श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६१, ६२, ६३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ति सूत्रे : ६१
लोकहानौ चिन्ता न कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् ||६१||
अर्थ : भक्ताने आपला स्व आणि लौकिक व वैदिक कर्मे भगवंताला अर्पण केलेली असतात. म्हणून लोक व्यवहारात हानी झाली तरी त्याने चिंता करू नये.
विवेचन : *श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही, तसे भक्ति करायला शिकवावे लागू नये…! (नारद मुनींची इतकी सूत्रे अभ्यासल्यावर तर अजिबातच नाही…)* तर मनुष्याला श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही…! भक्तिमार्गात जाणे किंवा भक्तीमार्ग लाभणे हे कदाचित दैवाधिन असू शकेल. मागे आपण एक विचार केला की अनुदिनी अनुतापें… अशी स्थिती आल्यावर जर मनुष्य भक्तिमार्गाकडे अग्रेसर झाला तर त्याने तो मार्ग स्वतःहून सोडू नये…
*भक्तीमार्ग अनुसरणे हा एक प्रवास आहे. प्रवासात स्थिर असलेली झाडं आपल्याला पळताना दिसतात… , अर्थात याचे बालपणी जितके नवल अथवा आकर्षण असते, तितके आकर्षण मोठेपणी राहता नाही, कारण आपले वाहन पुढे जात असते, याचे पूर्ण ज्ञान मनुष्याला झालेले असते… *
मनुष्याच्या आयुष्यात येणारी सुखदुःख ही त्या पळणाऱ्या झाडांप्रमाणे खोटी असतात, किंवा आपल्या मनाने तयार केलेली असतात, हे मान्य करण्याचे सामर्थ्य आपल्याला भक्तीच देत असते. परमेश्वर आपल्याला जीवनाचा सारथी आहे. तोच आपला जीवनरथ हाकत आहे आणि आपण त्याच्यावर भार टाकून निर्धास्त झाले पाहिजे ही जाणीव आता साधकाला होऊ लागते. मग तो अधिकाधिक निश्चिंत होऊ लागतो…
भक्तिमार्गात वाटचाल करताना साधक असो व सिद्ध असो सुखदुःख त्याच्या वाट्याला येतातच येतात. कारण त्यामागे त्याचे प्रारब्ध असते. त्याचे त्याला ते भोगून संपवावे लागते. इथे भक्त आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताची इच्छा आहे असे मानून त्यातून अलिप्त होत जातो आणि कर्मबंधांतून मुक्त होत जातो.
एका साधूकडे एक मनुष्य गेला. साधूला म्हणाला की माझ्यामागे भूत लागले आहे. ते मला सोडत नाही. साधूने आपल्या सामर्थ्याने भुताला बोलावले आणि त्याला सांगितले की या मनुष्याला सोडून दे. त्यावर ते भूत म्हणाले की मी आता सोडायला तयार आहे. पण हा मनुष्यच मला सोडत नाही…! सामान्य मनुष्य आपल्या मनाने अशी भीतीची अनेक भुते निर्माण करतो आणि स्वतःच त्यांना धरून ठेवतो, त्यांना चिकटून बसतो आणि आयुष्यभर दुःखी राहतो…
साधकाने कसे वागावे किंवा साधनेच्या विशिष्ठ टप्प्यावर साधकांची मनोवृती कशी असते किंवा असावी याचे वर्णन माउली पुढील ओवीत करतात…
करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥
(ज्ञानेश्वरी १२. ११८)
जय जय रघुवीर समर्थ
– – – –
नारद भक्ति सूत्रे ६२
न तदसिद्धौर लोकव्यवहारो हेयः किन्तु फलत्यागस्तत् साधनं च कार्यमेव ॥ ६२ ॥
अर्थ : जोपर्यंत चिंता न करणे साधले नाही तोपर्यंत साधकाने लौकिक कर्माचा त्याग करू नयेज त्यांना सोडू नये. कर्मफळाचा त्याग मात्र प्रयत्नपूर्वक निष्ठेने करीत रहावे.
विवेचन : काळाच्या पुढे धावती ती काळजी. मनुष्य सर्व काही सोडतो पण तो काळजी सोडत नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की मनुष्याने मनुष्याने नामस्मरणभक्तीच्या सहाय्यानं
काळाच्या छाताडावर नाचावे. पण प्रत्यक्षात मात्र याच्या उलट होताना दिसते…
संताच्या दारी जाऊन आले की मनुष्याला आपण चिंतामुक्त झाल्यासारखे वाटते. पण त्याची काळजी, चिंता घरी पोचण्याआधीच त्याच्या छाताडावर नाचू लागतात.
साधनेत प्रगती होऊ लागली की साधक खऱ्या निश्चिंत होऊ लागतो, पण ती स्थिती कायम राहते असे म्हणणे धाडसाचे ठरते. ज्याप्रमाणे सायकल चालवायला शिकणारा मुलगा सायकल शिकत असतो, तेव्हा तो थोडा थोडा तोल सांभाळू लागतो. त्याला वाटतं आपण सायकल पूर्णपणे चालवायला शिकलो. पण प्रत्यक्षात मात्र तसं होतंच असं नाही… , मनुष्य अनेक वेळा पडतो आणि सायकल चालवायला शिकतो… पण जोपर्यंत त्याच्यात निपुणता येत नाही, तोपर्यंत त्याचे सायकल चालवताना पडणे अगदीच स्वाभाविक असते आणि जोपर्यंत तो निपुण होत नाही, तोपर्यंत त्याने सायकल चालवण्याचा सराव करणे सोडून चालत नाही…
साधकाने असेच करावे असे नारद मुनी आपल्याला सांगत असावेत. साधनेचे विविध टप्पे असतात…! जोपर्यंत नदी सागराला जाऊन मिळत नाही, तोपर्यंत तिची कधी खळखळ, तर कधी शांत प्रवाह असे चालूच राहते. फक्त नदीने वाहणे थांबवून चालत नाही…!
साधकाचे असेच होते असे सर्व संत सांगतात. साधनेच्या काळात देखील थोडीफार भरती ओहोटी असतेच..! घालमेल चालू असतेच…! थोडक्यात साधकाने आपली विहित कर्मे टाकून चालत नाही. जोपर्यंत साधनेत पूर्णत्व येत नाही, तोपर्यंत त्याने आपली विहित कर्म टाकू नयेत. फक्त त्याचे फळ मात्र भगवंताला अर्पण करावे. संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग या सूत्रांचे विवेचन करणारा आहे असे म्हणता येईल.
“नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥२॥ नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥३॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥४॥”
(अभंग क्रमांक 870, सार्थ तुकाराम गाथा. धार्मिक प्रकाशन संस्था)
जय जय रघुवीर समर्थ
– – –
नारद भक्ति सूत्रे ६३
“स्त्रीधन नास्तिकवैरीचरित्रं न श्रवणीयम् ||६३||”
अर्थ : स्त्रिया, धन, संपत्ती, ऐश्वर्य, नास्तिक लोक आणि शत्रू यांचे वर्णन ऐकू नये.
विवेचन : आपल्याकडे सहा विकार प्रमुख सांगितले आहेत. आता विकारांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही…!
दूरदर्शन, दूरचित्रवाणी, चोवीस तास चालणाऱ्या बातम्या, सामाजिक माध्यमे, त्यात भर म्हणून झटपट पैसा देणार अनेक खेळ सध्या मोबाईल वर उपलब्ध आहेत, तसेच आधुनिक जीवनशैली मनुष्याला निसर्गापासून दूर नेत आहे आणि नवनवीन मानसिक, शारीरिक, भावनिक आजारांना आमंत्रण देत आहे. इतक्या व्यवधानातून लक्ष काढून ते *आत*मध्ये वळवणे किती अवघड…!
नारद मुनींच्या काळात फक्त सहा विकार होते. त्यात सुद्धा काम आणि क्रोध हे जास्त महत्वाचे आहेत. या सूत्राच्या सुरवातीला स्त्रीचा उल्लेख झाला आहे. जवळजवळ सर्व साहित्यात पुरुषांना स्त्रीपासून सावधान राहायला सांगितले आहे. थोडा सखोल विचार केला तर मनुष्य स्खलनशील प्राणी आहे. यात स्त्रीपुरूष असा विषय असण्याचे कारण नाही. पण सर्व संतांना हा विश्वास होता की स्त्रिया वाईट मार्गाला जाऊ शकणार नाहीत, पण पुरुषांबद्दल तितका विश्वास त्यांना वाटतं नसावा. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की आजपर्यंत धर्म टिकला तो स्त्रियांमुळेच..!
असो, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रीच्या मोहात पडून अनेक लोक पथभ्रष्ट झाल्याचे आपल्याला आढळेल. गीतेत भगवंत म्हणतात,
“अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया|
स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर||”
(गीताई ०१. ४१)
इथे स्त्री वाईट नाहीच आहे, पण पुरुषांना परस्त्रीबद्दल आसक्ती वाटते ती वाईट आहे आणि यातून त्यांचे पतन होत जाते. आपल्याकडे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यात पहिला आहे धर्म. दुसरा आहे काम, तिसरा आहे अर्थ आणि चौथा आहे मोक्ष.
धर्मावर आधारित आचार, विचार आणि व्यवहार. धर्मावर आधारित काम इथे अपेक्षित आहे. धर्मावर आधारित आचरण, त्यावर आधारित काम आणि त्यावर आधारित अर्थाची प्राप्ती झाली तर मोक्ष नक्कीच दूर नाही.
संत तुकाराम महाराज आपल्या साधनेच्या प्रारंभिक टप्प्यात त्यांचे जे अनुभव आहेत ते अभगांच्या द्वारे लिहिले आहेत. ते म्हणतात,
स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।
काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
*
नाठवे हा देव न घडे भजन ।
लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु. ॥
*
दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें ।
लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥
*
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु ।
परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥
*
(अभंग क्रमांक 239 सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
साधकाच्या मनातून स्त्री आणि पुरुष हा भेद जाईपर्यंत काळजी घ्यावीच लागते. एकदा का साधक पक्का झाला की मग त्याच्यावर या कामक्रोधाचा प्रभाव पडत नाही. मला इथे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक घटना आठवते. परदेशात असताना त्यांना एक तरुणी भेटायला आली. तिने त्यांच्याकडे मागणी केली की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. सामान्य
साधक असता तर त्याने काय केले असते हे सांगणे अवघड आहे, पण स्वामी विवेकानंद तिला म्हणाले की माझ्या सारखा मुलगा कशाला हवा आहे, मातोश्री मलाच आपला मुलगा माना, मी आपल्याला माझी आई मानतो.
गीतेत भगवंत म्हणतात,
“काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण|”
“तीन हीं नरक द्वारें टाळावीं चि म्हणूनियां||”
(गीताई १६. २१)
– – धन मिळवणे हा आपल्याकडं पुरुषार्थ मानला गेला गेला आहे. विहीत मार्गाने धन मिळवणे हा पुरुषार्थ आहे. चोरी करून धन मिळवणे यात कसला आलाय पुरुषार्थ?
संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात धनाबद्दल आपले मत सांगतात.
“जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।
उदास विचारें वेंच करी।।”
(अभंग क्र. 2864, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
साधना करणे म्हणजे स्वतःला अधिकाधिक नव्हें, तर पूर्ण शुद्ध करणे. त्यासाठी निर्विकार होणे. विकार भगवंताने निर्माण केलें आहेत तर वाईट नसणारच, पण ज्याप्रमाणे औषधाची ठराविक मात्रा असते, तसे विकार त्या मात्रेत घेतले तर ते पूरक ठरू शकतात, अन्यथा विकारांची मालिका चक्रवाढ पद्धतीने वाढू शकते.
भक्तिमार्गात अग्रेसर होत असताना साधकाची दृष्टि आणि मनोवृत्ती अशी होते की त्याला सगळीकडे भगवतांचे अस्तित्व जाणवू लागते. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला प्रत्येक गोष्टीत राम दिसतो.
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– नारद भक्तीसूत्रे : ६१, ६२, ६३.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






