सुश्री नीलिमा खरे
काव्यानंद
☆ मज कोण मारतो हाका… कवयित्री : डॉ. स्नेहल कुलकर्णी ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆
☆
☆ कविता ☆ मज कोण मारतो हाका ☆
☆
वाऱ्याला फुटला फाटा निस्तब्ध रान सन्नाटा
अवसेच्या अथांग डोही अंधार कापती वाटा
व्याकूळ स्वरांच्या पोटी उसवून भयाचा टाका
ह्या झपाटलेल्या वेळा… मज कोण मारतो हाका
*
घटलेला जलोनिधी की पडलेला उलटा फासा
पात्रात गुंजभर पाणी तडफडतो करूण मासा
रणरणत्या नदीतटावर औदुंबर झुरतो ओका
ह्या माध्यान्हीच्या वेळा.. मज कोण मारतो हाका
*
बंबाळ चितेचा भडका चमचमती स्मशानजागा
शृंगार यातना करते श्वासात धुराचा धागा
आत्म्याचा लगाम सुटतो देहाचा वितळून साका
ह्या गुदमरणाऱ्या वेळा.. मज कोण मारतो हाका
*
हे शापित अमृत कोणी.. शिंपडले माझ्या भाळी
स्रोतांना बधीर करते बेभान सुखाच्या काळी
मी दुःख जोजवत नाही ना आनंदाचा झोका
ह्या मरणकळांच्या वेळा.. मज कोण मारतो हाका
☆
© डॉ. स्नेहल कुलकर्णी
☆ रसग्रहण ☆ नीलिमा खरे ☆
समृद्ध जाणिवा, सजग दृष्टीकोन, संवेदनशील मन हे पैलू जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्त्वात अंतर्भूत असतात तेव्हा ती व्यक्ती आयुष्य जगताना केवळ आत्मकोशात राहून सुखी व आनंदी जगण्याचा विचार करू शकत नाही. आजूबाजूची परिस्थिती, त्यातील बदल याकडे उघड्या डोळ्यांनी ती व्यक्ती पाहते. बदलांच्या परिमाणाकडे व परिणामांकडे विचारपूर्वक लक्ष देते. आजूबाजूच्या वातावरणाशी स्वतःच्या मनस्थितीची सांगड घालण्याचा प्रयत्न करते, त्यातील साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न करते.
अशाच प्रकारची विचारी भूमिका मांडणारी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांची ही प्रगल्भ कविता “मज कोण मारतो हाका”…
“वाऱ्याला फुटला फाटा” त्याच्या वाटेला फाटा फुटला आहे म्हणजे तो काही कारणाने वाहत नाहीये या वास्तवाचे भान होते. साहजिकच वाऱ्याच्या अभावाने रानही निस्तब्ध झाले आहे. पानांची सळसळ, झाडातून वारा वाहताना होणारा शिळीचा भास होत नाहीये.
सारे वातावरण एकदम चिडीचूप झाले आहे. सन्नाटा पसरलाय. सन्नाटा या एका शब्दातून निस्तब्धतेचा कमालस्तर लक्षात येतो. “फाटा फुटणे” हा अतिशय समर्पक वाक्प्रचार कवितेतील आशयाला पूरक आहे. अवसेच्या रात्रीचा गहिरा व अथांग काळोखाचा डोह व त्यातील अंधार कापणाऱ्या वाटा यामुळे कवितेतला आशय ठसवण्यात कवयित्री यशस्वी होते. अशा निसर्गसन्निध वातावरणात व्याकुळ स्वरांच्या पोटी भयाचा टाका उसवून या झपाटलेल्या वेळी मला कोण हाक मारतंय असा प्रश्न कवयित्रीला पडला आहे. निसर्गातील वातावरणाचा परिणामकारक उल्लेख करत कवयित्रीने मनोवस्था, भावावस्था वर्णिली आहे. सन्नाटा मनात वावरत असताना वाऱ्याची सुखकारक, सुखद झुळूकही लाभली नाही. वाऱ्याने ही पाठ फिरवली. “अंधार कापती वाटा” यातून वाटेवर चालताना केवळ अंधार नजरेस येतोय ही भावना स्पष्ट होते. अवसेच्या भयाण रात्री चहूबाजूला अंधार दाटून राहिलाय. प्रकाशाचा कवडसा, एखादा किरणही दृष्टीस पडत नाहीये. मार्गक्रमणा करताना येणाऱ्या वाटेला अंधार कापतोय अशी अतिशयोक्तीची कल्पना केली आहे. चेतनागुणोक्ति आणि रूपक अलंकाराचे उत्तम प्रयोजन कवयित्रीने केलेले जाणवते. यातून तिचे साहित्यिक भान तर लक्षात येतेच आणि कवितेचा आशय मनावर अधिक चांगल्या तऱ्हेने ठसला जातो. या वातावरणाच्या प्रभावाने, परिमाणाने तिचा स्वर व्याकुळला आहे. पण तरीही अंतरंगातले भय, भीतीचा टाका उसवून, तो दूर सारून या झपाटलेल्या वेळातून तिला कोणीतरी हाक मारतयं… कदाचित तिचेच अंतरंग…. “झपाटलेल्या” या शब्दांतून तिची भावावस्था किती खोलवर आणि आरपार तिच्यात भिनली आहे हे लक्षात येते.
अवसेच्या रात्रीची अवस्था वर्णून झाल्यावर ती माध्यान्हीचे वर्णन करत आहे. माध्यान्ह शब्दांतून टळटळीत दुपार, रणरणते ऊन, उन्हाच्या काहिलीने थकणारे शरीर व मन यांकडे निर्देश केला आहे. अत्यंत समर्पक शब्दांतून खूप मोठा अर्थ व्यक्त होतो. या रणरणत्या उन्हात पोळलेल्या जीवाला जरुरी असते पाणी… परंतु ज्यावेळी प्रकर्षाने ते हवे तेव्हा मिळणे हे प्राक्तनात नाहीये. अगदी त्याच क्षणी जणू काही जलधी घटलाय. पाण्याची कमतरता जाणवत आहे. “उलटा फासा पडला” म्हणजे मनाविरुद्ध घडलं. हवं ते न मिळणं, अपेक्षित पूरक, पोषक अवस्था उपलब्ध न होणं हा अर्थ स्पष्टपणे कळतो. “उलटा फासा” या शब्दांतून व कवितेतील भावनेला योग्य अर्थ दिला आहे. जवळ असलेल्या पात्रात (नदीचे पात्र व पाणी पिण्याचे भांडे)गुंजभर पाणी आहे. साहजिकच अपेक्षित प्रमाणात उपलब्ध पाणी उपलब्ध नसल्याने करुण व केविलवाणा झालेला, भासणारा मासा तडफडतोय. कारण पाणी हेच त्याचे जीवन आहे. त्यापासून तो दुरावलाय. मासा हे रूपक व्यक्तिला वापरले आहे. पाण्यविना जशी माशाची तडफड होते तशीच तगमग विपरीत वातावरणात व्यक्तिची होते. अत्यंत समर्पक व अर्थवाही रुपक… पुढे कवयित्री सांगते की नदीतटही रणरणता आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने पुरेशा पाण्याअभावी नदीतट स्वतःच तृषार्त आहे. त्यामुळे त्याच्या काठावरील औदुंबर झुरतोय पाण्यविना… तो “ओका”बोका निष्पर्ण जीवनाचे लक्षण नसलेला असा दिसतो आहे. औदुंबराचे रूपकही अत्यंत अर्थपूर्ण… अशा या माध्यान्ही वेळेला तिला कोण हाका मारतो आहे हा प्रश्न तिला पुन्हा सतावतो आहे.
पूर्णपणे विपरीत परिस्थिती आजूबाजूला व जीवन सुसह्य करणारी स्थिती दृष्टीपथात नाही. अशावेळी दुःखाने दुखावलेला जीव मरणासन्न झालाय. “बंबाळ” या शब्दांतून दुःखाचा अतिरेक, कमालस्तर, आकारमान, कठोरपणा हे सारे सारे ध्यानात येते. दुःखबंबाळ जीवाची जणू चिता पेटते, तिचा भडका उडतो. “भडका” या शब्दयोजनेमुळे प्रमाण आणि परिमाण मोठे आहे हे लक्षात येते. एकदम आगीचा डोंब उसळल्यागत अवस्था झाली आहे हे ध्यानात येते. आणि चिता पेटल्यानंतर जशी स्मशानाची जागा चितेच्या दाहक प्रकाशाने चमचमते त्याप्रमाणेच व्यक्तीचे आयुष्य बनते. या जागेवर आणि जाणिवेवर यातनेचा, वेदनेचा जणू काही शृंगार दिसतो. अर्थात यातनामय शृंगार सुरू आहे अशी भावना व्यक्त केली आहे. “श्वासात धुराचा धागा” ही कल्पना केवळ अप्रतिम.. परिस्थितीचे गांभीर्य आणि त्याची तीव्रता ध्यानात आणून देणारी कल्पना… शरीराच्या अस्तित्वाला आवश्यक असलेला श्वास जळू लागला आहे आणि त्यातून निघणारा धूर ही त्या श्वासाला मिळाला आहे व श्वासात मिसळलेला आहे. शरीराबरोबरच मनालाही जाळणारी यातना आणि त्यातून निर्माण झालेला धुराचा धागा… ही वेळ केवळ अगतिक, हतबल बनवणारी… अशावेळी देहाचा “साका” तळापासून, मुळापासून वितळतो. मनाच्या तळाशी साचलेले सगळे बाहेर पडते, चितेच्या भडकणाऱ्या ज्वाळेत नष्ट होते. त्यामुळे प्राणावर, जीवावर असलेला आत्म्याचा लगाम सुटतो. आत्मा जो आयुष्य या संकल्पनेवरील लगाम आहे तो सुटतो, अदृश्यच होतो. विचित्र, असह्य, सहन न होणाऱ्या परिस्थितीत जीव गुदमरतोय, तगमगतोय, तडफडतोय, कासावीस होतोय, परंतु याला तरणोपाय नाही व यातून सुटका नाही हे सत्य ध्यानात आलेले आहे.
अमृत सेवनाने माणूस अमर होतो अशी कल्पना आहे. पण कवयित्री म्हणते की तिच्या भाळी मात्र कुणीतरी शापित अमृत शिंपडले आहे. साहजिकच असे अमृत त्याची किमया पूर्णार्थाने करण्यास असमर्थ आहे. केवळ “शिंपणाने” ही अवस्था तर शापित अमृताचा कलश कुणी ललाटी लावला असता तर काय झाले असते? तर कदाचित तिच्या वेदनेला अंतच उरला नसता. आंतरिक प्रेरणेच्या स्त्रोताला ही परिस्थिती बधिर करून सोडते, काहीही सुचत नाही. भान नसलेल्या, बेभान झालेल्या सुखाच्या काळी तिला मात्र काहीच सुचत नाही. अर्थात सुखाच्या क्षणांकडे दुर्लक्ष होते. “सुख पाहता जवाएवढे व दुःख पर्वताएवढे” अशी मानसिक अवस्था होते. अशा विपरीत वातावरणात कवयित्री पुढे सांगते की ती दुःखाला जोजवत, कुरवाळत राहत नाही. जोजवत या शब्दांतून एखाद्याच्या प्रती असलेला जिव्हाळा किंवा ममत्व अधोरेखित केले जाते. (उदाहरणार्थ बाळाला जोजवणे.) कवयित्री स्पष्ट करते आहे की ती या तिच्या दुःखाप्रती अशी भावना बाळगून नाही. ती दुःखाचे भांडवल करत नाही. त्याचवेळी ती पूर्णपणे आनंदाच्या झोक्यावरही झुलत नाहीये. अत्यंत तटस्थपणे आणि त्रयस्थपणे ती आयुष्याकडे पाहते आहे. असे असूनही व असे असल्यानेच तिला मरणकळा, मरणप्रायवेळा सामोऱ्या आहेत असे वाटते. आणि या अशा वेळी तिला कदाचित तिचे पुढील आयुष्य हाका मारते आहे.. सद्य परिस्थितीत ही सकारात्मक भावनेने जगायला प्रवृत्त करते आहे.
नितांतसुंदर अशी ही कविता.. गहन अर्थाची आणि तो परिणामकारक रीतीने शब्दबद्ध करणारी कविता.. निसर्गातील प्रतिमांचा, रूपकांचा आधार घेऊन त्याच्याशी समांतर असणारी, त्यातल्या अर्थाप्रती समान असणारी, साधर्म्य सांगणारी मनोवस्था आणि त्याचे अत्यंत भेदक वास्तववादी, भयाण, भयावह, जीवनसत्य शब्दचित्रातून सूचकतेने मांडणारी, उलगडणारी अप्रतिम कविता.. प्रत्येक कडव्याच्या आशयाला सुसंगत असा शेवटचा चरण… संपूर्ण कवितेतून कवयित्रीची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, तिचे सजगभान व सृष्टीतील गोष्टींबद्दलचे अवलोकन आणि त्या भावपूर्ण आशयाला दिलेली सुजाण साहित्यिक लेखनाची कौतुकास्पद शैली…
अनुप्रास, यमक, रूपक, उपमा, श्लेष, चेतनागुणोक्ति इत्यादी साहित्यिक अलंकारांचा सहज सुंदर वापर कवितेतील आशयाला उंची व खोली प्रदान करणारा.. अंतरंगातून आलेली अंतरंगापर्यंत पोहोचणारी अप्रतिम अशी ही भावकविता…
कदाचित यातील संपूर्ण अर्थ, भावार्थ स्पष्टपणे व योग्य शब्दात मांडण्यात माझ्या भावना कमीही पडल्या असतील कारण त्या केवळ जाणून घ्यायच्या असतात. जाणीवेने आणि नेणीवेने नेमकेपणे व्यक्त करण्याकरता माझे शब्दमाध्यम अपुरे ठरले असेल. एक अतिशय उच्च दर्जाची कविता एवढे मात्र नक्की म्हणते.
© सुश्री नीलिमा खरे
२६-३-२०२५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




