सुनीला वैशंपायन
इंद्रधनुष्य
☆ खोकला दूर करणारी देवी… लेखक : श्री नीलेश बने ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆
खोकला दूर करणारी देवी मुंबईत आहे, हे माहित्येय?
एखादी गोष्ट मानवी प्रयत्नांच्या पलीकडे गेली की, माणूस देवाचा आधार शोधतो. खोकल्यासारखा सामान्य आजार अनेकदा एवढा चिवट बनतो की, भल्याभल्यांना हैराण करतो. अशा वेळी माणसानं तिथंही देवाचा आधार शोधलाय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे खोकलादेवी! खोकला बरा व्हावा म्हणून जिच्याकडे धावा केला जातो, अशी खोकलादेवी मुंबईतील काही देवळांमध्ये आढळते.
मुंबईतल्या माहीमच्या शितळादेवी मंदिराच्या आवारात खोकलादेवीचं एक छोटंसं मंदिर आहे. खोकल्याचा त्रास, छातीत कफ साचणं आणि फुफ्फुसांशी संबंधित विकारांपासून आराम मिळावा, या श्रद्धेने भाविक इथे येतात. या देवीला अर्पण केला जाणारा प्रसादही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पीठ आणि मीठ!
मुंबई आणि त्याच्या आसपासचा परिसर कायमच दमट हवामानासाठी ओळखला जातो. समुद्रानं वेढलेलं, दमट हवा आणि पावसाचं मोठं प्रमाण असलेलं हे शहर. त्यात गेली दीडशे वर्षं मुंबईत सातत्यानं बांधकामं होत आली आहेत. अगदी सात बेटांमधल्या खाड्या बुजवण्यापासून ते आजच्या टोलेजंग टॉवर्सच्या उभारणीपर्यंतच्या या प्रवासात धूळ हा या शहराचा अविभाज्य भाग बनली आहे.
बांधकामाची धूळ, प्रदूषणाचा धूर, दाट वस्ती आणि समुद्रकिनाऱ्यावरचं दमट हवामान, अशा अनेक गोष्टींचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आला आहे. ब्रिटिशांनीही त्यांच्या युरोपला पाठवलेल्या पत्रव्यवहारात मुंबईच्या दमट हवामानाविषयी तक्रारी केल्याच्या आढळतात. अशा वातावरणात खोकला हा सर्वसामान्य आजार होता आणि आजही आहे. वैद्यकीय सुविधा मर्यादित असलेल्या काळात खोकलादेवी अनेकांचा श्रद्धेचा आधार होती. आजही खोकल्याचा त्रास अति झाल्यावर या मंदिरात येणारे भाविक आहेत.
गोविंद नारायण माडगावकर यांनी १८६३ साली ‘मुंबईचे वर्णन’ हा ग्रंथ लिहिला. मुंबईचा भूगोल, इतिहास, समाजजीवन, चालीरीती, व्यापार, देवदेवता आणि तत्कालीन लोकजीवन यांचं तपशीलवार वर्णन या पुस्तकात आहे. मुंबईच्या जुन्या ग्रामदेवतांची माहिती देताना खोकलादेवीचाही उल्लेख येतो. म्हणजे खोकलादेवीची नोंद एकोणिसाव्या शतकातच झालेली आहे. आज आपल्याला तिचं छोटंसं मंदिर दिसत असलं, तरी या श्रद्धेची मुळं जुन्या मुंबईच्या लोकजीवनात आहेत.
१८६३ च्या मुंबईचे वर्णन या ग्रंथात खोकलादेवीची नोंद सापडणं ही केवळ एका लोकदेवतेची ऐतिहासिक नोंद नाही. मुंबईकरांच्या आरोग्यविषयक चिंता आणि त्या चिंतांशी जोडलेल्या श्रद्धा कित्येक पिढ्यांपासून अस्तित्वात असल्याचीही ती खूण आहे. आज वैद्यकशास्त्रानं खोकल्यावरील उपचारांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे काहींना खोकलादेवीचं नाव ऐकून हसू येईल. पण या नावामागे मुंबईच्या लोकजीवनाचा एक रंजक इतिहास दडलेला आहे.
माहीमच्या शितळादेवी मंदिराचा इतिहासही रंजक आहे. हे मंदिर कोळी समाजासाठी महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या परिसरात अनेक देवदेवतांची छोटी-मोठी स्थानं आहेत. जुन्या विहिरीलाही विशेष महत्त्व आहे. या विहिरीच्या पाण्याने त्वचेचे विकार दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पूर्वी आजारपणात या पाण्याचा उपयोग करण्याची परंपरा होती, असंही सांगितलं जातं.
आणखी एक गंमत म्हणजे खोकलादेवीचं स्थान फक्त माहीमपुरतं मर्यादित नाही. माटुंग्यातील सात आसरा मनमाला देवी मंदिरातही खोकलादेवीची मूर्ती आहे. या मंदिरात मनमाला, कान्होपात्रा, चंपावती, केवडावती, जरीमरी, शीतलादेवी आणि खोकलादेवी अशा लोकदेवतांची स्थानं आहेत. या देवतांना स्थानिक परंपरेत सात आसरा म्हटलं जातं. त्यांपैकी जरीमरी, शीतलादेवी आणि खोकलादेवी यांचा आजारांशी संबंध जोडला जातो.
मालाडच्या पाटलादेवी मंदिरातही खोकलादेवीचं स्थान आहे. पाटलादेवी आणि शीतलादेवी यांच्या मूर्तींच्या शेजारी खोकलादेवीची मूर्ती असल्याची माहिती मिळते. प्रभादेवीच्या प्राचीन मंदिराच्या आवारातही खोकलादेवीचं स्थान असल्याची नोंद आहे. वरळीतील दूरदर्शन टॉवरसमोर असलेल्या केदारेश्वर मंदिरातही खोकलादेवीचं स्थान आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेली ही देवस्थानं पाहिली की, खोकलादेवीच्या निमित्तानं मुंबईच्या जुन्या लोकजीवनाचा आणि आरोग्यविषयक चिंतांचा एक वेगळाच पट उलगडतो.
खोकलादेवीची गोष्ट मुंबईच्या हद्दीपलीकडेही जाते. रायगड जिल्ह्यातील चौल येथे शितळामाता मंदिराच्या बाहेर गुलमादेवी, खोकलादेवी आणि खरूजादेवी यांच्या मूर्ती आहेत. विशिष्ट आजारांपासून आराम मिळावा म्हणून संबंधित देवीची ओटी भरण्याची परंपरा असल्याचं स्थानिक बातम्यांमध्ये नोंद आहे.
तसंच, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथेही खोकलाई आणि खरजाई या देवींच्या मूर्तींची नोंद आढळते. सांगोल्याच्या अंबिका मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर या मूर्ती आहेत. जुनाट खोकला, खरूज आणि नायटा यांपासून मुक्ती मिळावी म्हणून त्यांची पूजा केली जाते, अशी माहिती उपलब्ध आहे.
या सगळ्या नोंदी एकत्र पाहिल्या की खोकलादेवीची गोष्ट केवळ मंदिराची गोष्ट राहत नाही. ती सामाजिक इतिहासाची खिडकी बनते. आजारपण ही माणसाच्या आयुष्यातली मोठी चिंता होती आणि आजही आहे. त्या चिंतेला सामोरं जाताना माणसानं औषधोपचारांबरोबर श्रद्धेचाही आधार शोधला. या परंपरांमधून तत्कालीन समाज आजारांकडे कसा पाहत होता, संकटाच्या वेळी आधार कुठे शोधत होता आणि आपली आशा कशी जिवंत ठेवत होता, हे समजून घेता येतं.
त्यामुळेच एखाद्या मंदिरात फक्त देवाची मूर्ती नसते; तिथं सामाजिक इतिहास आणि भूगोलही दडलेला असतो. फक्त उघड्या डोळ्यांनी तो पाहायला हवा. तुम्हाला खोकल्याचा त्रास असह्य झाला, तर खोकलादेवीच्या दर्शनाला जाण्याआधी डॉक्टरांकडे जा. पण तुमच्या आसपास अशा परंपरा असतील, तर त्या नक्की समजून घ्या आणि आम्हालाही कळवा. कारण त्या आपल्या समाजाची मेडिकल हिस्ट्रीही सांगत असतात, हे विसरू नका.
(ही पोस्ट लेखकानं भेट दिलेल्या काही जागा आणि इंटरनेटवरील माहितीच्या आधारे लिहिली आहे. यात कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नसून, सामाजिक इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न आहे.)
लेखक : नीलेश बने
प्रस्तुती – सुनीला वैशंपायन
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




