प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३३५
☆ मानवाधिकार… ☆ प्रभा सोनवणे ☆
☆
कसे जुळतात हे ऋणानुबंध,
माहित नाही!
तसंतर आपली जातकुळीच वेगळी!
पण जुळले मैत्र!
अगदी वर्षानुवर्ष टिकून राहीले !
सुरुवातीला मी अगदी ,
बिचकून दिली होती दाद तुला !
तू ही कधी प्रोत्साहन तर–
कधी प्रहार केलेसच की!
पण सावली वाटली होतीस,
भर उन्हात कधीतरी !
झाले होते सुगंधी,
काही क्षण तुझ्यामुळेच!
आयुष्यातील एका
वळणावर—
भ्रमनिरासच झाला तुझ्याबद्दल!
आणि मग सुरु ….
तुझी माझी तात्विक लढाई!
मी माझ्या मतांशी ठाम!
आणि तू,
निकराने लढत–
अढळपद मिळविण्यासाठी,
केलेले महत्प्रयास!
आणि तू टिकून आहेस,
आजही—
टीकास्त्र सोडतच आहेस!
“मी कुणाच्या बापाला भीत नाही”
चा अविर्भाव आज ही टिकून!
एक मित्र म्हणाला होता —
कोण धुतल्या तांदूळा सारखं आहे ❓️
नव्हतं पटलं तेव्हा !
जे पटलं नाही त्याचा विरोधच केला मी स्पष्ट !
दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून–
मी लढत नाही कधीच!
माझ्या आवाक्यानुसार पाजळते शस्त्र!
पण त्या पलिकडचं एक नातं असतं दिल्याघेतल्या क्षणांचं !
त्या नात्याशी प्रामाणिक राहूनच
हे आपलं युद्ध!
तुझा निकराचा लढा माझ्याशीच नव्हे साऱ्याच व्यवस्थेशी!
(स्वतःची चूक असतानाही)
मी ठेवले आत्ताच खाली माझे शस्त्र तुझ्या विरोधातले!
शरणागत होऊन नाही !
तुझ्या चिवट ठामपणाला–
सलाम करण्यासाठी!
आजकाल आहेच ना,
प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीनुसार
वागण्याचा मानवाधिकार!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





