श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 १. उत्तरेकडील फर सील

उत्तरेकडील फर सील प्रत्येक वर्षी स्थलांतराच्या वेळी खूप लांबवरचा प्रवास करतात.  सीलची मादी जवळ जवळ ९६०० कि.मी. एवढा प्रवास करते. मे ते नोहेंबर सीलची नवी पिल्लं प्रिबिलॉफ आयलंडवर जन्माला येतात. हे बेट दक्षिण-पश्चिम अलास्का येथे आहे. नर आणि मादी दोघेही त्या बेटापासून दूर पोहत जातात. नर अलास्का गल्फमध्ये थांबतात. पण माद्या खूप लांबचा प्रवास करतात. जवळ जवळ ४८०० कि.मी. एवढा प्रवास करून दक्षिण कॅलिफोर्निया इथे येतात.

२. व्हेलचं स्थलांतर

मार्च-एप्रीलच्या दरम्यान दक्षिण कॅलिफोर्निया येथे सॅन डिआगो बे जवळ करड्या रंगाच्या (ग्रे) व्हेलचं स्थलांतर बघायला मिळते. हे भले मोठे सस्तन प्राणी खरं तर मासे, १९,२०० कि.मी. एवढी राउंड ट्रीप घेतात. ते आपला उन्हाळा, उत्तर पॅसिफिकमहासागरात घालवतात. तिथे क्रीलसारखे छोटे जलचर आणि समुद्री प्राणी खातात. नंतर पानगळीच्या दिवसात ते पुन्हा आपल्या स्थलांतराला सुरुवात करतात. दक्षिण दिशेला , दक्षिण कॅलिफोर्नियाकडील खार्‍या पाण्याच्या सरोवरांकडे ती जातात. गर्भवती माद्या आपला प्रवास आधी पूर्ण करतात. डिसेंबरमध्ये त्या आपल्या पिलांना जन्म देतात. ही पिले ४ मीटर लांबीची असतात. एखाद्या महिन्यानंतर अन्य माद्या तिथे येतात. आणि त्यांचे नराशी मीलन होते. मार्चमध्ये सर्व व्हेल उत्तरेकडे आपल्या उन्हाळी अन्नदात्या क्षेत्रात आपला परतीचा प्रवास सुरू करतात. सन डिअ‍ॅगोच्या किनार्‍यापासून सुमारे दीड किलो मीटर अंतर ठेवून ते प्रवास करतात. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अगणित व्हेल पोहत जाताना पाहण्यासाठी किनार्‍यावर गर्दी करतात.

३. माशांचे स्थलांतर  – ईल आणि सालमन

गोड्या पाण्यातील ईल मासे आणि पॅसिफिक महासागरातील सायमन या माशांचे स्थलांतर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असते. पानगळीच्या दिवसात उत्तर अमेरिकन आणि युरोपियन ईल त्यांच्या गोड्या पाण्यातून अटलांटिक महासागरातील बर्म्युडा बेटाजवळील, सरगॅसो समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथील निरुपयोगी झाडात ते आपली अंडी घालतात आणि नंतर मरतात. अंडी फुटून जेव्हा छोटे जीव बाहेर येतात, तेव्हा ते बोटाच्या नखांएवढे असतात. त्यांना लाव्र्हा असं म्हणतात. या छोट्या लाव्र्हा प्रवाहाबरोबर आपल्या मूळ प्रदेशाकडे वाहू लागतात. या  माठ्या होत जाणार्‍याया ईलपैकी उत्तर अमेरिकेकडून आलेल्या ईलची पिल्ले युनायटेड स्टेटस आणि कॅनडाकडे पोहत जातात. हे स्थलांतर पूर्ण व्हायला जवळ जवळ एक वर्ष लागतं. तरुण युरोपियन ईल सरगॅसोच्या वेगळ्या भागातून प्रवाहाबरोबर पोहू लागतात आणि ते युरोपकडे येतात. त्यांचा प्रवास लांबचा असतो आणि मूळ ठिकाणी पोचायला त्यांना २/३ वर्षे लागतात. जेव्हा ते वेगवेगळ्या काठाने पोहत आपल्या मूळ ठिकाणी परत येत असतात, तेव्हा छोट्या लाव्र्हांमध्ये बदल होत जातो. ते बारीक, निमुळते आणि पारदर्शक होत जातात.  त्यांना ग्लास ईल असे म्हणतात. नंतर ते मोठे होतात आणि त्यांचा रंग काळा होतो. ते काठाशी पोचतात, तेव्हा त्यांना एलव्हर्स असे म्हणतात. नर एलव्हर्स खार्‍या पाण्याच्या बंदरालगतच्या दलदलीच्या प्रदेशात राहतात आणि माद्या पोहत वरच्या बाजूला गोड्या पाण्याकडे येतात. खूप वर्षानंतर त्यांच्या जन्मदात्यांप्रमाने ते पुन्हा गोड्या पाण्यातून खार्‍या सॅरॅगॉन समुद्राकडे आपलं रहस्यमय स्थलांतर सुरू करतात.

पॅसिफिक सालमनचं स्थलांतर याच्या अगदी विरुद्ध असतं. आपलं सगळं आयुष्य खार्‍या पाण्याच्या समुद्रात घालवल्यानंतर, हे मासे जवळ जवळ ३२०० कि. मी. चा प्रवास करून गोड्या पाण्याच्या प्रवाहात अंडी घालण्यासाठी येतात. त्यांना यावेळी, धबधबे, नदीच्या उताराच्या बाजूला वाहणारे वेगवान प्रवाह इ. अडथळ्यांना तोंड देत पोहावं लागतं. शरद ऋतूत, अनेक अडथळे पार करून अंडी देण्याच्या जागी आलेले सालमन अंडी देतात आणि मरून जातात. अंडी फुटतात आणि छोटे सालमन समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. काही काळानंतर ते पुन्हा, जिथे त्यांचा जन्म झाला,  त्याच गोड्या पाण्याच्या प्रवाहाकडे परत येतात .त्यांना परतीचा मार्ग कसा सापडतो?  नक्की माहीत नाही, पण शास्त्रज्ञांना वाटतं,  त्यासाठी त्यांना त्यांच्या घ्राणेंद्रियांचा उपयोग होत असावा.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments