सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ झटकून टाक जीवा… – कवी: ग. दि. माडगूळकर  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

झटकून टाक जीवा…

गदिमा

‘जीवन हे अनमोल ‘

आयुष्याच्या वाटचालीत चढउतार येतातच. सुख-दुःख, यश अपयशाचा पाठशिवणीचा खेळ सतत सुरूच असतो. अशावेळी धीराने, संयमाने संकटांचा सामना करावा लागतो. त्यातूनच पुढचा मार्ग सापडून यशाला गवसणी घालता येते. पण काहीजण अशावेळी धीर खचून गलितगात्र होतात. काही जण तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा अवस्थेत त्यांना मायेची साथ, प्रोत्साहनाचे शब्द, आधारचा हात पाठबळ देणारा असतो. संकटांनी, दु:खाने खचलेल्या मनाला उभारी देणारे अलौकिक शब्दप्रभू कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे एक गीत मला फार आवडते. त्याच गीताचा रसास्वाद आपण घेऊया.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा ||

*

होईल ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा

अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा

आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा ||

*

पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे

आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे

हसुनी करी परी ते वर्षाव सौरभाचा ||

*

का कालचा उद्याला देसी उगा हवाला

द्यावाच वाटतो ना मग जीव रे जीवाला

अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा ||

*

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा ||

*

‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटातील हे गीत आहे. अगदी विमनस्क स्थितीतला नायक आत्महत्या करायला निघालेला असतो. त्याला वाटेत एकजण भेटतो. तो त्याची विचारपूस करून अगदी योग्य रीतीने समजूत घालतो.

तो सांगतो, ” अरे हे जग एवढे वाईट नाही. प्रलय करणारं पाणी सुद्धा शेत पिकवतं, वीज खेळवतं. लक्षात ठेव, दिलेली एकच गोष्ट परत घेता येत नाही कधी, ती म्हणजे आपला ‘जीव’….” त्याच्या समजावण्याने भारावलेला नायक मागे फिरतो. या पार्श्वभूमीवर हे गीत ऐकू येते.

दुःखाने, संकटांनी उदास, निराश झालेल्या मनाला उभारी देणारे हे गीत आहे. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आशावादी, उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन कवीने पहिल्याच ओळीत केले आहे ते श्रोत्यांच्या मनाला अगदी थेट भिडते.

दिवसभरामधे मध्यान्हीचे ऊन हे तसे त्रासदायकच असते. पण तो ताप सोसल्यावर पुन्हा सावलीचा लाभ होतोच. तसंच आयुष्यात दुःखाची धग सोसल्यावर पुन्हा सुखाची सावली मिळतेच. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत निराश होऊन चुकीचा काही निर्णय न घेता शांत रहायला हवे.असे केल्याने येणाऱ्या नव्या क्षणांचा शांतपणे सुखाने आनंद, आस्वाद घेता येतो.

छोटंसं नाजूक कोमल फुल ऊनपावसाची तमा न बाळगता दिमाखात डोलत असते. खरंतर आपलं आयुष्य एक दिवसाचं आहे हे त्याला माहीत असतं तरीही ते हसत रहातं, फुलत रहातं आणि सगळीकडे सुगंधाचा वर्षाव करीत दरवळत रहातं. आपलं आयुष्य तर कितीतरी मोठे असते. त्यामधे किती तरी चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःला आनंद मिळवत इतरांना आनंद देऊ शकतो. कसे जगायला हवे हे कवीने सहजसोप्या आणि प्रभावी शब्दात सांगितले आहे.

कवीने पुढे विचारले आहे की, ” कालचा दिवस वाईट होता म्हणजे उद्याचा दिवसही वाईट असेल असे का समजायचे?  उद्या कदाचित वेगळे पण चांगले काही घडू शकेल. तुला जर जीव द्यायचा असेल तर तो इतरांना दे. इतरांशी संवाद साधत मनाने जोडला जा. यातून जीवाला जीव देणारे सुहृद भेटतील. त्याऐवजी चुकीचा काही तरी विचार करुन घातक निर्णय घेऊ नकोस. माणसाचा जन्म मोठ्या भाग्याने मिळतो. तर अविचाराने या देहाचा अव्हेर करू नकोस. आत्महत्या हा संकटातून सुटण्याचा मार्गच नाही तर परिस्थितीवर मात करायला हवी. आपोआप सुखाचा मार्ग गवसेल हे कवीने खूप प्रभावीपणे समजून सांगितले आहे.

मन निराश असताना खूप अडचणींनी उदासी जाणवते, जगणे व्यर्थ वाटू लागते अशावेळी कुणीतरी आपुलकीने आपली चौकशी केली, आपले बोलणे निदान ऐकून घेतले तरी बरे वाटते. त्यामुळे आता आपली परिस्थिती बदलेल, आपलेही प्रश्न सुटू शकतील अशी आशा वाटू लागते. गेलेला उत्साह परत येतो. एक जिव्हाळ्याची व्यक्ती हे काम अतिशय उत्तम रीतीने करते. अगदी तसेच काम कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे शब्द करतात. जिवलग मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास पुन्हा परत यावा तसे हे गाणे ऐकल्यावर वाटते.

जगण्यातला आनंद मावळत चाललाय, जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे अशा लोकांना आशेचा नवा किरण दाखवणारे हे गीत आहे. गदिमांनी अतिशय सुंदर समर्पक शब्दांत मनाला उभारी देणारी रचना केली आहे. त्यासाठी मध्यान्हीचे ऊन आणि नाजूक फुल यांच्या रूपकातून जीवनाचे सार अगदी चपखल शब्दात सांगितले आहे.

आजचं जीवन धकाधकीचं, धावपळीचं आणि ताणतणावाचं झालेलं आहे. अनेकदा संकटांनी, दु:खाने माणसे अगदी त्रासून जातात. मानसिक स्वास्थ्य हरवते. मन निराश होऊन चुकीचा निर्णय घेऊ लागते. काहीजण तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. असे मनाने पूर्ण निराश झालेल्या लोकांना जगण्याची नवी प्रेरणा, आशेचा नवा किरण दाखवणारे हे गीत आहे.

जीवनामधे आशावाद भरभरून वाहतोय. तेव्हा सर्व संकटांना, आव्हानांना सामोरे जात जीवन समरसून जगायला हवे असा संदेश या गीतातून दिलेला आहे. जगण्याची सकारात्मक प्रेरणा देणारे हे गीत तसे खूप जुने आहे. पण आजही ते तितकेच परिणामकारक सिद्ध होते आहे ही कविवर्य गदिमांच्या शब्दांची थोरवी आहे.

परिस्थितीने गांजलेल्या एखाद्या जीवाला त्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळो हीच सदिच्छा आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments