श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… आणि तुम्हांला सांगतो आमच्या तालुक्यात वीज आली… आमच्या गावात वीज आली… आमच्या वस्तीत वीज आली आणि आमच्या घरात वीज आली… तो तुम्हाला चित्रात दिसतोय तो वीजेचा खांब सगळ्यात पहिल्यांदा उभा राहिलेला खांब आहे बरं आमच्या गावात, वस्तीवर वीज आपल्या डोक्यावरून वाहून घेऊन येणारा… आज उणीपुरी पन्नास वर्षे झाली बरं त्या खांबाला आमच्या गावाच्या वेशीवरं वेताळाच्या झाडाजवळ उभा आहे… त्यावेळी जसा होता तो आजही तसाच उभा आहे ना भाऊ… वीज गावात खेळत राहीली त्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांनी तर दिवाळीच साजरी केली… सगळ्यांच्या घराघरातले सगळ्या असल्या नसल्या खोलीतले ओट्या्वरचे, खळ्यावरचे, परसूमधले,… आणि कशा कशातले दिवे… म्हणजे पिवळे चाळीस व्होल्टचे दिवे ते दिवसरात्र ढणढणा जळत राहिले हो… सकाळच्या सूर्य प्रकाशात त्यांचं महत्त्व वाटलं नाही पण अख्खी रात्र मात्र तेजाची फुलबाज्यांची रोषणाई सांडत राहिली… आयाबाया पोरंबाळं अंगणात दारात ठिय्या मांडून फतकल मारून बसले.. वीजेची दिव्य गोष्टीचां वार्तालाप करत… बरीच रात्र उलटून गेली तरी घरात जाऊन आता झोप घ्यावी असं कुणालाही सुचलचं नाही… तर इकडे पुरूष मंडळी कट्यावर, पारावर बसून पत्याचा डाव टाकून बसले तर काही ना हा आजचा दिवसाचा आनंद घश्यात काहीतरी गरम पेयाचे चषक इत्यादी रिते कसे करता येईल याची गुत्याच्या वाटेवर हसी मजाक चालू झाला… गोठ्यातली गुरं ढोरं आनंदानं शिंगं डोलावू लागली… आणि आणि ती राॅकेलची चिमणी तो प्रभाकरचा कंदील ह्या वीजेच्या दिव्यांनी दिवे लावलेले पाहून बिचारे रुसून कोपऱ्यात अंधारात बसून गेले… निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवाराकडे कसा अपयशाचा अंधकाराचा सन्नाटा असतो त्याच्यापेक्षा ही जास्त म्हणाना… आता आपली इथली गरज संपली गड्या तेव्हा आपला बोऱ्याबस्तरा उचलायला हवा आणि अडगळीत पथारी टाकावी अन्यथा भंगारावाल्याच्या काळ्या कभिन्न गोदामात गंजत खितपत पडावं लागेल… मग कोण कशाला वास्तपूत करतोय… गरज सरो नि… पण हि काना मागून आलेली चटक चांदणी किती दिवस.. आपलं किती रात्रं लखलखत राहीलं हे ही सांगता कसं येईल…आता हेच बघा की ते ब्रिटिशांच्या आमदनीत फक्त मोठ्या शहरात तेव्हा वीज खेळत होती आम्हाला वाटायचं हि श्रीमंतांची मिजासच आहे…ती कशाला वो तडमडयाला खेड्यापाड्यात येतेय… इथं रोजच्या रात्रीला चिमणीच्या ढणढण्या उजेडाला नि कंदिलाच्या मेणचटलेल्या प्रकाशाला अंधार लाजून मुरकून जरा दूर हटायचा… गाव शीव वालं सगळे जण त्याला सराईता सारखे चालत बोलत येत जात नि राहत होते… अगदीच नड पडली तरच रातच्याला गावाच्या बाहेर पडतं नाही तर जो तो आपल्या घरातच.. पण हि छमक छल्लू वीज आली नि गावा गावातले लोक पायात चाळ बांधल्या सारखे बघा दिवस नाही कि रात्र नाही चौवीस तास अखंड कारण असू दे वा नसूदे हिंडायला लागले कि… कोणीतरी लै शिकलेला मोठा माणूस म्हणत होता आता वीज आली पाठोपाठ गावाचा विकास पण होत जाणार म्हणून… उद्योग धंदे वाढून सुख समृद्धी लोकांच्या घरघरात पोहचणार… मग ती चिमणी आणि तो कंदील असताना काय कमी सुखं होतं का तेव्हा… खाऊन पिऊन सुखीच होतो कि आम्ही… हिच्या मुळं आणि दोनचार सुखाची साधनं वाढली इतकंच काय ते… गावातली बाया माणसं, पोरंसोरं असं बोलत बसली होती आनी तितक्याच फक्कन अंधारच झाला जिकडं तिकडं.. अरं काय झालं या वीजंला.. दिवा एकदमच का विझला.. का वीज संपली वाटतं.. रे लावा ती आपली चिमणी आणि तो कंदील.. त्याशिवाय काही आपलं जगणं काही खरं नाही गड्या हो… आता आहे तर नंतर नाही आणि दिवसा आहे तर रातच्याला नाही अशी बेभरवश्याची वीज आपल्या काय कामाची नाही.
ऐन नडीलाच हि नडणार..तेव्हा चिमणी आणि कंदील कायमचं असू द्या घरात… वीजेच्या अति झगझगीत उजेडाच्या हव्यासापायी चिमणी नि कंदील बाजूला सारले तर दारिद्र्याचा अंधार आपल्याला गिळून टाकल्या शिवाय राहणार नाही… म्हणतात ना जुनं ते सोनं.. कितीही उत्कर्षाचा काळ आला तरी ऐनवेळी सोनंच मदतीला धावून येतं तसं या चिमणी नि कंदीलाची सोबत आहे बरं… तो वीजेचा खांब जेव्हा पहिल्यांदा इथं आला तेव्हा किती कौतुक झालं होतं त्याचं पण तेच आता पन्नास वर्षे उलटल्यानंतर त्याच्यकडं कुणीही ढुंकूनही बघना झालयं…कितीतरी उन्हाळे, पावसाळे, थंडीचा कडाका खाऊन खाऊन अगदी कणखर झाला… त्याचबरोबर आता त्याच्या अंगोपा़गांवर पानाच्या पिचकाऱ्या पडून पडून तो आता लाल तांबडा नि करडा रंगाचा झालाय तर कुठे जाहिरातीचे बोर्ड, तर कुणी त्याच्याच आधार घेऊन पानाची, चहाची टपरी टाकून बसलयं.. हळूहळू त्या खांबाची गावानं ओळखच विसरून गेलयं.. आणि खांब सुध्दा आपलं खरं काम काय होतं हे विसरून दुसऱ्या कामातच गुरफटून गेलाय… त्याला या सगळ्या गोष्टींचा उबग आलाय पण सांगतो कुणाला.. आपल्या इथून कुणीतरी हलवलं तर बरं होईल असं सारखं वाटतयं…रस्ता रुंदी करणाच्या नावाखाली तरी…वादळाने तरी उन्मळून पडावं नाहीतर वीज मंडळानं तरी आपण खूपच जूने जीर्ण झालोय म्हणून तरी बदलुन टाकावं असं त्याच्य मनात येतयं… त्याच्या मनात जे येतयं ते वीज मंडळाच्या मनात कधी यावं आणि आलचं समजा पण त्यासाठी खर्चाच्या बजेटाची मंजूरी कधी मिळायची… साराच लालफितीचा कारभार…एकवेळ देवाजीच्या मनात आलं तर इकडची दुनिया तिकडं व्हायला वेळ लागायचा नाही पण या विद्युत देवतेच्या पुजाऱ्यांच्या मनात हे येणार कधी नि कसं…याच्याच प्रतिक्षेत तो खांब तसाच असिधारा व्रतस्थाप्रमाणे प्रतिक्षेत उभा आहे…
#
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






