श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

 नारद भक्ती सूत्र क्र. ४७ 

यो विविक्तस्थानं सेवते, यो लोकबन्धमुन्मूलयति, निस्त्रैगुण्यो भवति, योगक्षेमं त्यजति ॥ ४७ ॥

अर्थ : जो एकांतवासाचे सेवन करतो, लौकिक संबंधांमुळे निर्माण झालेली बन्धने तोडून टाकतो, जो तीन गुणांनी रहित होतो आणि जो योग व क्षेमाचाही त्याग करतो, तो माया तरून जातो.

विवेचन :  साधनाचा विचार करीत असता त्याचे अंतरग व बहिरंग असे प्रकार संभवतात हे पूर्वी सांगितलेच आहे. अंतरंगसाधनांना बहिरंग-साधनाची आवश्यकता असते. संगत्याग हे साधन मागील सूत्रात सांगितले आहे ते सिद्ध होण्याकरिता या सूत्रात ‘विविक्त स्थानं सेवते’ म्हणजे निर्जन एकांतवासाचा आश्रय करतो असे सांगितले आहे. याचा उल्लेख गीतेमध्ये आढळतो.

भगवंत म्हणतात,

“माझ्या ठायी अनन्यत्वें भक्ति निष्काम निश्चळ | एकांताविषयीं प्रीति जन संगात नावड||”

(गीताई १३. १०)

एकांत… समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

“कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठीत जावा काळ । जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥”

(दास. १९. ०८. २९)

अनेक लोकांना एकांत शब्द सोडून देऊ, एकटं राहण्याचीही भीती वाटते. या भीतीमागील एक कारण हे असू शकते की त्यांना आपण एकटेच आहोत या *भीती*ची भीती वाटतं असते. एकांत हा शब्दाबद्दल एक गैरसमज आहे. एकटे रहाणे म्हणजे एकांत. मनुष्य एकटा राहतो. दिसायला तो एकांतात दिसतो, पण स्वतःच्या मनात तो मनोराज्य रचत असतो. याला खरा एकांत म्हणता येत नाही आणि अशा एकांताचा त्या मनुष्याला काहीही लाभ होत नाही. उलट असे करून स्वतः च स्वतःची फसवणूक करून घेत असतो.

एकांताची समर्पक व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. “एकाचाही अंत म्हणजे एकांत. “

संत तुकाराम महाराजांच्या चरित्रात याचे वर्णन आहे. ते भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन एकांताचा अनुभव घेत असतं. ते स्वतःला इतके विसरून जात की जंगलातील पक्षी एखादे झाड समजून त्यांच्या अंगावर खांद्यावर खेळत असतं, बागडत असतं. तेथील लता, वेली त्यांची सोयरी झाली होती.

“वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।। तेणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।।२।।”

साधकाने कोणतेही साधन करावा, चिंतन करावे, ध्यान, भजन असो, मन एकाग्र झाल्या शिवाय त्यात गती प्राप्त होत नाही. अनादिकालीन संस्कारामुळे साधकाचे मन चंचल असते हे प्रसिद्ध आहे. त्याला निश्चळ बनवण्याकरिता काही साधने करावी लागतात.

साधकाच्या चित्तक्षोभाची बाह्य कारणेही दूर होणे आवश्यक आहे. ती विघ्ने म्हणजे स्वजन-परजनांकडून होणारा संसर्ग. तो अनेक प्रकारचा असू शकतो. तो गावातल्या त्या गजबजाटात राहून दूर करता येत नाही, सर्वावर नियंत्रण कसे ठेवता येईल? याकरिता तो संसर्ग टाळणेच अवश्य आहे. या दृष्टीने विविक्त स्थान म्हणजे एकांतवासाचा आश्रय त्या साधकाला घ्यावा लागतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥२॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥३॥शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥४॥ तुका म्हणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥५॥”

(अभंग क्रमांक ३१९५, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

सूत्राच्या पुढील भागात या लोकबन्धमुन्मूलयति असे नारद म्हणतात.

श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की परमार्थाला आपल्या घरापासून सुरुवात करावी. मंदिरातील मूर्तीत राम आहे आणि माझ्या घरातील माणसांमध्ये तो नाही असे कसे होऊ शकेल? पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा यापेक्षाही साधक-भक्ताला लोकेषणा बाधक असते. लोकानी स्तुती करावयास आरंभ केला की तीच प्रिय वाटावयास लागते. पण स्तुतीबरोबर हळूहळू निंदाही होण्याला सुरुवात होते, ज्याला स्तुतीने सुख वाटते त्याला निंदा ऐकून दुःख झाल्याशिवाय राहत नाही. हाच लोकबन्ध होय. श्री जगन्नाथ कुंटे यांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे. निंदा गोड वाटू लागली म्हणजे साधक पक्का झाला. जोपर्यंत साधकाला स्तुती गोड वाटते, तोपर्यंत तो भगवंतापासून खूप दूर आहे असे समजायला हरकत नाही.

पतितपावना देवराया ॥१॥

संसार करितां म्हणती हा दोषी ।

टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु. ॥

आचार करितां म्हणती हा पसारा ।

न करितां नरा निंदिताती ॥२॥

*

संतसंग करितां म्हणती हा उपदेशी ।

येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥

*

धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा ।

समर्थासि ताठा करिताती ॥४॥

*

बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ ।

न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥

*

भेटिसि नवजातां म्हणती हा निष्ठुर ।

येतां जातां घर बुडविलें ॥६॥

*

लग्न करूं जातां म्हणती हा मातला ।

न करितां जाला नपुंसक ॥७॥

*

निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ ।

पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥

*

लोक जैसा लोक धरितां धरवे ना ।

अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥

*

तुका म्हणे आतां ऐकावें वचन ।

त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥

संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सर्वाना सांगतात की, जनाचा त्याग करून त्यांचा संसर्ग स्वकीय, परकीय, शिष्य, भक्त म्हणविणारे असोत का विरोधी असोत टाळून भक्ती करा.

निस्त्रैगुण्यो भवति’

“प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व_रजस_तम|

ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती||”

(गीताई १४. ०५)

सत्त्वगुण सुखसंग व ज्ञानसंगाच्याद्वारा बांधतो, रजोगुण हा आसक्ती काम याच्या द्वारे बांधतो. तमोगुण पूर्ण अज्ञान, मोह, प्रमाद, आलस्य, निद्रा इत्यादिकांच्या द्वारे जीवास बांधतो. जसा मासा हा आमिषाच्या आशेने स्वतःच्या प्राणघातक अशा गळाला अडकतो तसाच क्षेत्रज्ञ जीव या गुणाच्या जाळ्यात अडकतो. गुण म्हणजेच सर्व संसार आहे. कारण सचेतन-अचेतन सर्व सृष्टीही गुणात्मकचआहे, असेच श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले आहे. भक्ताला गुणातीत बनावयाचे असते. त्याला तीन गुणांहून अतीत अशा निर्गुण भक्तियोगाचा आश्रय करावयाचा असतो. तसेच त्रिगुण आले की ते आपला एक प्रकारचा अहंकारही घेऊन येतात. तोही भक्तिमार्गाला प्रतिबंधक आहे म्हणून नारद ‘निस्त्रैगुण्यो भवति’ असे म्हणतात.

योग क्षेम त्यजति

संसारामध्ये बहुतेक जीवाना आपल्या निर्वाहाची चिंता लागलेली असते. जीवनावश्यक पदार्थ अनेक असतात, ते मिळतील का व प्राप्त झालेले टिकतील का ही जीवनाची एक महान समस्या आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती व्हावी व प्राप्त आणि अनुकूल वस्तूचा नाश न व्हावा, त्या आपल्या म्हणून आपणाजवळ अखंड राहाव्या या भावनेला योगक्षेम म्हणतात. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग व प्राप्ताचे रक्षण हा क्षेम असा योगक्षेम शब्दाचा सामान्य अर्थ आहे. या योग-क्षेमाच्याच विवंचनेत बहुतेक माणसे गढून गेलेली आहेत. तसेच अप्राप्त पदार्थाच्या प्राप्तीला काही मर्यादा घालता येत नाहीत, व ते प्राप्त होण्याकरिता सतत प्रयत्नशील राहावे लागते. नाना प्रकारची शुभाशुभ कर्मे करीत रहावे लागते आणि प्राप्ताच्या संरक्षणाकरिताही थोडे श्रम करावे लागत नाहीत. एखादा साधकदेखील या योग-क्षेमाच्या चिंतेने ग्रस्त होणे शक्य आहे. पण ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्या साधकाने आपल्या देहभरण – पोषणाची म्हणजेच लौकिक योग-क्षेमाची चिंता ठेवू नये. कारण देहाचे भरण – पोषण झाले तरी तेवढ्याने सर्व पुरुषार्थप्राप्ती झाली असे नाही. त्या भरण-पोषणातूनही पुन्हा अनेक विकार निर्माण होऊन ते जीवन अशांत बनवीत असतात.

भगवतांचे वचन आहे.

“अनन्य भावें चिंतूनि भजती भक्त जे मज| सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी||”

(गीताई ०९. २२)

मनुष्याला मिळणाऱ्या भौतिक गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाची भूक आपसूक कमी होते. ज्याने जीभ जिंकली, त्याने अर्धा परमार्थ जिंकला असे म्हणतात.

– – संत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग पुरेसा बोलका आहे.

साळंकृत कन्यादान ।

पृथ्वी दानाच्या समान ॥१॥

परि तें न कळे या मूढा ।

येईल कळों भोग पुढां ॥ध्रु. ॥

आचरतां कर्म ।

भरे पोट राहे धर्म ॥२॥

सत्या देव साहे ।

ऐसें करूनियां पाहें ॥३॥

अन्न मान धन ।

हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥

तुका म्हणे सोसे ।

दुःख आतां पुढें नासे ॥५॥

पुढील सूत्रात आपण आणखी दोन गोष्टींचा कसा त्याग करायचा हे पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४७.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments