श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५ आणि ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
– – – श्लोक ५
मना पापसंकल्प सोडून द्यावा |
मना सत्यसंकल्प जीवी धरावा |
मना कल्पना ते नको विषयांची |
विकारी घडे हो जनी सर्व ची ची |५ |
अर्थ : समर्थ मनाला बजावत आहेत की हे मना तू पापसंकल्प (वाईट विचार)सोडून दे आणि त्या जागी सत्यसंकल्पांना (सद्विचार किंवा परमात्मास्वरूपाचे ज्ञान) स्थान दे. हे मना तू विषयांची कल्पना देखील करू नकोस कारण विषयातून नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. आणि मग तशा प्रकारची कृत्ये हातून घडतात. त्यामुळे लोकांमध्ये छी थू होते.
आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, ” मना अंतरी सार विचार राहो ” मग मनामध्ये हे सार विचार म्हणजेच चांगले विचार कायमस्वरूपी राहावेत म्हणून काय करायला हवे ते समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. त्यासाठी सुरुवातीला पापसंकल्प म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करावा लागेल. प्रत्येकाच्या मनात चांगले वाईट असे विचार येतच असतात. त्यातही वाईट विचार लवकर येतात आणि ते नैसर्गिक असते. मग असे विचार घालवले तर त्या जागी दुसरे काहीतरी हवे कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते असे आपण म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात की पापसंकल्प म्हणजे वाईट विचारांचा त्याग केल्यानंतर मनामध्ये सत्यसंकल्पांना म्हणजे चांगल्या विचारांना स्थान द्यावे. आपले मन म्हणजे सुपीक जमीन अशी कल्पना केली तर त्यामध्ये जशा विचारांचे बीज आपण पेरू तसे ते उगवतील, अनेक पटींनी उगवतील. म्हणूनच त्यात सद्विचारांची पेरणी करावी आणि वाईट विचारांचे तण उपटून टाकावे.
पापसंकल्प आणि सत्यसंकल्प या दोन्ही शब्दात ‘ संकल्प ‘हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. संकल्प म्हणजे आपल्याला पुढे जे काही करायचे आहे त्याचा विचार आणि उच्चार मनाशी करणे होय. जेव्हा आपण एखादे धार्मिक कार्य करतो तेव्हा सुरुवातीला गुरुजी आपल्या हातून त्याचा संकल्प सोडतात. म्हणजेच ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे आणि त्याचे परिणामस्वरूप फळ आपल्याला मिळावे असा त्यामागील हेतू असतो. नवीन वर्षात किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी देखील आपण संकल्प करत असतो. विद्यार्थी अभ्यासाचा, उत्तम शरीर प्रकृती कमावण्याचा निश्चय करतात. हे संकल्प साधारणपणे चांगलेच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला होता आणि मग तशी कृती त्यांच्या हातून घडली आणि त्यांच्या संकल्पास मूर्त रूप आले. आधी मनात विचार येतो, त्याप्रमाणे आपल्या जिभेवर ते शब्द येतात आणि नंतर त्याप्रमाणे कृती घडते. म्हणजे विचार, उच्चार आणि आचार ही संकल्पमागील त्रिसूत्री आहे असे म्हणता येईल. मग लौकिक व्यवहारात जर संकल्प एवढा आवश्यक आणि महत्वाचा असेल तर मग अध्यात्मात तर हवाच हवा.
पण असे संकल्प करण्यासाठी मनाचा निर्धार लागतो. त्यासाठी वाईट विचारांचा, कुबुद्धीचा त्याग करावा लागतो आणि त्या जागी सद्विचारांना जाणीवपूर्वक स्थान द्यावे लागते. हे करणे सोपे नाही. त्यासाठी मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावावी लागते. माणसाचे मन हे नेहमी विषयांकडे ओढ घेते. मनाचे विषय, बुद्धीचे विषय आणि इंद्रियांचे विषय माणसाला आकर्षित करत असतात. इथे विषय या शब्दाचा अर्थ वासना (इच्छा)असा घेता येईल. निरनिराळ्या प्रकारच्या वासना आपल्याला आकर्षित करून त्यांच्याकडे ओढत असतात. आपण त्या वासनांना बळी पडतो. म्हणजे आधी विचार येतो, मग आपल्या मुखात तशा गोष्टी येतात आणि नंतर तशी कृती घडते. तसे होऊ नये म्हणून समर्थ आधीच बजावतात की विषयांची कल्पनाच करू नये. एकदा का विषयांची कल्पना म्हणजे त्या विषयांना मनामध्ये स्थान दिले तर त्यांना बळ मिळत जाते आणि मग माणसाची कृती त्याप्रमाणे होते. काम, क्रोध, लोभ, मोह इ. षडविकार आहेत. माणूस विषयाधीन झाला किंवा वासना आणि विकारांना बळी पडला तर समाजामध्ये त्याची छी थू होते, तो माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा राहत नाही.
श्रीरामांनी जीवनात संयमाला स्थान दिले आणि मर्यादांचे पालन केले म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. रावण विद्वान होता, शूर होता, ज्ञानी होता पण तो विकारांना बळी पडला आणि त्यामुळे त्याचे अध:पतन झाले. आपण संयमाची मूर्ती असलेल्या आणि मर्यादापुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचे पूजन करतो, रावणाचे नाही. म्हणूनच विषयांची कल्पना देखील नको असे समर्थ म्हणतात.
आपल्यासारख्या सामान्य आणि संसारी माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न येईल की मग विषय भोगायचेच नाहीत का? जीवनाचा आनंद घ्यायचा नाही का? अशा प्रसंगी श्रीरामांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. श्रीरामांनी जीवनाचा आनंद घेतला परंतु त्यासाठी धर्माने जी मर्यादा आखून दिली आहे, तिचे त्यांनी पालन केले. म्हणून आपल्या धर्मात, संस्कृतीत जे मान्य असेल त्याचा संयमितपणे उपभोग आपण घेऊ शकतो. आणि ते करत असताना सत्यसंकल्पाकडे म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीकडे आपली वाटचाल करू शकतो. हल्ली जग जवळ आले आहे. द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असं आपण म्हणतो. पण प्रत्येक देशाच्या चालीरीती, संस्कृती निराळी असते. ते पाहिल्यानंतर आपल्याकडील नीतिमत्तेच्या कल्पना आपल्याला चुकीच्या वाटू शकतात. परंतु जिथे जसे वागणे योग्य असते तसेच वागायला हवे. इतर ठिकाणी अमुक अमुक गोष्ट मान्य आहे म्हणून आपण इकडेही तसं करायला काय हरकत आहे असा सोयीस्कर विचार आपल्या मनात येऊ शकतो. कारण मनाची धाव विषयांकडेच असते. पण ती गोष्ट आपल्या धर्मात, संस्कृतीत किंवा नीतिमत्तेच्या कल्पनेत बसते का याचा विचार करायला हवा. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय अशी आपली वाटचाल जीवनामध्ये असले पाहिजे. हेच या ठिकाणी समर्थांना सांगायचे आहे.
संकल्प जसा असेल, तसे जीवन घडते. म्हणून समर्थ प्रथम मनाला शुद्ध करण्याचा आग्रह धरतात. मन शुद्ध झाले की मार्ग आपोआप प्रकाशमान होतो; सत्यसंकल्पातूनच श्रेयसाचा प्रवास सुरू होतो.
स्वसंवाद..
- माझ्या मनात वारंवार येणारे विचार कोणत्या प्रकारचे असतात?
- मी जाणीवपूर्वक सत्यसंकल्प करून तो पाळण्याचा प्रयत्न करतो का?
- माझे विचार, शब्द आणि कृती यांमध्ये सुसंगती आहे का?
- विषयांच्या आकर्षणामुळे मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?
- माझ्या जीवनसंकल्पाची दिशा केवळ यशाकडे आहे की मानसिक आणि अध्यात्मिक उन्नतीकडेही?
– – –
– – – श्लोक ६.
नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको रे मना काम नाना विकारी |
नको रे मदा सर्वदा अंगीकारू |
नको रे मना मत्सरू दंभ भारू ||६||
अर्थ : हे मना, क्रोधाला स्थान देऊ नकोस; तो शेवटी खेद आणि दुःख देणाराच आहे. कामवासना नाना प्रकारचे विकार निर्माण करते. मद (अहंकार), मत्सर आणि दंभ (ढोंगीपणा) या विकारांपासून दूर राहा असा समर्थांचा स्पष्ट उपदेश आहे.
मागील श्लोकात समर्थांनी “पापसंकल्प” सोडण्याची सूचना केली. येथे ते त्या पापसंकल्पांचे मूळ असलेल्या विकारांकडे आपले लक्ष वेधतात. मनाच्या अध:पतनाला कारणीभूत ठरणारे हे विकार म्हणजेच षडरिपूंपैकी प्रमुख काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ. त्याबद्दल समर्थ प्रामुख्याने या ठिकाणी सांगतात.
क्रोध हा खरोखरच खेदकारी आहे. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द आणि केलेली कृती अनेकदा नंतर पश्चातापाला कारणीभूत ठरतात. हातातून सुटलेला बाण जसा परत येत नाही; तसेच रागाच्या भरात बोललेले शब्दही.
क्रोध हा क्षणिक असतो; पण त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ मनात जखम करतात. म्हणूनच मोठी माणसे आपल्याला सांगतात की राग आला की थोडा थांबा, एक ते दहा अंक मोजा, श्वास घ्या. कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. हा छोटासा विरामच अनेक अनर्थ टाळू शकतो.
कामभावना ही जीवनातील नैसर्गिक शक्ती आहे. ती नाकारण्याची गोष्ट नाही; पण तिचा अतिरेक विकारांना आमंत्रण देतो. काम म्हणजे केवळ लैंगिक वासना नव्हे; कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी हव्यास हा देखील ‘काम’च.
विवाहमंत्रातील “धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि” हे वचन याच संतुलनाची शिकवण देते. धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा स्वीकार ही आपली संस्कृती आहे. संयमित काम सृजनशील असतो तर त्याचा अतिरेक विनाशकारी ठरतो.
संत परंपरेत तीन ‘एषणा’ सांगितल्या आहेत. वित्तेषणा (संपत्तीची हाव), दारेषणा (सुंदर स्त्रीची अभिलाषा) आणि लोकेषणा (कीर्तीचा हव्यास). या तिन्ही एषणा किंवा वासना मनाला बाहेर खेचतात. अध्यात्माची वाट मात्र अंतर्मुख करते. म्हणूनच ती श्रेयस्कर!
यश, वैभव किंवा कीर्ती मिळाली की मनात ‘मीच केले’ हा अहंकार उद्भवतो. ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘ या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात एक नणंदेचं पात्र आहे. काही चांगलं झालं की ते माझ्यामुळे झाला असं ती सारखं म्हणत असते. हा फुकाचा अहंकार. हा मद म्हणजेच अहंकार साधकाच्या प्रगतीत अडथळा ठरतो.
इतरांची प्रगतीने सज्जनांना आनंद होतो. पण ज्यांना ती पाहवत नाही त्यांना मत्सर निर्माण होतो आणि मत्सरातून द्वेष जन्म घेतो. आणि मग स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा दंभ सुरू होतो. हे असते आभासी मोठेपणाचे प्रदर्शन. जर मनापासून एखादी गोष्ट कोणी करत नसेल तर टिळे, टोपी, गंधमाळा, भगवे कपडे या सगळ्या गोष्टी म्हणजे सोंग आहेत. जो सगळ्या गोष्टी मनापासून करतो त्याला असे प्रदर्शन करण्याची गरज भासत नाही. पांढरे कपडे घालून समाजसेवेचा आव आणणे, वाङ्मयचौर्य करणे हा देखील असाच प्रकार म्हणता येईल.
‘जगाच्या पाठीवर ‘ या चित्रपटात ग दि माडगूळकर यांनी लिहिलेले एक सुंदर गाणे आहे ‘ थकले रे नंदलाला ‘ हे गीत आजच्या परिस्थितीचे अतिशय सुंदर वर्णन करते यातील प्रत्येक ओळ आजच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला लागू पडते. या गीतातील ‘ निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला… ‘ यासारखी ओळ असो किंवा ‘ विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला… ‘ यासारखी ओळ असो त्या आजच्या परिस्थितीचे हुबेहूब वर्णन करतात.
हे विकार सूक्ष्म असतात; पण आत्मविकासाच्या वाटेवर ते खोल दरी निर्माण करतात. राघवाच्या अनंत मार्गावर चालायचे असेल तर बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवावा लागतो. हा मार्ग दुसऱ्यांवर विजय मिळवण्याचा नाही; तर स्वतःवर विजय मिळवण्याचा आहे. साधकाला देहबुद्धी ओलांडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करायची असते. या प्रवासात विकारांवर सतत लक्ष ठेवावे लागते. कारण ते हळूहळू, नकळत मनावर कब्जा करतात.
त्यासाठी मनावर एकदम नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न न करता सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करावी. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोट्या, सातत्यपूर्ण संयमाचे पाऊल अधिक प्रभावी असते.
स्वसंवाद..
- रागाच्या क्षणी मी थांबतो का, की तत्काळ प्रतिक्रिया देतो?
- माझ्या इच्छांमध्ये संयम आहे का, की अतिरेक?
- इतरांच्या यशाने मला आनंद होतो की मत्सर?
- माझ्या यशामागे ईश्वरकृपा आणि इतरांचा देखील वाटा आहे याचे भान मी ठेवतो का?
- बाह्य जग जिंकण्यापेक्षा मी स्वतःवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो का?
– क्रमशः श्लोक ५ आणि ६.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




