा त्या नदीपात्रातून पलीकडच्या तीराकडे निघाला…पात्रातले पाणी लाल झाले…पण ती लढाई जिंकली गेली!
नामदेवरावांनी जणू एका भक्कम किल्ल्यालाच भगदाड पाडले होते…त्यातून पुढे जात दोस्तांच्या सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला…दुसरे महायुद्ध जिंकण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला…१ सप्टेंबर, १९३९ सुरु झालेले रोजी हे महायुद्ध २ सप्टेंबर, १९४५ रोजी अधिकृतरीत्या संपले…जर्मनी आणि तिच्या मित्रराष्ट्रांचा पराभव झाला हे जाहीर करण्यात आले!
सेनियो नदीच्या आसपास असलेल्या अनेकांनी नामदेवरावांचा पराक्रम उघड्या डोळ्यांनी पाहिला, अनुभवला होता. ते दोन जखमी सैनिक आणि कंपनी कमांडर तर केवळ नामदेवरावांच्या हिंमतीच्या बळावरच जिवंत राहू शकले होते. ब्रिटीश सैन्याधिका-यांनी शिपाई नामदेवराव जाधव यांच्या पराक्रमाची नोंद घेतली…आणि इंग्लंडला धाडली होती!
विक्टोरिया क्रॉस…ब्रिटनच्या राणी विक्टोरिया यांनी २९ जानेवारी, १८५६ रोजी हा सन्मान सुरु केला…ब्रिटीश सैन्यातल्या कोणत्याही दर्जाच्या, कोणत्याही दलाच्या कोणत्याही सैनिकाला, अधिका-याला, सैन्यदलासाठी काम करणा-या नागरिकाला हा सन्मान विशेष समारंभात इंग्लंड येथील बकिंगहम राजवाड्यात प्रदान केला जातो…हा इंग्लंडचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार मानला जातो!
१५ जून, १९४५ रोजी सैन्य शिपाई नामदेवराव जाधव यांना ‘विक्टोरिया क्रॉस’ साठी राजपत्रित केले गेले आणि पुढे एका विशेष समारंभात किंग जॉर्ज (सहावे) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला! इटलीतून सैन्यकर्तव्य यशस्वीरीत्या पूर्ण करून नामदेवराव जाधव सुट्टीसाठी गावी आलेले असताना एक विशेष घटना घडल्याचे सांगण्यात येते…त्यावेळी भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. दुस-या महायुद्धात विजयी झाल्यास ब्रिटीश भारताला मर्यादित स्वातंत्र्य देणार असल्याचे जगजाहीर होते. यामुळेच कित्येक तरुण सैन्यात भरतीही झाले होते.
ब्रिटीश लोक त्यांच्यासाठी लढलेल्या, विशेषत: विक्टोरिया क्रॉस विजेत्या सैनिकांविषयी विशेष सन्मान दर्शवतात, असे दिसून येते. यामुळेच भारताचे तत्कालीन Voiceroy Lord Mountbatten रेल्वे प्रवासात असताना श्रीरामपूर स्टेशनवरून पुढे जाणार होते. त्यांनी नामदेवरावांना स्टेशनवर सन्मानाने बोलावून घेत त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जाधव यांना “काही हवे आहे का? ” असे विचारताच जाधव साहेबांनी “कबूल केल्याप्रमाणे भारताला लवकर स्वातंत्र्य द्या!” असे म्हटल्याचे बोलले जाते…यातून नामदेवरावांचे देशप्रेमच दिसून आले!
भारतात परतल्यावर शिपाई नामदेवरावांना ३ सप्टेंबार, १९४६ रोजी लान्स नाईक, १२ फेब्रुवारी, १९४७ रोजी लान्स हवालदार या पदांवर पदोन्नती देण्यात आली. स्वतंत्र भारतीय सैन्याने त्यांना २८ ऑगस्ट, १९५१ रोजी प्रभारी हवालदार आणि पुढे ५ जानेवारी, १९५६ रोजी हवालदार पदावर बढती देत त्यांच्या कामाचा गौरव केला. नायब सुबेदार या पदावर असताना नामदेवराव सेवानिवृत्त होऊन गावी परतले! त्यांनी कमावलेली पदके हीच त्यांच्याकडे असलेली मोठी दौलत म्हणावी लागेल…इटली स्टार पदक, युद्धसेवा पदक, वुंड मेडल(युद्धात जखमी होऊनही शौर्य गाजवल्याबद्दल दिले जाणारे पदक!) इंग्लंडच्या राणीच्या राज्यारोहणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे गौरवचिन्ह (१९५३…राणी विक्टोरिया यांच्या हस्ते प्रदान)…आणि भारतीय सैन्याचे PVSM परम विशिष्ट सेवा मेडल! एवढं सर्व मिळवूनही नामदेवराव जाधव साहेब साधे आयुष्य जगले, हे विशेष. त्यांच्या पत्नी द्रौपदाबाई यांनी त्यांच्या शौर्याच्या कथा आठवणींत जपून ठेवल्या. त्यांच्या एकुलत्या एका कन्येच्या तीन पैकी एका मुलाने भारतीय सैन्यात, मराठा रेजिमेंटमध्ये प्रवेश मिळवून वारसा पुढे नेला आहेच. इतर नातू नामदेवरावांच्या नावाने समाजसेवी संस्था चालवत त्यांच्या स्मृती जागवत असतात.
एका बाबतीत परदेशी नागरीकांना मानले पाहिजे…ते सैनिकांचा पूर्ण आणि कायम आदर ठेवतात! नामदेवराव जाधव साहेब २ ऑगस्ट, १९८४ रोजी हे जग सोडून निघून गेले. पण तोपर्यंत त्यांना दर दोन वर्षांनी इंग्लंड येथे होणा-या विशेष समारंभास आठवणीने बोलावले जायचे.
सेनिओ नदीच्या काठी San potito येथे ९ एप्रिल, २०१७ रोजी तिथल्या महापौरांच्या हस्ते नामदेवरावांचे स्मारक उभारले गेले आहे. लंडन येथील Constitution Hill येथील Memorial Gates येथे नामदेवरावांचे नाव कोरलेले आहे.
इकडे भारतात पुण्याजवळच्या औंध लष्करी प्रशिक्षण केंद्रात ३१ जानेवारी, २०१९ रोजी नामदेवरावांचा अर्धपुतळा स्थापित करण्यात आला आहे.
‘विक्टोरिया क्रॉस’ प्राप्त केलेल्या सैनिकांचे अत्याधुनिक record ब्रिटीशांनी जपून ठेवले आहे. त्यासाठी विशेष अधिका-याची नेमणूक केलेली असते. The Victoria Cross Association हे विक्टोरिया क्रॉस जिंकलेल्या जगभरातल्या सैनिकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून असते. काही वर्षांपूर्वी ब्रिटीश उच्चायुक्तालयात लष्करी सल्लागार पदावर कार्यरत असलेल्या ब्रिगेडीअर इयान रीस यांनी दिल्ली ते अहिल्यानगर असा खास प्रवास करीत नामदेवरावांच्या पत्नी श्रीमती द्रौपदाबाई यांची सदिच्छा भेट घेतली होती.
२ ऑगस्ट, २०२६ ही परमवीर नामदेवराव रामजी जाधव यांची ४२वी पुण्यतिथी.
.. .. नामदेवरावांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय!
(विक्टोरिया क्रॉस विजेत्या मराठा सैनिकांमध्ये नाईक यशवंतराव घाडगे यांचे नावही आदराने घेतले जाते. यशवंतरावांनी १० जुलै, १९४४ रोजी दुस-या महायुद्धात भीमपराक्रम करून दाखवला होता!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


