image_print

श्रीमती सुधा भोगले

📖 वाचताना वेचलेले 📖 

☆ मी एक भूमिगत -भाग २ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले ☆  

(असा उपयोग बरेच ठिकाणी झाला व यश आले (च्या पुढे)🡪)

दि. ३१-१२-४२ रोजी मी भिवंडीत होतो. मात्र वर्तमानपत्रे मी फरारी झालो आहे असे सांगत होती. मी फरारी आहे असे जाहीर झाल्यानंतर सरकारने अगदी फोटो सहित माझी सर्व माहिती गोळा केली. व पोलिसांजवळ दिली. अखेर हुलकावण्या देता देता २२-१-१९४३ रोजी मला मुंबईत अटक झाली. मी भाई कोतवाल कटात आहे अशी बहुधा त्यांची खात्री झाली होती. मला ते त्या कटात गुंतवणार होते आणि म्हणूनच त्यांनी माझी भिती घेतली असावी. साळवी फौजदारानी अटकनाट्याचा सर्व खुलासा केला. एक फोटो दाखवला तो आमच्या चर्चा मंडळातला होता. माझे विद्यार्थी श्री सिकंदर अन्सारी यांनी फोटो काढला होता. त्यांच्याजवळून शाळेतल्या कोणी शिक्षकाने तो मागून घेतला आणि अवघ्या दहा रुपयात तो पोलिसांना देऊन टाकला. देशभरातील मोठ्या शहरात माझा तपासासाठी पोलिस गेले होते.  बक्षीसही जाहीर झाले होते. श्री. होनावर यांना मला पकडल्याबद्दल बक्षीसाचे पैसे मिळाले. माझ्या नावावर पैसे जमा करतो म्हणाले.  पण मी ती रक्कम गुप्त संघटनेकडे जमा करा असे सांगितले, ते त्यांनी मान्य केले. मी मात्र त्या प्रलोभनापासून अलिप्त राहिलो. विसापूर जेलमध्ये असताना माझी बहिण भेटायला आली. हे गाव अगदी आडवळणावर होते.  वाहनाची सोय नव्हती. त्यामुळे भेटायला येणाऱ्यांना खूप त्रासाचे पडे. नियमानुसार भेटीची वेळ सायंकाळी चार ते पाच अशी होती. मला ऑफिसात बोलवण्यात आले. श्री नूलकर जेल सुपरिटेंडेंट होते. ते मला नियम सांगून नियमाप्रमाणे तुला तुझ्या बहिणीला भेटता येणार नाही असे म्हणाले. मी तत्वभ्रष्ट व्हावे असा ते प्रयत्न करीत असावेत. मी नियम मोडून भेटीला जाण्याचा स्पष्ट नकार दिला. शेवटी थोड्या वेळाने मला परत जेलर श्री निकोल्स यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली. माझी सुटका होत नव्हती, म्हणून माझी आई फार कष्टी होती. पण तरीही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून तत्वभ्रष्ट होण्याचा मोह मी निग्रहाने टाळला. माझ्या आईला सुटका न होण्याचे कारण कळावे म्हणून घरची मंडळी सचिवालयापर्यंत धडक मारून आली होती. सरकारने फार गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवले असे त्यांना सांगण्यात आले.’ माफी मागितली तरच विचार करू’,– माझ्या वडीलबंधूनीच त्यांना नकार दिला. ते म्हणाले,’इथे आम्हाला ही अट मान्य नाही, तिथे तो तर अजिबातच तयार होणार नाही!’ आईचे सांत्वन करण्यासाठी पूज्य सानेगुरुजी आमच्या घरी आले होते. त्यांचे उत्तम स्वागत झाले होते.. गहिंवरून ते माझ्या आईला म्हणाले होते, ‘तुमचे कसे सांत्वन करू? आम्ही सारे सुटलो, बाहेर आलो. तुमचा मुलगा मात्र इतके दिवस झाले तरी सुटत नाही!’ गुरुजींना खरे कारण माहीत असून सुद्धा ते कारण सांगू शकले नाहीत. 15 जानेवारी 1946 रोजी मी जेलमधून सुटलो. तब्बल साडेतीन वर्षानंतर मी मोकळी हवा चाखीत होतो. आमच्या स्वागतासाठी श्री. ग. प्र प्रधान आले होते. माझी सुटका झाल्यानंतर माझ्या आईला आणि सर्वांना आनंदाचे भरते येणे सहाजिकच होते. मी घरी आलो. घरच्या माणसांचा आनंद त्यांनी सत्यनारायणाची पूजा करून व्यक्त केला. गावातील वयोवृद्ध नागरिक, श्री. नानासाहेब जोग यांनी आमच्या घरी येऊन गळ्यात हार घालून माझा सत्कार केला. असाच सत्कार त्यांनी 1932 आली सुटून आलो तेव्हा ही केला होता. आणि माझा सामान्य माणसासारखा जीवनक्रम चालू झाला. भिवंडीतील उर्दू शाळेत त्यांनी मला नोकरीसाठी आग्रहाने परत बोलावले. मी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांत प्रिय शिक्षक होतो. 

मी देशभक्त नव्हतो. सत्तेची किंवा पैशाची हाव कधीच नव्हती. संघटनेत काम करण्याची इच्छा होती. त्या माध्यमातून समाजात नैतिक मूल्यांची जोपासना करण्याची इच्छा होती. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मूल्याधिष्ठित जीवनावर कोणाची निष्ठाच दिसत नव्हती. आज स्वातंत्र्य मिळाले आणि उद्या लगेच निष्ठा नाहीशी झाली असे नव्हे. लोकशाही राबवता राबवता हळूहळू सत्ता आणि संपत्ती या रिंगणात आयुष्य फिरू लागले. माझ्यासारखे तत्व पाळणारे अनेक लोक होते. त्यांना खड्यासारखे बाहेर टाकून देण्यात आले. आमच्यासारख्यांची तत्त्वनिष्ठा नव्या राजकारणी लोकांना पेलण्यासारखी नव्हती. मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक नव्या राजकारणाने सामावून घेतले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. आम्ही सत्ता आणि संपत्तीच्या मोहात पडलो नसतो असे वाटत आहे. त्यामुळे असे म्हणायला, आम्हाला जागा मात्र नक्की आहे की ध्येयनिष्ठ दूर न करता त्यांना सामावून घेतले असते तर वेगळेच काही घडले असते.  

भारत माता की जय!भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!

समाप्त

प्रस्तुती श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments