श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – काय उणे जाले… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
काय उणें जालें तुज समर्थासी /
जसा मजपाशीं कोण दोष //१//
*
जो तूं माझा न करिसिं अंगीकार/
सांगेन वेव्हार संतांमधी //२//
*
तुजविण रत आणिकाचें ठयीं /
ऐसें कोण ग्वाही दावीं मज //३//
*
तुका म्हणे काय धरुनी गुमान /
सांग उगवून पांडुरंगा //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुकाराम महाराज आपल्या अधीकार वाणीने आपल्या वर्तनात विषयी प्रत्यक्ष पांडुरंगालाच जाब विचारताना म्हणतात. तू पूर्ण समर्थ आहेस.
तू सर्व काही जाणतोस. माझ्या वर्तनामुळे तुला मी कोणता त्रास देतोय?. ज्या मुळे तू माझा स्वीकार करत नाहीस. ते कारण तू मला सांग. नाही तर हा तुझा माझ्या सोबत घडत असलेला व्यवहार काही योग्य नाही असे मी सगळ्या संतमंडळी समोर सांगेन. मी केवळ तुझ्याच चरणाशी लीन होवून तुझीच मनोभावे सेवा करत आहे. मी तुला सोडून दुस-या कुणाची भक्ती करत असल्यास त्याचा तू मला सबळ पुरावा दे. तो माझ्या समोर आण. या बाबतीत तू मौन पाळून गप्प बसू नकोस. तू माझा स्वीकार का करत नाहीस. हे मला आता कळायलाच हवे. या वरून तुकाराम महाराज पांडुरंगाची किती मनोभावे आणि श्रद्धापुर्वक सेवा करत होते ते कळते. त्या मुळेच ते पांडुरंगावर आपला हक्क आहे असे मानत होते. त्याला आपले मनोगत सांगत होते. पांडुरंगाचे मार्गदर्शन घेऊन आपला जीवनक्रम चालवीत होते. हेच यातून आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळून येते.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






