श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘सुगंधययोग’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
इंद्रियभोगातून आत्मबोधाकडे
— सुगंधाच्या माध्यमातून जीवनसमृद्धी व* *अध्यात्माचा सेतू*
प्रास्ताविक:
भारतीय जीवनदृष्टीत सुगंध हा केवळ इंद्रियांचा विषय नाही. तो दृश्य नाही, स्पर्श्य नाही; तो आसमंतात, सर्वत्र व्यापून राहतो. तो स्मृती चाळवतो, मन शांत करतो, शरीरावर परिणाम घडवतो, व्यक्तीला प्रमुदित, उल्हसित करतो तर साधकाला अंतर्मुख करतो.
म्हणूनच भारतीय शास्त्रपरंपरेत सुगंधाला भोग आणि योग यांच्यातील सेतू मानले गेले आहे. गंध हा स्थैर्याचा, धारणा-शक्तीचा, पोषणाचा गुण आहे. जिथे सुगंध आहे, तिथे तृप्त जीवन आहे.
गंधशास्त्र : भौतिकतेपासून अध्यात्मापर्यंत
आज ‘परफ्यूम’ हा शब्द ऐकला की लक्झरी, उच्छृंखलता, स्वैरता, सौंदर्य, आकर्षण यांची आठवण होते. परंतु भारतीय गंधशास्त्रात सुगंधाचा उद्देश केवळ आकर्षण नव्हता; तो आरोग्य, मनःशांती, सामाजिक प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती यांचा एकत्रित विचार करत होता.
रामायणात अयोध्येचे वर्णन येते. त्यात ‘ नगरातील पुष्पवाटिका सुगंधाने भरलेल्या आहेत ‘ असा आवर्जून उल्लेख केलाय महर्षींनी. इथे राज्याची समृद्धी सुगंधाने व्यक्त होते. समृद्ध समाज सुगंधलोलुप असतो. गृहस्थाने ऋतुमानानुसार सुगंध धारण करावा असे शास्त्र सांगते. हे भारतीय समृद्ध संस्कृतीचे सूक्ष्म संकेत आहेत.
गंगाधरकृत ‘ गंधसार ‘
सर्व गंधांचे सार
या गंधपरंपरेचे शास्त्रबद्ध रूप म्हणजे _’गंधसार’. _ ‘गंगाधरा’ने रचलेला हा ग्रंथ सुगंधनिर्मिती, इत्र, धूप, सुगंधी तेल, अंगराग, अंगलेप, सौंदर्यप्रसाधने आणि औषधी गंध यांचे तंत्रशुद्ध विवेचन करतो. “सर्व गंधांचे सार” हे नाव केवळ काव्यमय वर्णन नाही; ते ग्रंथाच्या आशयाचे नेमके वर्णन आहे.
हा ग्रंथ केवळ शृंगार, भक्ती, पूजेसाठी नाही, तर तो
वैद्यांसाठी,
राज सभांसाठी,
जनसम्मेलनांसाठी,
उत्सव – महोत्सवांसाठी,
शोभायात्रांसाठी
व्यापाऱ्यांसाठी, आणि
साधकांसाठीही आहे.
श्लोकबद्ध विज्ञान आणि सौंदर्य
गंधसार श्लोकबद्ध ग्रंथ आहे. परंतु हे काव्य अलंकारासाठी नाही; ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय, त्यातील गंधशास्त्रसिद्धांत स्मरणसुलभ व्हावेत म्हणून. हे सूत्ररूपात मांडलेले ज्ञान – विज्ञान आहे.
सुगंधीं पुष्टिवर्धनम ।
गंध मनाला प्रसन्नता देतो आणि शरीराला पुष्टी देतो. गंधसार हीच भूमिका स्वीकारतो.
सुगंधांचे वर्गीकरण : द्रव्य आणि गुण
गंधसारमध्ये सुगंधांचे वर्गीकरण पुष्पगंध, काष्ठगंध, मूलगंध, फलगंध आणि प्राणिज गंध असे केले आहे. हे वर्गीकरण केवळ भौतिक नाही; ते गुणात्मकही आहे.
चंदनाचा गंध शीत, प्रसन्न, सत्त्ववर्धक आहे.
अगरुचा गंध उष्ण, स्थिर, वातशामक आहे.
कस्तुरी प्राणिज असूनही चेतनाशील आणि शक्तिवर्धक आहे.
म्हणूनच गंध हा द्रव्य आणि गुण यांच्यातील दुवा ठरतो.
कामसूत्रातील गंधयुक्ती : सुगंधाला लाभलेली सांस्कृतिक प्रतिष्ठा
भारतीय परंपरेत सुगंधनिर्मिती ही केवळ गृहकला नव्हती; ती एक प्रतिष्ठित विद्या मानली जात होती. वात्स्यायनाने आपल्या ‘कामसूत्र’ ग्रंथात सांगितलेल्या चौसष्ट कलांपैकी ‘गंधयुक्ती’ ही एक महत्त्वाची कला आहे. गंधयुक्ती म्हणजे सुगंधांची निर्मिती, त्यांचे योग्य संयोग, संवर्धन आणि उपयोग यांचे शास्त्र. ही कला केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर सामाजिक प्रतिष्ठा, व्यक्तिमत्त्व विकास, प्रणय, आरोग्य आणि मानसिक प्रसन्नता यांसाठी आवश्यक मानली गेली होती.
वात्स्यायन सांगतो की सुसंस्कृत नागर व्यक्तीने सुगंधांची जाण ठेवली पाहिजे. ऋतूनुसार, प्रसंगानुसार आणि व्यक्तीनुसार योग्य गंधांची निवड हीच गंधयुक्तीची खरी कसोटी. यावरून स्पष्ट होते की सुगंधनिर्मिती ही त्या काळी स्त्री-पुरुष दोघांसाठीही एक सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण आणि प्रतिष्ठेची कला होती.
पुढे गंधसारसारखे ग्रंथ हीच परंपरा अधिक शास्त्रबद्ध, आयुर्वेदाधिष्ठित आणि तांत्रिक पातळीवर विकसित करतात. त्यामुळे कामसूत्रातील गंधयुक्ती आणि गंधसारातील गंधशास्त्र हे एका अखंड सांस्कृतिक परंपरेचे दोन टप्पे ठरतात.
गंधयुक्ती : रसायन नव्हे, संस्कार
गंधसारमधील भावना, पाचन, वेधन, संयोग, धूपन या प्रक्रिया पाहिल्या की लक्षात येते, येथे केवळ मिश्रण नाही, तर संस्कार आहे.
आयुर्वेदानुसार –
संस्कार म्हणजे गुणांचे रूपांतर.
गंधयुक्ती म्हणजे द्रव्याला नवा गुण देणे. जड पदार्थाला सूक्ष्म आणि परिणामक्षम बनवणे.
सौंदर्य आणि समृद्धी
गंधसारमध्ये वर्णन केलेले अंगलेप, विलेपने, सुगंधी तेले, उटणी इ. केवळ सौंदर्यासाठी नाहीत तर आरोग्यासाठी आहेत. तसेच ही द्रव्ये सामाजिक प्रतिष्ठा, आकर्षण आणि समृद्धीची द्योतके आहेत.
प्राचीन राजसभा सुगंधाने ओळखल्या जात. निमंत्रितांचे स्वागत अत्तर लावून व सुगंधी जल शिंपडून केले जायचे. जसे राजशिष्टाचारात सुगंधांचे महत्व तसेच सार्वजनिक सभा संम्मेलनात, उत्सवकार्यात.
व्यापारात विविध रत्ने, चांदी, सोने या धातूंप्रमाणे सुगंधी द्रव्ये, इत्र, केशर, कसुरी इ. या मौल्यवान वस्तू मानल्या जात. त्याच्या विक्रीतून व्यापा-याला उत्तम प्राप्ती होत असे. त्यामुळे सुगंध हा अर्थकारणाचाही भाग होता.
आयुर्वेद आणि गंधसार : शरीर–मन–आत्मा
शरीर आणि मन यांचे स्वास्थ्य म्हणजे आरोग्य.
गंधसार या आरोग्याला सुगंधाच्या माध्यमातून साधतो. वात-पित्त-कफ दोषांनुसार गंध निवडणे ही पूर्णतः आयुर्वेदिक संकल्पना आहे.
वातासाठी — उष्ण, स्थिर गंध
पित्तासाठी — शीत, मधुर गंध
कफासाठी — तीक्ष्ण, उष्ण गंध
गंधचिकित्सा : नासिकेतून मनापर्यंत
नाक हे जसे श्वासाचे तसेच मनाचेही द्वार आहे, ही कल्पना भारतीय शास्त्रांना ज्ञात होती. योगशास्त्र म्हणते-
नासिकाग्रभागी मन एकाग्र करावे.
नाकातून प्रवेश करून सुगंध थेट मनावर परिणाम करतो. म्हणूनच गंधसारमध्ये अनिद्रा, चिंता, उदासीनता यांवर गंधोपचार सांगितले आहेत. आधुनिक Aromatherapy याच परंपरेचा आधुनिक अवतार आहे.
त्रिगुण आणि सुगंध
सत्त्व, रज, तम हे त्रिगुण
गंध हे मनोगुण बदलू शकतात.
सत्त्ववर्धक — चंदन, कमळ
रजशामक — अगरु
तमोनाशक — कर्पूर, धूप
साधनेत वापरला जाणारा धूप हा केवळ वातावरण सुगंधी करत नाही; तो मन शुद्ध करतो, ध्यानास सहाय्य करतो.
अध्यात्म आणि सुगंध
पूजेत देवाला नाना परिमल द्रव्ये अर्पण करावीत. _“यत्र गन्धः तत्र देवता: । जिथे सुगंध आहे, तिथे देवता वास करतात. _
सुगंध सूक्ष्म आहे. तो अहंकार तोडतो, मन प्रसन्न करतो, वातावरण पवित्र करतो. म्हणूनच धूप, अगरबत्ती, चंदन यांचा उपयोग पूजेत, साधनेत अनिवार्य मानला जातो.
भोगातून योगाकडे
गंधसारची सर्वात मोठी देणगी म्हणजे तो भोग आणि योग यांना परस्परांच्या विरोधात उभे करत नाही. सुगंध सौंदर्य देतो, आरोग्य देतो, व्यापार घडवतो आणि त्याच वेळी मन शुद्ध करून अध्यात्माकडे नेतो.
उपसंहार : सुगंध — एक सूक्ष्म साधना
आयुर्वेद तत्त्वज्ञान देतो.
गंधसार त्या तत्त्वांना अनुभव देतो.
सुगंध ही केवळ लक्झरी नाही; ती संस्कृती आहे.
तो केवळ भोग नाही; ती साधना आहे.
गंधसार हा ग्रंथ वाचकाला भान देतो की, जीवन समृद्ध हवे असेल, तर ते सुगंधी असले पाहिजे!
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





