प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ मोहाडी ते मिसुरी… ☆ प्रा. भरत खैरकर ☆

कॅन्सस सिटीच्या एका बर्फाळ सकाळी शौकत सय्यद कॉफीचा मग घेऊन खिडकीबाहेर पाहत होता. समोरचा रस्तापांढरा झाला होता. स्नो-प्लाऊची गाडी सारखी ये-जा करत होती. आणि त्या पांढऱ्या शुभ्रतेत त्याला अचानक मोहाडीचा काळाचिखल आठवला. भंडारा जिल्ह्यातलं मोहाडी. जिथे पावसाळ्यात पाय खोल रुतायचा आणि तरीही शाळेत जाण्याची घाईअसायची.

“इथे बर्फ पडतो तेव्हा सगळं बंद होतं, ” तो हसून म्हणाला होता, “आमच्याकडे चिखल झाला तरी शाळा बंद व्हायची नाही. चप्पल हातात घेऊन जायचो. ”

शौकतची गोष्ट ही फक्त एका माणसाची गोष्ट नाही. ही गेल्या तीस वर्षात गावातून उडालेल्या हजारो पंखांची गोष्ट आहे.

सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांपूर्वीची गोष्ट. मोहाडीसारख्या गावातून इंजिनिअरिंग करणं हीच एक मोठी घटना होती. घरातपहिला इंजिनिअर. गावात बोटावर मोजता येतील इतके. शौकतने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्या काळात पुणे-मुंबईत नोकरीमिळाली म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं असं वाटायचं. त्याने सुरुवात केली डाटा मॅट्रिक्स नावाच्या कंपनीत. नाव आज फारसंकोणी लक्षात ठेवणार नाही, पण तेव्हा तिथे टाय लावून ऑफिसला जाणं म्हणजे भारी प्रतिष्ठेचं होतं.

पण शौकत तिथे थांबला नाही. त्याला कळलं होतं की कोडिंग ही फक्त सुरुवात आहे. तो टीम लीडर झाला, मग प्रोजेक्टमॅनेजर. या प्रवासातच आयबीएम ग्लोबल सर्व्हिसेसची वाट लागली. आयबीएम म्हणजे तेव्हा जग. निळ्या लोगोचं गारुड. तिथेतो रमला, शिकला.

आणि मग तो दिवस आला. अमेरिकेचा कॉल. अनेकांसाठी तो लॉटरी असतो. शौकतसाठी तो निर्णय होता. गाव, आई-वडील, माती सोडून सातासमुद्रापार जाणं.

“सुरुवातीला वाटलं दोन-तीन वर्षं, पैसा कमवून परत येऊ, ” तो आजही तेच सांगतो. “पण अमेरिकेचं असं आहे, तीतुम्हाला हळूहळू आपलंसं करते. आणि तुम्ही कधी तिचे होता, कळतच नाही. ”

आज २८ वर्षे झाली. या २८ वर्षात त्याने स्वतःला चार वेळा घडवलं. सॉफ्टवेअर इंजिनिअर, टीम लीडर, प्रोजेक्ट मॅनेजरआणि आता सीनियर डिझायनर. लोकांना वाटतं अमेरिकेत गेलं की आयुष्य सेटल. पण शौकत सांगतो, तिथे दर पाच वर्षांनीतुम्हाला स्वतःला रि-इन्व्हेंट करावं लागतं. नाहीतर तुम्ही आउटडेटेड. त्याने डाटा सायन्समध्ये मास्टर्स केलं, वयाच्याचाळीशीनंतर. जेव्हा आपल्याकडे लोकं रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतात, तेव्हा तो नव्याने विद्यार्थी झाला.

गेली १४ वर्षे तो कॅन्सस सिटीत आहे. मिसुरी नदीच्या काठचं शहर. मध्य अमेरिका. इथे त्याने जे काम केलं ते ऐकलं तर थक्कव्हायला होतं. बोईंगसाठी पाच वर्षे. ज्या कंपनीची विमाने आकाशात उडतात, त्यांच्यासाठी त्याने जमिनीवर बसून सिस्टीमलिहिली. नंतर जनरल मोटर्ससाठी सॉफ्टवेअर डिझाईन. गाडीच्या डॅशबोर्डमागे असलेले लॉजिक, जे ड्रायव्हरला दिसतही नाही, ते शौकतसारख्या माणसांनी लिहिलेले असते. आज तो सेंटर कॉर्पोरेशन नावाच्या मोठ्या हेल्थकेअर कंपनीत काम करतो. विमानापासून गाडीपर्यंत आणि आता माणसाच्या आरोग्यापर्यंत – त्याचा प्रवास तंत्रज्ञानापेक्षा माणसाकडे जाणारा आहे.

या सगळ्यात त्याने दोन गोष्टी जपल्या. एक म्हणजे शिकणं थांबवलं नाही, आणि दुसरं म्हणजे कुटुंब. त्याला दोन मुली. दोघीही अमेरिकेत डॉक्टर. हे वाक्य तो अगदी सहज बोलून जातो, पण त्यामागे किती संघर्ष आहे हे फक्त बापाला माहीत. मोहाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या पोराने आपल्या मुलींना अमेरिकेत डॉक्टर बनवणं, यातच त्याच्या २८ वर्षांचंचीज आहे.

एके दिवशी गप्पा मारताना विषय निघाला अमेरिकेतल्या भारतीयांचा. मी म्हटलं, तिथे तर सगळे मोठ्या पॅकेजवरअसतील. तेव्हा शौकत थोडा गंभीर झाला.

“बाहेरून तसं दिसतं, ” तो म्हणाला, “पण आतमध्ये दोन अमेरिका आहेत. ”

मग त्याने जी गोष्ट सांगितली ती ऐकून मी सुन्न झालो. तो म्हणाला, “आजकाल बरेच लोक मेक्सिको मार्गे येतात. सुरुवातीला पैसे देऊन मेक्सिको गाठायचं आणि तिथून चोरीछुपे बॉर्डर क्रॉस करून अमेरिकेत शिरायचं. ही एन्ट्री इलिगलअसते. ”

त्याच्या तोंडून ‘इलिगल’ हा शब्द ऐकताना मला मोहाडीचा तो मुलगा आठवला जो आयबीएमच्या इंटरव्ह्यूसाठी महिनाभररात्र-रात्र जागला होता. एका बाजूला हा कायदेशीर मार्गाने, गुणवत्ता सिद्ध करून आलेला शौकत, आणि दुसऱ्या बाजूला जीवधोक्यात घालून वाळवंट ओलांडून येणारे लोक.

“मग ते इथे काय करतात? ” मी विचारलं.

“सुरुवातीला गॅस स्टेशन, रेस्टॉरंट, मोटेल. कुठेही. १२-१४ तास काम. कागदपत्र नाहीत, त्यामुळे तक्रार नाही. पगार कमी. पणगावाकडे फोटो जातो अमेरिकेच्या गाडीपुढचा, ” तो उपरोधाने हसला.

हे ऐकताना मला जाणवलं की स्थलांतर ही एकच क्रिया नाही. त्याचे वर्ग आहेत. एक स्थलांतर आहे शौकतसारखं, जेसिस्टमने बोलावलेलं आहे. दुसरं स्थलांतर आहे जे सिस्टमला चुकवून घुसलेलं आहे. पहिल्याला कंपनी विमा देते, दुसऱ्यालापोलीस पकडेल याची भीती असते.

शौकत म्हणाला, “प्रत्येक देशाची जबाबदारी असते आपल्या नागरिकांची. पण जेव्हा इमिग्रंट येतो, तेव्हा त्याची जबाबदारीकोण घेणार? त्याला वापरलं जातं, कारण तो स्वस्त आहे. ”

कॅन्सस सिटीतल्या त्याच्या घरात बसून तो हे बोलत होता. बाहेर बर्फ पडत होता. आत हीटर सुरू होता. दोन डॉक्टर मुलींचेफोटो भिंतीवर होते. आणि त्याच्या बोलण्यात कुठेतरी अपराधीपणाही होता. आपण सुटलो, पण जे अडकले आहेत त्यांचंकाय? हा प्रश्न.

आज भंडाऱ्यातून थेट फ्लाईट पकडून कॅन्सस सिटीत जाणारी पिढी तयार झाली आहे. त्यांच्या हातात लॅपटॉप आहे. पणत्याच भंडाऱ्यातून अजूनही एखादा पोरगा एजंटला पैसे देऊन मेक्सिकोची वाट धरतो. दोघांचं स्वप्न एकच – अमेरिका. पणदोघांचे रस्ते जमीन-अस्मान.

शौकतची गोष्ट आपल्याला आरसा दाखवते. पूर्वी परदेशी जाणं म्हणजे मोठी गोष्ट होती. निरोप द्यायला अख्खं गावयायचं. आज व्हिडिओ कॉलवर रोज बोलणं होतं. तंत्रज्ञानाने अंतर संपवलं, पण नात्यांमधली ऊब कमी झाली का? पूर्वी महिन्याभराने येणारं पत्र जीव लावून वाचलं जायचं. आज रोजच्या गुड मॉर्निंग मेसेजला रिप्लाय द्यायचा कंटाळा येतो.

आणि आणखी एक गोष्ट. शौकतने आयुष्यभर स्वतःला बदललं. पण त्याने मोहाडी बदलू दिली नाही मनातून. आजही तोभंडाऱ्याच्या उन्हाळ्याची गोष्ट सांगतो. आजही त्याला वाटतं की आपल्या मुलींनी मराठी समजावं. हीच तर खरी श्रीमंती आहे. अमेरिकेत राहूनही गाव न विसरणं.

शेवटी तो म्हणाला होता, “मी इथे घर घेतलं, गाड्या घेतल्या, मुली डॉक्टर झाल्या. पण रात्री झोपताना कधी कधी वाटतं, ते मोहाडीतलं मातीचं घरच बरं होतं. तिथे कुलर नव्हता, पण झोप शांत लागायची. ”

बर्फ वितळल्यावर कॅन्सस सिटीत वसंत येतो. झाडांना नवी पालवी फुटते. तेव्हा शौकतच्या घरासमोरच्या बागेत तो झेंडूचीफुलं लावतो. अमेरिकन मातीत भंडाऱ्याचा झेंडू! तो फुलतोही. अगदी आपल्यासारखाच. कारण शेवटी माणूस कुठेही गेला तरीत्याचं बीज त्याच्या गावातच असतं. फक्त त्याला रुजायला दुसरी माती मिळते.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted