श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४५ आणि ४६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
भक्तीसूत्र ४५.
तरङ्गायिता अपीमे सङ्गात्समुद्रायन्ती ॥ ४५ ॥
अर्थ : दु:संगानें जडणारे विकार सुरुवातीला जरी मंद लहरींप्रमाणे वाटले तरी त्या दु:संगामुळेच ते सागराप्रमाणे विशाल बनतात.
विवेचन : विकार हे नेहमी सौजन्याचा बुरखा घालून येत असतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपल्याकडे परिणामी जे चांगले असते, त्याला चांगले म्हटले जाते. गुढी पाडव्याला आपण कडुनिंबाची पाने खातो, ती खाताना आपल्याला कडू लागतात, पण अंतिमतः ते आपल्या फायद्याचे असते. विषय सुरुवातीला आपल्याला छान वाटतात, पण अंतिमतः मात्र ते मनुष्याचा घात करतात.
या विकारांची बाधा कळून येत नाही. कारण ते अगदी सूक्ष्म प्रमाणात असतात. पण जसा त्यांना विषयांचा संबंध होत जाईल तसे तसे ते समुद्राप्रमाणे वाढत जातात. अग्नीची ठिणगी लहान असते, पण पेंढ्यांची गंजी जाळायला पुरेशी ठरते.
ज्ञानेश्वर माउली सांगतात.
‘देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सावरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥’
(द्न्यानेश्वरी ३-२०४)
पारध्यांनी पसरलेले जाळे हरिणास प्रथम बाधक वाटत नाही पण परिणामी त्यातच त्याचा सर्वनाश असतो. जोपावेतो हे विकार तरंगासारखे अल्प परिमाणात असतात तोपावेतो त्यांतील दोषदर्शन न झाल्यामुळे त्यांचा त्याग शक्य असूनही केला जात नाही. मग एकदा का ते समुद्रासारखे विशाल व्यापक झाले की आवरले जाणे शक्य नाही. सागराचा दृष्टांत देण्यात त्याची भयानकता, विशालता दाखविणे हा उद्देश असावा. सागर तरून जाणे जसे कठीण तसेच हे कामक्रोधादि विकार तरून जाणेही कठीण आहे.
आपण समाजात राहतो. समाजातील बऱ्यावाईट माणसांशी आपला संबंध येणे अगदीच स्वाभाविक आहे. पण त्या वाईट लोकांचा गुण आपल्या अंगी येणार नाही, यासाठी आपण दक्ष रहाण्याची नितांत गरज आहे. काही लोकं घराच्या वाशासारखे असतात, त्यांना टाळणे शक्य नसते. मग त्यांना सोबत घेऊनच जीवन जगावे लागते. यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते. क्रोध आणि काम या प्रमुख विकारांवर आपण ताबा मिळविला तर अर्धे मैदान जिंकले असे समजायला हरकत नाही.
जय जय रघुवीर समर्थ
—–
नारद भक्तिसूत्र ४६
कस्तरति कस्तरति मायाम्? यः सङगान्स्त्यजति यो
महानुभावं सेवते, निर्ममो भवति ॥ ४६ ॥
अर्थ : माया तरुन कोण जातो? मायेच्या पार कोण जातो? जो आसक्तींचा त्याग करतो. जो ममत्व रहित होतो. (तोच मायेच्या पलिकडे जातो.
विवेचन : मागील सूत्रातून दुःसंग हा कसा बाधक आहे व कामादिकांच्या द्वारे सर्वनाशास कारण आहे हे सांगितले. पण या सर्व विकारांचा समूल नाश झाला पाहिजे. केवळ कामक्रोधादिकांचा नाश झाला पण त्यांचे मूळ जी माया ती राहिली तर तिच्यापासून पुन्हा सर्व संसार निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून माया-तरण झाले पाहिजे. ते कोण करू शकतो याचा विचार या सूत्रात केला आहे. प्रथम माया म्हणजे काय पाहिले पाहिजे. उपनिषदे, पुराणे, स्मृती, गीता व संत-वाङ्मयातून, तसेच शास्त्रकारांच्या दर्शन-ग्रंथातून मायेचा फार विचार केला आहे. मायेचीच अविद्या, प्रकृती, प्रधान, कल्पना, संसार, भ्रम इत्यादी नावे आढळतात.
समर्थ म्हणतात,
*”माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे । माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥”*
(दास. १४. १०. ०१)
शुद्ध चैतन्याला जीवदशेत आणून संसारात अडकवणारी ती माया असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे.
*”तैसे भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगे जीव । दशे आले ॥”*
(ज्ञा. ७-६६)
मायेच्या दोन महत्त्वाच्या शक्ती आहेत. आवरण आणि विक्षेप. आवरणशक्तीने चैतन्याच्या विशेष स्वरूपास झाकून ती त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडते हेच अज्ञान.
*”आपुला आपणपया । विसरू जो धनंजया । तेचि रूप यया । अज्ञानासी ॥”*
(ज्ञा. १४-७१.)
ही माया आपल्या विक्षेपशक्तीने ब्रह्मांडस्वरूप सर्व सृष्टी उत्पन्न करते. तसेच जीवाला देहद्वयाचा अहंकार घ्यावयास लावून त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोर्क्तृत्वादी धर्माचा तादात्म्य अध्यास निर्माण करते; असे वेदांतग्रंथांतून म्हटले आहे. माया ही भगवंताची सद्सद्विलक्षण अशी अनिर्वचनीय शक्ती आहे.
जीवाला दुःख शोकात्मक संसार भोगण्याचे कारण केवळ मायाच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
*”दुःख शोकाचिया घाई । मारिलिया सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥”*
(ज्ञा. ७-१०७)
वरील सूत्रात ‘तरति’ हे क्रियापद घेतले आहे ते महत्त्वाचे आहे. तरणे ही क्रिया एखाद्या मोठ्या नदीतून पोहून पलीकडे जाणे, तिचे अतिक्रमण करणे या अर्थी होत असते. गीतेमध्येही सातव्या अध्यायात ‘मायामेतां तरन्ति ते’ असे म्हटले आहे. पोहणे ही क्रिया एखाद्या नदीतून, सामान्य जलाशय, तळे, विहीर, इत्यादिकांतून होत असते. ती अल्पकाळ श्रमपरिहाराकरिता होते. पण पोहणे व तरणे यांत अंतर आहे. जलाशय, तळे, विहीर इत्यादिकांत पोहणारा जेथे पोहण्यास प्रारंभ करतो तेथेच परत येतो. पण तरून जाणे म्हणजे एका तीराहून निघून मधला पाण्याचा भाग ओलांडून परतीराला जाणे. याकरिता महानदी किंवा समुद्रच घ्यावा लागतो. तरुन जाण्यासाठी तर वापरली जाते. आपण सगळे या भवनदीत, अर्थात भवसागरात आहोत असे सर्व संत सांगतात. या मायेला जिंकल्याशिवाय हा भवसागर तरुन जाणे शक्य नाही. भगवंत म्हणतात,
*”माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा| कासेस लागले माझ्या ते चि जाती तरुनिया|| “*
(गीताई ०७. १४)
अंतरंग व बहिरंग असे संगाचे दोन प्रकार आहेत. बहिरंग स्त्री, पुत्र, वित्त, गृहक्षेत्रादी व अंतरंग काम-क्रोध, लोभ, अहंकारादि हे दोन्हीही जीवाला परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. वास्तविक वर पुत्र, वित्त, कलत्रादी विषय बहिरंग म्हटले आहेत. जोपावेतो देह आहे तोपावेतो यांचाही संबंध राहील, मग त्याग कसा होणार? येथे संपूर्ण विषयांचा त्याग हा अर्थ अभिप्रेत नाही. कारण स्वरूपाने ते बाधक नाहीत. बाधक अंश संग म्हणजे आसक्ती, अभिनिवेश, अहंत्व, ममत्व, प्रियत्वबुद्धी होय. तीच साधकाला घातक असते, त्या आसक्तीचा त्याग म्हणजेच संगत्याग होय, पण या विषयांच्या ठिकाणी अनेक जन्माचा संबंध असल्यामुळे नित्यत्व बुद्धी, सुखरूपतेची बुद्धी, अनुकूल बुद्धी असते. केवळ मनच काय पण अंतःकरणचतुष्ट्य सर्व त्या विषयात रंगून जाते. असा हा संग दृढ झालेला आहे.
असे जरी आहे तरी जेव्हा अंतःकरणात विवेक निर्माण होतो तेव्हा अंतःकरण, बुद्धी, विषय यांचे अनित्यत्व पटते व एक वेळा अनित्यत्व, अनात्मत्व पटले म्हणजे तो साधक पुन्हा त्यात अडकला जात नाही. तो विवेक महात्म्यांच्या कृपेविना प्राप्त होऊ शकत नाही.
येथे ‘संगान्स्त्यजति’ असे बहुवचन आहे. संगाचे अंतरंग व बहिरंग असे दोन प्रकार वर सांगितले आहेत. बाह्यसंग काही अवांतर कारणाने म्हणजे दोषदृष्टीने सुटू शकतील पण फार बाधक असणारे अंतरसंग हे विना विवेक ज्ञानाच्या टाकले जाणार नाहीत. याकरिता ”यो महानुभावं सेवते” हे वाक्य सूत्रात आले आहे. येथे ‘महानुभाव’ हा शब्द महत्त्वाचा आहे. मागे अडतीस व एकूणचाळिसाव्या सूत्रात ‘महत्’ पद संतांच्याकरिता वापरले आहे. त्यांनाच येथे महानुभाव असे म्हटले आहे. महान म्हणजे मोठा आहे अनुभव ज्यांना, त्यांना महानुभाव म्हणावे. अनुभव हा एक जीवनाचा स्थायीभाव आहे. जीवनातून अनुभव वगळता येणार नाही. जीवन हे अनुभवस्वरूप असते. अनुभव हा एक ज्ञानाचा प्रकार आहे. मुख्य ज्ञानाचे दोन प्रकार वेदान्तशास्त्रात सांगितले आहेत. स्मृती आणि अनुभव. प्रमाणापासून झालेल्या ज्ञानास अनुभव म्हणतात व अनुभवापासून जे संस्कार होतात त्या संस्कारांपासून जे ज्ञान होते ते स्मृतिज्ञान होय.
अनुभवातही यथार्थ-अयथार्थ, प्रमा अप्रमा (भ्रम) असे प्रकार आहेत. योग्य प्रमाणाने योग्य विषयाचे जे यथार्थ ज्ञान होते त्यास प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान म्हटले जाते. जेव्हा प्रमाणात दोष शिरतो, विषय अयोग्य असतो म्हणजे बाधित असतो. त्याचे जे ज्ञान ते अप्रमा (भ्रम) म्हटले जाते. दोरीवर जर एखाद्याला सर्पज्ञान झाले तर तो भ्रम होय. कारण तो दोरीच्या अज्ञानाने इंद्रियदोषादिकांमुळे झालेला असतो व कालांतराने राहत नाही म्हणजे सर्पभ्रम बाधित होतो. म्हणून तो अनुभवही बाधित, अप्रमा, भ्रम म्हटला जातो. संसारात काही अनुभव प्रमाणभूत म्हणजे खरे असतात व काही अनुभव अप्रमा म्हणजे भ्रमरूप असतात, निष्फल नव्हे बाधक असतात. अनेक विषयांचा अनुभव मनुष्य घेत असतो पण तो टिकत नाही. सुखप्रद होत नाही. तसेच विषय कार्य असल्यामुळे अल्प आहेत. “यदल्पंतन्मर्त्य” जे अल्प ते मर्त्य म्हणजे विनाशी असते असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे. सामान्यच काय पण इंद्रादिक देवांच्या स्वर्गीय अलौकिक अनुभवालाही तुच्छता आहे. तेही अनुभव घेणारे महान म्हटले जात नाहीत. महान अनुभव म्हणजे ज्या अनुभवाचा विषय मोठा, प्रमाण निर्दोष व अनुभव घेणारा अधिकारी योग्य तो महान एक परमात्माच आहे. याचा विचार मागे आला आहे. त्याचा प्रत्यक्ष तादात्म्याने अनुभव भक्तांना येत असतो.
जलात बुडणार्यांना जशी बळकट नौका तारून नेते त्याप्रमाणे या घोर संसारात गटंगळ्या खाणार्या जीवास शांत चित्त असलेले ब्रह्मवेत्ते संतच या संसारसागरांतून तरून जाण्याला मोठा आधार असतात.
जन्माला आलेला मनुष्य मरणार आहे, हे अंतिम सत्य आहे. येताना मनुष्य रिकाम्या हाताने येतो, आणि जाताना रिकाम्या हाताने जातो. इथुन जाताना जर तो सर्व गोष्टींची आसक्ती त्यागून जाऊ शकला, तर त्याला मुक्ति मिळण्याची शक्यता असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत असे सांगतात की प्रापंचिक मनुष्याला, साधकाला परमार्थ मार्गात पत्नी कधीही अडथळा ठरत नसते, तर तिच्याबद्दल असलेले *ममत्व* त्याला बाधक ठरत असते.
काळोखात मनुष्याला भीती वाटते. पण त्याचवेळी त्याला जर कुठे अग्नी दिसला, तर त्याची थंडी, भय आणि अंधार तिन्ही एकाच वेळी नष्ट होतात. त्यासाठी भगवंताचा आश्रय सर्वोत्तम ठरू शकतो.
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– भक्ती सूत्र क्र. ४५ आणि ४६.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






