सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # २८९
☆ पंख… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
खूप पूर्वी तू कापलेस,
माझे पंख,
मी उडू नये फार दूरवर म्हणून,
पण कुठले बळ घेऊन,
मी उडू शकले—
तुझ्या मनाविरुद्ध…माहित नाही !
तेव्हा ती माझी बंडखोरीच होती,
बाईला चार भिंतीत डांबून,
ठेवणाऱ्या पुरूष प्रधान
संस्कृती विरूद्ध ची!
आठवायचा कुठल्याशा
हिंदी सिनेमातला डायलॉग,
“शरीफ खानदान की औरते,
घरकी चार दिवारी को कैद नही माना करती!”
पण मी ओलांडून उंबरठा,
स्वतःला सिद्ध करताना,
सुखावत होते कुठेतरी,
१९७५ सालच्या,
माझ्या स्त्रीमुक्तीच्या कवितांना,
जागल्याने!
पण या सांजसमयी,
तू व्याधींनी ग्रस्त असताना,
तू माझे पंख नाही कापलेस…..
सक्तीचे बंदी बनण्याचे फर्मान काढून,
त्याला एक सोज्वळ नाव दिलेस,
पातिव्रत्य धर्माचे!
आता मावळले आहे माझे ही तेज,
आणि मी ही —
लावून घेतली आहेत,
घराची सर्व कवाडे आतल्या बाजूने घट्ट!
हे प्रायश्चित्त की पराभव ??
स्वतःच्या स्त्रीत्वाचा !!
माहित नाही !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






