?इंद्रधनुष्य? 

☆ डालडा…भाग 1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

डालडा सगळ्यांनाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सब्स्टिट्यूट असलेला हा डालडा–त्याचा तो डबाही मोकळा झाल्यावर भरपूर कामांसाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता, की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाचं  नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप– एकेकाळी याच वनस्पती तुपाने संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवलं होतं. पण गंमत अशी की आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं  की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तसं  नाही. या वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत हे त्या माणसाचे नाव. 

भागवत घराणे हे मूळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतलं.  मॅट्रिकच्या परीक्षेत  त्यांना मानाची  “जगन्नाथ शंकरशेठ” शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवाण बनले.

बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली, म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती, आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी १८८६ मध्ये नारायणरावांचा जन्म झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होती. नारायणरावांनादेखील  आपल्या वडिलांच्याप्रमाणे “जगन्नाथ शंकरशेठ” स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले, “ नारायणा, तुझी आर्थिक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस. आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस. “

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून  रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये “ इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ”ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मूलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पास आउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा,  इब्राहिमभाई लालजी यांचा, साबणाचा कारखाना होता. त्यांनी तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

क्रमशः….. 

संदर्भ : विज्ञान विशारद, लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments