श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – देखीचा दिमाख… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
देखीचा दिमाख शिकोनियां दावी /
हि-याऐसी केवीं गारगोटी//१//
*
मर्यादा ते जाणे अरे अभागिया /
देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती//२//
काय पडिलासी लटिक्याचे भरी /
वोंवाळुनि थोरी परती सांडी//३//
*
तुका म्हणे पुढें दिसतसे घात /
करितों फजित म्हणउनि //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
दुसऱ्याचे अनुकरण करून तसे वागण्याचा प्रयत्न करणाराला तुकाराम महाराज अनुभवाचे खडे बोल सुनावताना म्हणतात.
दुसऱ्याचे काही तरी शिकून आपणही तसे वागण्याचा खोटा खटाटोप करू नये. कारण कितीही मिजास दाखवली तरी गारगोटीला ही-याचे तेज येईल का? गारगोटी कधीच हि-यासारखी दिसणार नाही.
अभागी माणसाला मर्यादा कुठे, किती आणि कशा पद्धतीच्या असतात हेच कळत नाही. त्यांचा अंदाज घेता येत नाही. देवासारख्या दिसणा-या मूर्तीचे आपण दर्शन घेतो. तिच्यात प्रत्यक्ष देहधारी देव कधीच दिसणार नाही. ती फक्त मूर्तीच दिसेल. म्हणून आपण जे खोटे आणि प्रतिकात्मक आहे त्याच्या नादी कधीच लागू नये. त्याची खरी ओळख करून घ्यावी आणि आपल्या मनात त्याची जी भ्रामक ओळख आहे किंवा प्रतिमा तयार झाली आहे ती पुसून टाकावी. आपल्या पासून दूर करावी. आपण जर तसे केले नाही तर आपल्या जिवनात पुढे धोका होण्याचा संभव असतो. आणि मग पुढे जाऊन आपली फजीती देखील होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून ख-या खोट्याची पूर्ण जाणकारी घेऊन कसे वागायचे ते ठरवायला पाहिजे. म्हणजे काहीच नुकसान होणार नाही.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






