श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “उजेडी राहिले उजेड होऊन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“दिवसभर काबाडकष्ट करत घाम गाळून चार पैसे घरी आणतो ते कुणासाठी? सगळ्या हौस मौजा पुरी कुणाच्या करतो? जे जे ज्या ज्या वेळी मागशील ते ते की रे तुला देत गेलो… अगदी आपली ऐपत नसताना सुद्धा… हाडाची काडं करताना, रक्ताचं पाणी करून राबराबताना न थकता, कंटाळा न करता एव्हढे कष्ट कोणासाठी मी उचलतो? … तू माझ्याकडून हजार अपेक्षांचं ओझं सारखं आपलं लादतच राहत असतोस… आणि यात माझी साधी माफक तुझ्याकडून एकच अपेक्षा असते की तू चांगला शिकावासं… चांगल्या गुणानीं दरवर्षी उतीर्ण होऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर तुला जे आवडत असेल त्यातील पदविका.. घ्यावीस. सुदैवाने साथ चांगली दिलीच तर परदेशात जाऊन पुढचं ही मास्टर डिग्री मिळवावी.. हि अपेक्षा तुझ्याकडून करताना मला कितीही त्रास झेलण्याची मी सगळ्या प्रकारे तयारी ठेवली आहे हे तुला पूर्णपणे ठाऊक असताना, हा तुझा आजचा दहावीच्या निकालाची गुणपत्रिका पाहून माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी पाडलसं! आजवर तुझ्यासाठी घेतलेल्या कष्टं मातीमोल केलेस! कश्यातही कधीही काही कमी न करता तुझे सारे चोचले की रे पुरवले… एकवेळ अर्धपोटी चा पोटाला चिमटा घेऊन आणि मनाला आशादायी सुवर्ण स्वप्नांची झळाळी दाखवत राहिलो.. तर त्याच झळाळीच्या चटक्याने चांगलेच भाजून काढलेस… का तू गांभिर्याने अभ्यास केला नाहीस… आणि आज हा निकाल मला दाखवताना तुला थोडी तरी लाज वाटायला हवी होती… अगदी इंडियन क्रिकेट फलंदाज धावा काढत असतात तितकेच मार्क्स तुला मिळावेत… एकूण टक्केवारी 38… सगळ्या विषयाला स्पेशल क्लास लावून सुद्धा… ” इति मी आमचे एकुलतेएक कुलदिपकांवर त्यांनी दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत जे दिवे लावले त्यावर घरात पसरलेल्या नैराश्याच्या अंधारात आगपाखड करत होतो.. आणि कुलदिपकांवर त्याचा काहीएक परिणाम झाला नव्हता. ते मख्खपणे आलिया भोगासी असावे सादर या पवित्र्यात खाली मान घालून उभे… दिवटा काहीच बोलत नाही हे पाहून त्यांच्या जन्मदात्री मातेने आमच्या लढाईत उडी घेऊन माझ्यावरच शाब्दिक आणि कायिक चढाई करू लागली… प्रतिपक्षाचा हा अनपेक्षित हल्ला मला सपशेल शरणागती घेण्यासाठी भाग पाडणार अशी स्थिती झाली होती.. हा सूर्य आणि हा जयद्रथच्या थाटात त्या जगनमाउलीने मला दमात सांगितले.. “अहो ती गुणपत्रिका कुणाच्या नावाची आहे ते बघा तरी आधी.. ती तुमचीच स्वताची दहावीची गुणपत्रिका आहे समजलं… आपणच लावलेले ते दिवे आहेत.. माझ्या लाडक्या सोनूने तर मेरीट मधे पास झाला आहे… अरे मग ती आधी का नाही दाखवयाची.. कारण नसताना मी उगाच चिडलो नसतो… मला वाटलं आपले कुलदिपक चौविस तास वह्या पुस्तकातून मोबाईल लपवून सारखं काहीतरी बघत बसत होते.. परिक्षेचं, बोर्डाचं आपल्या पुढच्या करियरचं कशा कशाचं त्यांना गांभिर्य उरलचं नाही तर मग हाती हाच निकाल अपेक्षित असणार.. यात माझं काही चूक नव्हतंच… म्हणून मी हा डांगोरा पिटत राहिलो.. “

“हो का कुठल्या बाबा आदमच्या काळातले बाबा तुम्ही… आमच्या वेळेला पुस्तकातून इतका प्रकाश निघत नव्हता… पण तेच आताच्या पिढीला सगळं ऑनलाईन शिकवलं जातं, शिकवण्या घेतल्या जातात.. टेस्ट होतात… मग त्यासाठी मोबाईल, टॅब शिवाय कसं बरं हे शक्य होणार… तुम्ही आपले पंतोजींच्या स्टाईलने जाणारी माणसं नव्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्यासाठी सुदधा होऊ शकतो हे कधीच पटवून घेणार नाहीत… तुम्हाला जुनं ते सोनं आणि नवं ते पितळ हेच ठाऊक पण आता नवं ते टाकाऊ तर नसतचं तर ते टिकाऊ देखिल असतं… सोन्या चांदीपेक्षा जास्त महाग नि दुर्मिळ असा प्लॅटिनम धातू आहे तो… “

“तुम्ही उगाच माझ्या लेकरावर डाफरलात… बिचारे ते एव्हढा आनंदात होता त्याचा तुम्ही हिरेमोड केलात… कधीतरी हे ही तुमच्या लक्षात यायला हवं होतं.. कि… आपला दहावीचा निकाल नाही तो नाही पण मुलाचा निकाल पाहून तरी म्हणावं.. मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड…. उजेडी राहिले उजेड होउन.. “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments