? इंद्रधनुष्य ? 

☆ खिलाडू वृत्ती जिथे गगनाला गवसणी घालते ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

टोकियो ऑलिंपिकच्या पुरुषांच्या उंच उडी प्रकारातील स्पर्धा शेवटच्या टप्प्यात शिगेला पोहोचली होती…इटलीचा Gianmarco Tanberi व कतारचा Murtaz Essa Barshim हे दोघे, अटीतटीच्या प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकायचेच या ईर्ष्येने जीवाची बाजी पणाला लावत होते…प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोघांनी २.३७ मीटर उंचीचा टप्पा बरोबरीनेच कसाबसा, आटोकाट प्रयत्नांती ओलांडला होता. आता प्रत्येकाला पुढील टप्पा तीन प्रयत्नात ओलांडायचा होता…पण दोघेही तो टप्पा तीन प्रयत्नांतीही  ओलांडण्यात अपयशी ठरले. आता ही कोंडी कशी फुटणार ? मोठा गहन प्रश्न उभा ठाकला. ऑलिंपिक अधिकाऱ्यांनी दोघांना आणखी एक संधी देऊन हा पेचप्रसंग सोडवण्याचे ठरवले. पण यापूर्वीच तीन प्रयत्नादरम्यान इटलीच्या खेळाडूच्या- Gianmarco Tanberi च्या पायाला गंभीर दुखापत झाली होती व नाईलाजाने शेवटची संधी घेण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगत त्याने स्पर्धेतून माघार घेतली. याचा अर्थ कतारचा खेळाडू Murtaz Barshim यास विजयी घोषित करून त्यास सुवर्णपदक दिले जाईल, याची त्याला कल्पना होती. पण त्याचा नाईलाज होता…‌आणि येथे खिलाडूवृत्तीचे विस्मयकारी दर्शन Murtaz Barshim ने दाखवले. त्याने जास्तीचा एक प्रयत्न आजमावून पाहण्याचीही गरज नव्हती. तो गप्प बसला असता तरीही त्यास सुवर्ण पदक मिळाल्याचे घोषित झाले असते. पण त्याने उमदेपणा दाखवित, “मी सुद्धा माघार घेतली तर आम्हा दोघांनाही सुवर्णपदक विभागून दिल्याचे घोषित केले जाईल का? “, अशी पृच्छा ऑलिंपिक अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी विचारविमर्श करून —

‘दोघांनाही ते पदक विभागून मिळेल ‘ असे कळवले..‌‌.कतारच्या खेळाडूने आपली पण माघारी घोषित केली व इटलीच्या खेळाडूला गगन ठेंगणे झाले ! आणि कतारच्या खेळाडूने- Murtaz Barshim नेही सुवर्णपदक न चुकवता ही सर्वोच्च कोटीची खिलाडूवृत्ती आपण दाखवू शकलो, या आनंदाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिठी मारली !

पात्रता नसतांनाही स्वयंघोषित सन्मान मिरवणारे ‘ वीर’ कुठे आणि सन्मानाचा हव्यास न दाखवणारे हे ऑलिंपियन कुठे ? बडा जिगरा चाहिए उमदेपणासाठी !

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments