? इंद्रधनुष्य ?

☆ फिरुनी पुन्हा जन्मेन मी ! ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

मध्यप्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये एप्रिल आणि मे मध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला होता. गेल्या चार महिन्यात भोपाळच्या भदभदा विश्रामघाटावर सात हजाराहून अधिक मृतदेहांवर अंतिम संस्कार झाले. दररोज होणारे शेकडो लोकांचे मृत्यु आणि रात्रंदिवस जळणाऱ्या चिता यामुळे हा विश्रामघाट चर्चेत आला होता. भोपाळच्या याच बहुचर्चित भदभदा विश्रामघाटावर सध्या एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. हा प्रेरणादायी प्रयोग भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पहिल्यांदाच घडतो आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

स्मशानभूमीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कोरोनामध्ये जीव गमावलेल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ एक आगळेवेगळे कोविड स्मृतीवन निर्माण केले जात आहे. बारा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर असलेल्या जमिनीवर जपानचे मियावाकी तंत्रज्ञान वापरुन हे नवे घनदाट उद्यान फुलवण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीमुळे ज्यांचे अंतिम संस्कार या स्मशानभुमीमध्ये झाले, त्या सर्व मृतदेहांची राख या उद्यानातील झाडांसाठी खत म्हणून वापरली जात आहे. या बागेमध्ये पन्नासहून अधिक प्रजातींच्या तब्बल साडेचार हजार वृक्षांची रोपं लावली जाणार आहेत. नुकतीच या उपक्रमाची सुरुवात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या पत्नी साधना सिंग यांच्या शुभहस्ते करण्यात आली. 

उद्यानासाठी लागणारी माती विश्रामघाटातील राख, सुपीक काळी माती, शेणखत यांच्या मिश्रणापासून तयार केली गेली. कोरोनाने हिरावून घेतलेल्या आपल्या आप्तस्वकीयांच्या आठवणी वृक्षारोपणाच्या माध्यमातून कायमच्या जतन करण्यासाठी सात जुलैच्या संध्याकाळपर्यंत हे उद्यान सामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात आले होते. या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रिय स्वजनांना गमावल्यामुळे व्याकूळ झालेल्या लोकांनी या उद्यानाच्या निर्मितीमध्ये मोठा हातभार लावला. आपली प्रिय व्यक्ती, तिच्या आठवणी एका वृक्षाच्या रुपात कायमच्या जतन केल्या जातील या भावनेने त्यांच्या मानसिक आघातावर फुंकर घालण्याचे काम केले. 

भदभदा विश्रामघाटाचे सचिव ममतेश शर्मा यांनी सांगितले की एप्रिल-मेमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेमध्ये अनेक लोक केवळ अस्थी घेऊन जात होते. मात्र संसर्गाच्या भीतीने मृतदेहाची राख सावडण्यास कोणीही तयार नव्हते. पंचवीस डंपर एवढे भस्म या विश्रामघाटावर साठले होते. या राखेच्या डोंगरांचे काय करावे असा प्रश्न  उपस्थित झालेला असताना या राखेचा वापर करुन जपानी पद्धतीच्या मियावाकी पद्धतीने दाट वनराईची निर्मिती केली जाऊ शकते अशी एक कल्पना पुढे आली आणि त्यातून या श्रीरामवनाचा जन्म झाला. 

मियावाकी पद्धतीने लागवड केलेली रोपं दुप्पट वेगाने वाढतात. त्यांचा टवटवीतपणा तीव्र उन्हातही टिकून राहतो. या पद्धतीने लागवड केलेल्या वनांचे तापमान आजूबाजूच्या परिसरापेक्षा तीन ते चार अंशांनी कमी असते. येत्या पंधरा ते अठरा महिन्यांमध्ये या इवल्या इवल्या रोपांचे मोठ्या वृक्षांमध्ये रुपांतर होवून लवकरच या ओसाड जागेचा कायापालट होईल. स्मशानभूमीत नंदनवन फुलवणे हे एक मोठे आव्हान होते. कोरोना महामारीच्या आणि भुताखेतांच्या भीतीमुळे चिताभस्मापासून खत तयार करण्याच्या कामास कोणीही तयार नव्हते. शेवटी भोपाळमधील मास्टर ऑफ सोशल वर्क या पदव्युत्तर महाविद्यालयाच्या तरुणांनी हिरीरीने पुढाकार घेतला आणि या उद्यानाची पायाभरणी झाली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे महत्व समजले. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन बेडच्या शोधात वणवण भटकणारे हवालदिल आणि चिंताग्रस्त लोक पाहून ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात त्याची जाणीव प्रत्येक भारतीयाला झाली. भदभदा विश्रामघाटात जी घनदाट वनराई आकार घेत आहे, त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होईल. ही झाडे मोठी होवून येणाऱ्या काळात लोकांना या वनामध्ये छान हवा उपलब्ध होईल. मोकळा श्वास घेता येईल. या रोपांचे वृक्षांमध्ये रुपांतर होईपर्यंत त्यांची निगा राखण्याची जबाबदारी घाट प्रबंधन समितीकडे सोपवण्यात आली आहे. भारताच्या प्रत्येक स्मशानभूमीमध्ये अशा प्रकारची हिरवीगार दाट वनराई उभी केली तर मृताम्यांना खरी श्रद्धांजली मिळेल आणि पर्यावरणाचा, दूषित हवेचा गंभीर प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल.

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments