सौ. मीनल केळकर
इंद्रधनुष्य
☆ डॉ. कांतिलाल टाटिया… – माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆
डॉ. कांतिलाल टाटिया
डॉ. टाटिया शहाद्याचे. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील गरीब, वंचित आदिवासी बांधवांच्या सेवेत स्वत:ला पूर्ण वेळ झोवूâन दिले. जिल्ह्याच्या काना-कोपNयातील आदिवासीगावे, पाडे, अतिदुर्गम भागातील हान लहान वस्त्या इथे ते जायचे. रस्त्यांची, विहिरींची कामे, एकशिक्षकी का होईना शाळा, वनखाते, तलाठी, पोलीस या ठिकाणांची असंख्य कामे, पाण्याचे टँकर्स, आवश्यक असलेली बी-बियाणे, रोजगार, रुग्णांना, गर्भवतींना धुळ्यापर्यंत आणून उपचाराची व्यवस्था करणं अशा रचनात्मक कामांमध्ये ते बुडालेले असायचे.
जगापासून तुटलेल्या वनवासी जीवांना ते मनापासून आणि जमेल तेवढी मदत करत. आपल्या जुनाट मोटरसायकलवरून उन्हातान्हाची, पाऊसपाण्याची, थंडी-वाऱ्याची पर्वा न करता ते फिरत. घराघराशी संपर्क ठेवत. त्यांच्या लग्नकार्य, सणा-वारात, उत्सव-समारंभात सामील होत.
एकदा त्यांच्या वाहनाने दगा दिला. त्यांना गंभीर अपघात झालाा. पायाचे हाड मोडल्याने प्रदीर्घ काळ दवाखान्यात बेडवर पडून राहणे भाग पडले. ही बातमी खेडोपाडी पोचली आणि डॉ. टाटियांच्या समाचाराला येणाऱ्या वनवासी लोकांची रीघ लागली.
त्यात उघडेवाघडे पुरुष, ठिपक्या ठिपक्यांच्या तांबड्या फडक्या डोक्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या शेकडो लेकुरवाळ्या बहिणी होत्या. म्हातारे-म्हाताऱ्या, तरुण मुलं, मजूर, झाडून सगळे भेटायला येऊन जात होते. आठवड्याकाठी एखादी दहा रुपयाची एखादी नोट कशीबशी पाहायला मिळणारी, ३-४ रुपये रोजावर कंबरतोड मेहेनत करणारी ही शापित माणसं… भेटीनंतर त्या दवाखान्याच्या आवारातच ठिय्या मारून मिरच्या भााकरी बांधलेली कळकट फडकी सोडून पोटात भरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत घरी जात. उसने-पासने घेतलेले पैसे बस भाड्यासााठी खर्च करून आणि तेही शक्य नसेल, तर मैलोनमैल रस्ता अनवाणी पायंनी तुडवत, रस्ता विचारत विचारत ही माणसे डॉक्टरांना बघायला रांगेने येत होती.
– – भेटणं कसं? एक एक जण घाबरत घाबरत बेडजवळ जाई. शिस्तीत आवाज न करता डॉ. टाटियांचा हात हातात घेई. आया-बाया त्यांची बला घेत. म्हातारी-कोतारी माणसं त्यांच्या डोक्यावरून, कपाळावरून, गालांवरून मायेने हात फिरवीत आणि गहिवरलेल्या अहिराणीत आशीर्वाद देत… पण हा व्हिजिटर एक गोष्ट न चुकता करीत होता. निरोपाचा रामराम झाला, की डॉक्टरांच्या उशीखाली त्यांचा हात जाऊन बाहेर येई. टाटिया कुटुंबातील कुणालाच कळेना, हे काय आहे? एकाला विचारल्यावर उत्तर मिळालं, `काही नाही भाऊ, आहेर करना पडस, आजारी मानुसले. ‘
– – हे ऐकताक्षणी डॉ. टाटियांनी चटकन उशी बाजूला करून पाहीलं आणि बघणारे सगळे थक्क झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं. काही क्षणातच त्या पाण्याचं अश्रूधारा आणि हुंदक्यात रुपांतर झालं.. उशीखाली एक रुपया, दोन रुपये, पाच रुपयांच्या बारीक घड्या घातलेल्या असंख्य मळक्या नोटा, चार आणे, आठ आणे, अगदी दहा-वीस पैशांचीसुद्धा काही नाणी होती.
– – आजारी माणसाला उपचारांचा न झेपणारा खर्च असतो आणि त्याचे मित्र, सगेसंबंधी, जातभाई, रक्ताची माणसे यांनी त्यात जमेल तेवढा खारीचा वाटा उचलणं, हे त्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं, या धारणेतून निर्माण झालेली `आजारपणाच्या आहेरा’ची पिढ्यान पिढ्या सुरू असलेली परंपरा ही माणसं डॉ. टाटियांच्या बाबतीतही इमानाने पालत होती.
खरं तर हॉस्पिटलचं बील बरंच होणार होतं. आणि टाटिया परिवारही काही फार श्रीमंत नव्हता. ही `आहेराची’ सगळी रक्कम मोजली, तरीही दवाखान्याच्या एका दिवसाच्या खर्चाहून अधिक होणार नव्हती. पण एक रुपया, दोन रुपये यांची किंमत काय असते, हे धुळे जिल्ह्यातल्या त्या निष्कांचन, आदिवासी भागात गेल्याशिवाय कुणाला कळणार नाही.
हे आदिवासी जिथे या जगात आले, वाढले आणि जिथे त्यांचा जन्मभरचा रहिवास असणार होता, त्या जंगलातच उगवून वाढलेल्या झाडांइतकीच नैसर्गिक आणि तेवढीच उंची असलेली अशी ही `सहजीवनश्रद्धा’ आहे, नाही का?
अशी `मेडिकल इन्शुअरन्स स्कीम’ त्यांच्या अक्षरशत्रू पूर्वजांना शेकडो वर्षापूर्वी सुचली आणि तिचं एका गुप्त व अखंड चालणाऱ्या परंपरेत रुपांतर झालं असणार.
(धुळ्याचे कार्यकर्ते व मार्गदर्शक धरमचंद चोरडिया यांनी पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला किस्सा)
माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे
प्रस्तुती: सौ. मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





