सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती इरावती कर्वे यांचा आज स्मृतिदिन.  (१५/१२/१९०५ — ११/८/१९७०) 

मानववंशशास्त्र , समाजशास्त्र , आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्वे, या उच्चशिक्षित होत्या. त्यांनी “ चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण “ हा विषय घेऊन एम.ए. केलं होतं , तर  “ मनुष्याच्या कवटीची नेहेमीची असमप्रमाणता “ या एका वेगळ्याच विषयात जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची पी.एच.डी. मिळवली होती. मराठीबरोबरच संस्कृत आणि इंग्लिश भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात कुलसचिव म्हणून कार्यरत होत्या. लंडन विद्यापीठातही त्यांनी ‘ व्याख्याती ‘ म्हणून एक वर्ष काम केले होते. पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये मानववंशशास्त्राच्या प्रपाठक म्हणून त्या रुजू झाल्या. तिथेच त्यांनी पुरातत्वविद्येतील आजच्या मानवशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला. श्री. सांकलिया यांच्यासह त्यांनी गुजरातमधील लांघजण या मध्यअश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले असता तिथे मानवी अवशेष सापडल्याने त्यांचे हे संशोधन कार्य मोलाचे ठरले.  

निरीश्वरवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी असणाऱ्या या लेखिकेचा, भारतीय संस्कृती, आणि त्यातही मराठी संस्कृती हा जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयावर मराठीबरोबरच त्यांनी इंग्लिश भाषेतूनही लेखन केले. त्यांनी वैचारिक ग्रंथ तर लिहिलेच, पण ललित लेखनही केले.

इरावती कर्वे यांचे प्रकाशित साहित्य :   

१) “ युगान्त “ हा महाभारतावरील समीक्षा ग्रंथ. या ग्रंथाला १९७२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार, आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता. 

२) समाजशास्त्रीय ग्रंथ —आमची संस्कृती / धर्म-पुस्तक / मराठी लोकांची संस्कृती / महाराष्ट्र: एक अभ्यास  /  संस्कृती ( पुस्तक ) / हिंदू समाज – एक अन्वयार्थ / हिंदूंची समाजरचना. 

३)  इंग्लिशमध्ये लिहिलेले १२ वैचारिक ग्रंथ. 

४) ललित लेखसंग्रह —- गंगाजल / परिपूर्ती / भोवरा .—- यापैकी ‘ गंगाजल ‘ च्या ५ आवृत्त्या, आणि ‘ भोवरा ‘ च्या ६ आवृत्त्या निघाल्या होत्या. यावरून त्यांच्या ललित लेखनाचे वेगळेपण दिसून येते.  

“जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे, आणि नवे यशस्वीपणे आत्मसात करणे, असे दुहेरी यश त्यांना लाभले होते ,” असे गौरवोद्गार त्यांच्याविषयी श्री. आनंद यादव यांनी काढले आहेत. तर प्रा. नरहर कुरुंदकर यांनी त्यांना  “ नव्या आणि खऱ्याखुऱ्या ललित निबंधाच्या अग्रदूत “ असे गौरविले आहे. 

त्यांच्या स्वतःच्या इतक्या मोठ्या कार्यकर्तृत्वामुळे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सूनबाई, आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांच्या सुविद्य पत्नी, अशी त्यांची महत्वाची ओळख सर्वात आधी सांगावी हे लक्षातच येत नाही. 

श्रीमती इरावती कर्वे यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments