श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “स्कायलॅब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
आणि तुमच्या पुढच्या वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा… शलाकाला ती मेलची शेवटची लाईन वाचताना काळजात कालवल्यासारखं झालं… कंपनीचा वाढत्या तोट्याची उपाययोजना म्हणून काही कर्मचाऱ्यांना आज कंपनीने नारळ दिला होता… त्यांचा आजवरचा सगळा देय असलेला आर्थिक हिशोबही तितक्याच वेगात भागवूनही टाकला होता… आता संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत थांबला नाही, तरीही काही हरकत नाही अशी सवलतही दिली होती… आजवर दिलेल्या सेवेबद्दल कंपनी आभार व्यक्त करतेय… बाकी युवर कंपनी एम. डी. एक लफ्फेदार काळ्या अक्षरातली सही… थोडक्यात तुमचं भविष्य बिघवडून टाकणारा हा पोटाचा नियंता.. लहरी विक्षिप्त. त्याच्या समाधानासाठी जीवाचे असेल नसेल तितके रक्त सांडलेलं काही वर्षे.. तरी त्याच्या मनाची हाव काही संपयाचीच नाही. रोज नवे नवे टार्गेट देऊन सकाळपासून ते रात्री पर्यंत जीवतोड पळायला लावून उसाच्या रसाच्या चक्रातून चोथा निघेपर्यंत पिळून काढून घेतल्यावरही, ‘अरे यार तुम कुछ काम के बंदे नही लगते हो ‘असा असमाधानी आत्मा. आणि एक दिवस अचानक ध्यानीमनी काही नसताना… आणि गंमत म्हणजे आजच एप्रिलच्या एंडला कर्मचारीचंं ॲप्रेझल.. रेटींग डिक्लेअर करून.. कुणाला प्रमोशन वुईथ पगारवाढ, तर कुणाला नुसतीच पगारवाढ, बोनसं, इन्सेटिव्ह वगैरे वगैरे चे मेल मिळालेले असल्याने कंपनी च्या सगळ्या सेक्शन मधे जल्लोषचा माहोल पसरलेला… पार्टी तर जरूर होना है यार.. आपापसातल्या सहाकाऱ्यांचां अशी मागणीचा जोराचा आवाज दुमदुमत होता… सगळीकडे वातावरण उत्साही होतं आणि आणि शलाका एकटीच आपला चेहरा पाडून तो आलेला मेल वाचत बसली… मन खूप विषण्ण झालं… तिच्या त्या ऑफिसमधले बाकीच्या सहकाऱ्यांना त्यांच्या या आनंदा पुढे शलाकाकडे बघायला वेळच नव्हता… कदाचित तिला फोर्थ रेंटींग मिळालं असेल आणि त्यामुळे यावर्षी नो पगारवाढ आणि रेड अलर्ट सिग्नल दिला असणार.. या समजुतीत ते सगळे होते… कंपनीच्या त्या फ्लोअर वरील फक्त शलाकालाच एकटीला हा मेल आला असल्याने… बाकी कुणालाच त्याची काहीच कल्पना नव्हती… गंभीर चेहऱ्याने शलाका आपल्या लॅपटॉपवर आलेल्या मेल कडे पाहत बसली… चिंतेचं जाळं हळूहळू तिच्या भोवती लपेटून जाऊ लागलं होतं… आणि आता डोळ्यासमोर तिला तिचं घरं, चार वर्षाचा आर्यन तिचा मुलगा, पक्षाघाताने आजारी सासू आणि आणि एकाही ठिकाणी न टिकणारा… सतत नव्या नव्या नोकरीच्या शोधात असलेला पण हतबल झालेला तिचा नवरा शिरीष… सगळेच तिच्या कडे आशाळभूत नजरेने पाहातयेत असं वाटत राहिलं… पुढचा प्रवास अनिश्चित, अंधकारमय दिसत होता… बॅंक लोनचे हप्ते, महिन्याचा किराणसामान देणारा वाणी, दूध, पेपर वाले, सोसायटी मेंनटेनस, आर्यनची पोलिओ ट्रिटमेंट, सासूबाईंचा अल्ट्रासाउंड इफेक्टची आठवड्यातील तीन सिटींग… आणि आणि नोकरीचं कुठंच सेंटीग अद्याप न जमल्यानं शिरीषचा वाढता प्रवास खर्च… मोलकरणीचां पगार… या सगळ्या घेणेकऱ्यांचे हात लांब लांब पसरत शलाकाच्या गळ्याभोवती वेढे घालू लागलेले तिला जाणवले… शलाका मनाने खूपच खचून गेली… नवी असाईंन्मेंट इतक्या लवकर मिळणं मुश्किल होतं.. त्यात कंपनीने काढून टाकलयं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या आपण जाॅबला अनफिट आहोत याचचं शिक्कामोर्तब केल्यासारखे ते रिलिव्हिंग लेटर तिच्या तनामनावर चरचरा ओरखडे काढत राहिलं… मागच्या वर्षापर्यंत एक दोन रेंटिंग मिळालेलं असुन सुद्धा आपल्याला कंपनीनं नारळ दिला… आणि तो डिसुझा, रमण भाटीया, सुधाकर सावंत सारखे कायमच अनसंग असणारे गाईज मात्र कंपनीने रिटेन करून ठेवावेत… मगं आपण कशात कमी पडलो… बाॅसची हांजी हांजी करणं आपल्याला कधीच जमलं नाही.. ना कधी कुठल्याही पार्टीला, पिकनिकला ना आऊटडोअर साईटला त्याच्या सोबत गेलो नाही.. म्हणून कदाचित त्याने हा ठरवूनच डाव खेळला असणार… कदाचित मी आता लगेचच त्याच्या केबिनमध्ये जाऊन रडत भेकत आपल्याला घरच्या परिस्थितीची कल्पना देऊन एक वेळ त्याने आपल्यावर दया दाखवावी अशी त्याची कल्पना असणार बहुतेक… म्हणून तर केबिनमध्ये बसून सारखं ग्लास विंडोज लूक आऊट चाललयं त्याचं…. ही मासोळी गळाला लागायलाच हवी यासाठी त्यानं केव्हढं मोठं जाळं टाकून बसलाय.. आमिषाचे तुकडे टाकून बधत नाही म्हटल्यावर पाण्यातूनच कायमची बाहेर काढून फेकून देताना आपली पाॅवर किती स्ट्राॅंग आहे हेच दाखवयाचं होतं त्याला… पण शलाका काही कच्च्या गुरुची शिष्यां नव्हतीच मुळी.. तिनं त्या मेलला रिप्लाय देताना. गुडबाय इतकेच म्हटले.. आपला डेस्कटॉप मधील आपली सगळी महत्वाची माहिती तिनं डिलीट करायला विसरली नाही.. डेस्कटॉप शटडाऊन केला.. ड्रावर रिकामे केले.. कुठल्याही आमिषाला बळी पडणारं इतकं तकलादू सौंदर्य तिचं तर नक्कीच नव्हतं… ऑफीसच्या कामाचे काही इथिक्स, प्रिन्सिपल्स तिचे ठाम होते… त्याला मुरड घालून कंपनीत रिटेन राहणं तिच्या स्वभावात नव्हतं… हातात कौशल्य होतं नि बुद्धी ची झेप मोठी होती हेच तिचं मोठ्ठं भांडवल असल्याने आज जरी हातातला हा जाॅब सुटला तरी दूसरा मिळणारच हा आत्मविश्वास होता… तो मिळेपर्यंत संयम ठेवणं गरजेचं होतं.. शलाकाने आपली पर्स उचलली आणि कुणाशीही काही न बोलता ती एकेक पाऊल टाकत आॅफिसातून बाहेर पडली.
.. त्यावेळी तिथं असलेल्या कुठल्याही कलिगला तिचं असं निघून जाणं याकडे खास असं काहीच वाटलं नाही.. उद्या त्याचं नेहमीप्रमाणे रूटीन सुरू राहणार होतं याची आजतरी त्यांना खात्री होती… आणि शलाका मात्र उद्याला त्यांना तिच्या डेस्कला दिसणार नव्हती याची कल्पना देखील नव्हती. मग उशिराने का होईना त्यांच्यात लक्षात येणार होतं कि अरे या वेळीची स्कायलॅबचा बळी शलाका होती तर….
#
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






