गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मी काय करत नाही? – लेखक : गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

☆

“तू एवढं काय काय करत असतेस. तुला वेळ कसा मिळतो? ” हा प्रश्न मला अनेकजणी विचारत असतात. यावर मी विचार केला की मी खरच नक्की काय करते की मला वेळ मिळतो? याचं उत्तर असं आहे की मी अनेक गोष्टी करत नाही म्हणून मला वेळ मिळतो. हे माझे priviledge आहे आणि त्यासाठी मी रोज देवाचे आभार मानते. माझ्याकडे मदतनीस बायका येतात त्यांची मी पुरेपूर मदत घेते. पण त्या घरात आल्या रे आल्या की रोज त्यांच्या मागे मागे करत हे इथेच का ठेवलं? ते का उचललं नाही? इकडून घ्या तिकडून घ्या असं करत गरागरा फिरत नाही. तो वेळ मी माझ्या कामांकरिता वापरते. एखादा दिवस त्या आल्या नाहीत तर घर किती घाण आहे असा विचार करत सगळं झाडतपुसत बसत नाही. की वॅक्युम क्लिनर घेऊन घरात फिरत नाही. एका दिवसात घर घाण होत नाही. वर हे सगळं मी एकटीच करते म्हणून चिडचिडही करत नाही. बेसिक झाडाझाडी करते आणि शांत बसते. धुतलेली भांडी परत धूत बसत नाही आणि ती धुतल्या धुतल्या लगेच पुसून घेऊन जागच्या जागी गेली पाहिजेत असा अट्टाहासही करत नाही. कपडे झटकून वाळत घातले पाहिजेत मान्य पण ते किमान तीनदा झटकले पाहिजेत असा हट्ट करत नाही. कामवाल्या मदतनीसांचा वापर करून घेते पण त्यांच्याकडून काम करून करवून घेऊन त्यांना छळत बसत नाही. त्यांनाही जीव आहे, आजारपण, पाळी, मेनोपॉजचे त्रास आहेत. त्यांच्यांप्रती सहभावना ही हवीच आणि ती फक्त पैसे फेकल्याने येत नाही.

कधीतरी घरातील इतर लोक स्वयंपाकघरात काम करायला आले तर अमुक नॅपकीन तमुक कामाला का वापरला? आणि फोडणीला भांडे वेगळे का घेतले यावरून मी वाद घालत बसत नाही. कोणती भांडी कशासाठी वापरतात हे बेसिक ज्ञान घरातल्या सगळ्यांना हवे. किचन ही माझ्या अखत्यारीतील गोष्ट असली तरी ते माझे साम्राज्य नाही, मी तिथली राणी नाही याची मी स्वतःला पूर्णपणे जाणीव करून देत असते. कारण साम्राज्य म्हणलं की कंट्रोल आला आणि कंट्रोल आला की उर्जा लावणे आले. आपली ऊर्जा कुठे कशी आणि किती लावायची आहे ज्याचे त्याने ठरवायचे असते. माझ्या आजेसासुबाई पालेभाजी निवडताना प्रत्येक काडी तीन वेळा जमिनीवर हलके आपटून मग निवडायच्या. त्यांना वेळ होता त्या करायच्या मी हे करत नाही. कीड, मुंगी, अळी बघते पण अतिचिकित्सा करत बसत नाही.

वॉशिंग मशीनचा शोध बायकांची कामे कमी करायला लागला आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आमच्याकडे चालत नाही, त्याने कपडे आपटल्याचा आवाज येत नाही, त्यात कपडे स्वच्छ निघाल्यासारखे वाटत नाही, रोज आधी गरम पाण्यात भिजवून ठेवून ते घासून मगच ते मशीनला लावले की स्वच्छ निघतात यावर माझे मत वेगळे आहे. भारतात वापरले जाणारे ८०% कपडे वॉशिंग मशीन मध्ये उत्तम स्वच्छ निघतात. रंग जाणारे कपडे, शर्टच्या कॉलर, नाजूक कपडे यांची काळजी वेगळी घेतली पाहिजे हे मान्य. पण ते मशीन आपल्यासाठी आहे आपण त्या मशीनसाठी नाही हे लक्षात ठेवून वापरले तर ते उत्तम वापरले जाते.

दर महिन्याला फ्रीज साफ करण्याचा ऊटारेटा मी करत नाही. मुळातच फ्रीजमध्ये पदार्थ गच्च भरून ठेवत नाही. ही माझ्या सासऱ्यांची शिकवण आहे. फ्रीज आहे तो, कपाट नाही घे की उचल टाकायला असं ते कायम सांगत असतात. त्यामुळे चार प्रकारच्या ओल्या चटण्या, दोन रेडी ग्रेव्ही, दह्याची चार वाडगी, शंभर मसाले, चिरलेले कांदे, अर्धी चिरलेली फळं, उरलेल्या भाज्या माझ्या फ्रीजमध्ये मिळणार नाहीत. हे एखादीच्या दृष्टीने अगदी वाईट असू शकेल. असू देत. पण मुळात सामानच कमी असल्याने “आज फ्रिज साफ करायचा दिवस” माझ्याकडे उगवत नाही. महिन्यातून एकदा खायच्या सोड्याच्या पाण्याने तो आतून पुसून घेतला की झाले.

साफसफाईच्या बाबतीत मी जागरूक आहे पण अतिचिकित्सक नाही. त्यावरुन चिडचिड करत नाही. काय महत्त्वाचे आहे ते ठरवता आले पाहिजे. अजूनतरी माझ्या घरी राहायला आलेले पाहुणे तुमचं घर अस्वच्छ आहे असे तोंडावर आणि पाठीमागे म्हणालेले नाहीत. म्हणजे बरे चालले आहे म्हणायचे.

सुख लावून घेता आले पाहिजे. आपली ऊर्जा कशावर खर्च करतो आहोत ते समजले पाहिजे.

☆

लेखिका : गौरी ब्रह्मे

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted