? इंद्रधनुष्य ?

☆ विठ्ठलभक्त संत कुर्मदास – शकील मुलाणी ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

पैठणमध्ये रहाणा-या 22 वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली…. “ चल लवकर…. कीर्तनाची वेळ झाली…”

आई वैतागून म्हणाली, “ कीर्तन…. कीर्तन…. गुडघ्यापासुन तुला पाय नाहीत, कोपरापासून हाथ नाहीत…. कोण नेईल रोज तुला कीर्तनाला??… 22 वर्षाचा झालायस … आता नाही सहन होत मला तुझं ओझं…”

“ खरं आहे गं !! मी 22 वर्षाचा झालोय.. पण तुझ्या काहीच उपयोगाचा  नाही. वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला. आणि मी जिवंत राहिलो… बिन हाताचा, बिन पायाचा…!! पण त्यात माझा काय गं दोष !! फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला… शेवटचं ..” 

आईचे डोळे डबडबले… शेवटी आई होती ती… आईने अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं… व कीर्तनाच्या ठिकाणी सोडून दिलं… भानुदासमहाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदासमहाराज म्हणजे एकनाथांचे पणजोबा !! कीर्तनाला भरगच्च गर्दी… लोटांगण घेत घेत…. पोटावर फरफटत रस्ता काढत काढत कुर्मदास समोर आला…  पहिल्या रांगेत बसला… गळ्यात तुळशीमाळ…. कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं…. महाराज म्हणाले, “ आलास कुर्मदासा !!” 

“ हो महाराज….”

“ कुणाबरोबर आलास? ”

“ आईनं आणून सोडलं…”

“ अरे कशाला आईला त्रास दिलास…  आता घरी कसा जाशील? ” ,महाराजांनी विचारलं

“ आता मला घरी नाही जायचं…”

हे ऐकून महाराज म्हणाले, “ अरे… आज काल्याचं कीर्तन !! हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला… मग तू कुठे जाशील ?”

” महाराज मी पण येऊ का पंढरीला ? “ 

“ अरे तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं… तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं  लांब ? “

“ तुम्ही फक्त हो म्हणा !! पहा मी येतो का नाही पंढरीला….”

महाराज हसत ” बरं … ये ” म्हणाले…

रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून कुर्मदास उठले.. स्नान केलं व फरफटत, लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला… तांबडं फुटलं… लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला.. “ पंढरीचा रस्ता कोणता हो? “ 

“ इथुन पुढे जा.. पुढे पुन्हा विचारा…” 

सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमानाच्या मंदिरात जाऊन ओरडू  लागला… “ऐका हो ऐका, भानुदासमहाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो ! कुणी कालवण आणावे… कुणी भाकरी आणाव्या ! “  महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती.   भानुदास महाराजांनी बिनाहातापायाच्या कुर्मदासाला पाहून आश्चर्यानं विचारलं…” कुर्मदासा, कसा आलास रे? ”

“ तुमच्या “हो” नं मला आणलं..”  कुर्मदास बोलला..

महाराजांनी सर्वांना भाजीभाकरीचं जेवण दिलं… प्रवचन- कीर्तन झालं- हरिपाठ झाला… महाराज म्हणाले, “ आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा…”

रात्री वारकरी झोपल्यावर , कुर्मदास फरफटत खरडत निघाला… दिवस उगवायला मांजरसुंबा गाठलं… तिथंही त्यानं हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली….. एक एक मुक्काम मागे पडू लागला…लोळण घेऊन घेऊन अंगाची पूर्ण चाळण झाली होती… परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच….. विठुरायाची भेट! !!

येरमाळा, बार्शी… असं करत करत शेवटी कुर्डुवाडीच्या पुढे 7 की.मी वरचं लऊळ गाव आलं … तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागुन आली.. सर्वांची जेवणं झाली… कुर्मदास एका कोप-यात विव्हळत पडला होता. भानुदासमहाराज त्याच्याजवळ आले— त्याला म्हणाले, 

“ कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे… मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील…

“ नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला…”

“ अरे असं का म्हणतोस कुर्मदासा ? एवढ्या लांब आलास… आता फक्त एका मुक्कामावर आलीय पंढरी !!! “ 

कुर्मदासाला बोलणंसुध्दा असहाय्य झालं होतं… तो पालथा होता तो उताणा झाला… त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्यात असंख्य खडे रूतलेले होते. रक्त वहात होतं. कुर्मदास थकून गेला होता. बोलण्याचंदेखील त्राण नव्हतं . निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं… परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता…. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला… 

“ महाराज, मलमूत्र  कोण धुवेल माझं? घरी आई धुवत होती.  इथं कोण ? “… म्हणून अन्न पाणी सोडलं…” 

कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदासमहाराजांचे डोळे डबडबले….” कुर्मदासा !! काय केलं हे “ 

“ महाराज, घरी राहून काय केलं असतं…. निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी… महाराज, आता फक्त एकच करा… पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा… आणि त्याला सांगा.. हे पांडुरंगा !! तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात नाही पहाता आले चरण…. माझा एवढा निरोप द्या…”  असं म्हणून तो तिथंच विव्हळत पडला…. भानुदासमहाराजांचे पाय जड झाले… कुर्मदासाला तसेच सोडून ते पंढरपुरात आले. स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला उभे राहीले… पांडुरंगाकडे पाहिलं…. पांडुरंगाने भानुदासाकडं पाहिलं…. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं…

पाडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, “ रखुमाई,  तु वारी सांभाळ… मी माझ्या भक्ताला– कुर्मदासाला लऊळला भेटायला चाललो…” — विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास शुध्द हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची चाळण झाली होती. शरीरातून रक्त वहातंच होतं. विठ्ठलानं हाक दिली…” कुर्मदासा अरे डोळे उघड…. बघ मी आलोय …”

मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले…. पहातो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते…”  विठ्ठला… विठ्ठला माझ्या पांडुरंगा “ म्हणत कुर्मदास विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊ लागला… एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली….. त्याचं  शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं. व म्हणाले, “ कुर्मदासा, तू  जिंकलास. तुझं ध्येय पूर्ण झालं… बघ मी स्वतः– तुझा विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे.”

“ होय विठ्ठला…. आता हीच माझी पंढरी!!! “

कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं… व अश्रूभरल्या डोळ्यांनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला……

धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती!!! ??

मित्रांनो, कुर्मदास जातीने मुस्लीम होता… आजही लऊळ येथे त्याची कबर आहे… आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजिरवाणी मूर्ती उभी आहे…. मंदिरावर कळस आणि  कबरीवर गुम्बद आहे…

– शकील मुलाणी

संग्राहक :– प्रभा हर्षे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments