सुश्री अपर्णा परांजपे
☆ ✍️ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
☆
नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करावा असे म्हणतात. पण संकल्प हा संकल्प च रहातो हा आपला अनुभव आहे. असे का घडते यावर थोडे चिंतन केले तर जाणवते आपण काही तरी वेगळे करु किंवा काहीतरी वेगळे मिळवू असा मनात विचार करुन आपण संकल्प करतो हे जाणवले. मग काहीतरी विशेष भले ही ते छोटे का असेना करावे असे वाटते इथेच आपली खरी चूक होते. काहीही वेगळे न करता आहे तेच जर सातत्याने केले तरी समाधान मिळते.
सण समारंभ उत्सव साजरा करण्यामागे आनंद मिळणे ही भावना असते. सणाच्या दिवशी करण्यात येणारी विशेष तयारी ती फक्त एक दिवस न करता दैनंदिन जीवनातच थोडं थोडं करत गेलो तर रोजच तो आनंद मिळणार नाही का? (जर त्या दिवशी तो मिळतो हा अनुभव आहे तर रोजही मिळणारच! )
उदा. गुढीपाडवा पहाटे उठणे, रांगोळी काढणे, तुपाचा दिवा लावणे व रामरक्षा या मूलभूत गोष्टी रोज केल्या तर त्याची शिस्त मनाला शरीराला लागेल व रोज व गुढिपाडव्याला मुहूर्तावर गुढी उभारल्यानंतर तो आनंद द्विगुणित होईल. दैनंदिन व नैमित्तिक गोष्टी एकात एक मिसळतील व समाधान सतत मिळेल केवळ सातत्याने!
नैमित्तिक तर करायचेच मुहूर्तावर पण त्यातील मूलभूत गोष्टी करुन त्या शिस्तीत जीवन जगले तर वर्तमानाचाही आनंद घेता येईल.
आनंद समाधान केवळ एका विशिष्ट क्षणी कसे असेल.
वर्तमानात जगण्यासाठी सातत्य व शिस्त लागतेच तर त्या मुहूर्तावरील आनंद शाश्वत असेल.
करचरण कृतं वाक्कयजं कर्मजं वा
।श्रवणनयनजं वा मनसं वपराधं” ।
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व ।
जय जय करुणाबद्ध श्रीमहादेव शम्भो ॥
पवित्र विचार, पवित्र वातावरण, दिवा लावणे स्तोत्र म्हणणे या नित्याच्या गोष्टी मनापासून, सतत करत करत नैमित्तिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सहज वागणे शक्य करणे म्हणजे हा संकल्प नसून सहजता ठरेल. ही सहजताच ताण न देता खरे समाधान देणारी ठरू शकते.
आचार्य म्हणतात जे जे कृत्य करू ते सगळे भगवंताच्या साक्षीने केले तर तीच त्याची सेवा ठरते. वेगळं काही करण्याच्या नादात सहजता निसटते व वर्तमानातील आनंद न मिळता संकल्प हा ताण ठरतो व तो पूर्ण होत नाही.
आचार्य तर म्हणतात ईश्वरसाक्ष जीवन असेल तर निद्रा सुद्धा समाधी ठरेल. यावर मनन केल्यास साधेपणा व नैसर्गिकताच आपले समाधान आहे.
संकल्प म्हणजे रोजचेच वागणे सहज केले तर वेगळाच अनुभव मिळू शकेल असे वाटते.
☆
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



