रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ किती सुंदर भांडण!… कवयित्री: अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

किती सुंदर भांडण !

(घरोघरी चालणारं,

डोळ्यात आनंदाश्रू आणणारं!)

 

माझे भांडखोर आई-बाबा

 

लहानपणापासून बघतेय मी,

आई-बाबा सतत भांडायचे,

आता सत्तरी उलटली तरीही,

तेच सुरू त्यांचे !

 

खूप दिवसांनी, दोन दिवसांसाठी,

गेले होते मी माहेरी,

बाबा बाहेर गेल्या गेल्या,

आईच्या सुरू झाल्या तक्रारी.

 

रोज सकाळी सकाळी तुझे,

बाबा जातात फिरायला,

मी ही जाते, कोपऱ्यापर्यंत,

त्यांना रस्ता क्रॉस करून द्यायला.

 

कानाला काहीतरी बांधा म्हणते,

किती गारठा असतो हल्ली,

ऐकत तर नाहीतच,

वर उडवतात माझीच खिल्ली.

 

रोज ह्यांच्या मित्रांपैकी आणतं,

कुणीतरी काहीतरी खायला,

बॉर्डरलाईन शुगर आहे आपली,

आता सांभाळून नको का राहायला ?

 

घरी आल्यावर खुशाल बसतात

तासभर वाचत पेपर,

धुणेवाली बाई निघून गेली तर,

पुन्हा माझ्याच डोक्यावर खापर !

 

ऐन बाराच्या उन्हात म्हणतात,

जरा बँकेत जाऊन येतो,

एन्ट्री आणतो, बिलाचं बघतो,

अन देवाला दोन हार घेतो ”.

 

अमेरिकेतून तुझा भाऊच इथले,

सांभाळतो, ग, सगळे व्यवहार,

पण ‘मी’ उन्हात नका जाऊ म्हणाले,

की हे जाणार, म्हणजे जाणार !

 

तुझ्या ताईने ‘मोबाईल’ घेऊन दिलाय,

इमर्जन्सीत सोबत असावा म्हणून,

तेव्हढा बरोब्बर घरी विसरतात,

कितीही सांगा शिरा ताणून !

 

इतकी वर्ष सांगतीये तरीही,

तितकेच भरभर जेवतात,

वाघाच्या अन ह्यांच्या शर्यतीत,

अजूनही हेच जिंकतात.

 

रोज संध्याकाळी मुलांच्या फोन्सची

वाट बसतात बघत,

मी म्हणते, ‘’अहो, मुलं बिझी असतात, ”

तरीही घुटमळतात येरझाऱ्या घालत.

 

परवा म्हणे, ”पंखा पुसतो, ”

अन घेतलं स्टूल चढायला,

आता ह्यांचं का वय राहिलं,

असली कामं करायला ?

 

तेव्हढ्यात बाबा आले फिरून,

म्हणाले, ”चला वाढा ”,

मी काही बोलणार, तितक्यात,

बाबांनी, सुरू केला त्यांचाही पाढा.

 

नका करत जाऊ, ‘स्वतः’ चार जिन्नस,

सांग जरा तुझ्या आईला,

फुकटचा का पगार द्यायचा,

स्वैपाकाच्या बाईला ?

 

खावं-प्यावं, मजेत राहावं,

कशाला ते धरावे उपास,

आता काय मिळवायचं राहिलंय,

आता कशात होणार नापास ?

 

अजून एक तिला समजावून सांग,

ती घेत नाही नीट औषधं-गोळ्या ”,

आई म्हणाली आतून, ”चला,

झाल्यात गरम-गरम पोळ्या ”.

…………………………..

………………………….

केला मी देवाला नमस्कार,

डोळ्यांतून अश्रू सांडत,

म्हटलं,

देवा, ह्या दोघांना,

असेच ठेव भांडत !”

 

अगदी हृदयास स्पर्शून गेले हे भांडण.

फक्त आपल्या पिढीपर्यंतच मर्यादित राहील का हे भांडण?

 

माहीत नाही या बाबतीत कोणाचे काय मत आहे मात्र या भांडणात पती- पत्नी संबंधात जो गोडवा आहे तो जगात कोणत्याच संबंधात दिसत नाही.

 

पति – पत्नी एकमेकांस किती पूरक असतात, याचे हे भांडण ज्वलंत उदाहरण आहे.

तसे पाहता हे भांडण जरूर आहे परंतु यात प्रेम भरभरून आहे हे मात्र तितकेच खरे.

कवयित्री:अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments