☆ इंद्रधनुष्य ☆ डोंगरे  सदन ☆ संग्राहक – सुश्री मानसी आपटे ☆ 

शंभर वर्षांपूर्वी चिनी सुतारांकडून बांधलेलं घर…

नगर शहरातील बुरूडगल्लीतील ‘डोंगरे सदन’ ही शंभरी ओलांडलेली वास्तू प्रख्यात विदुषी पंडिता रमाबाई यांचे चुलतभाऊ कृष्णराव वासुदेव डोंगरे यांनी बांधली आहे. विशेष म्हणजे या घराचं लाकूडकाम चिनी सुतारांनी केलं आहे आणि हे वैभव कृष्णरावांच्या नात कांचन चांदोरकर आणि त्यांच्या कुटुंबानं सुरेख सांभाळलं आहे.

आपल्या आजोबांच्या आठवणी सांगताना कांचन चांदोरकर म्हणाल्या, कृष्णराव मूळचे कर्नाटकातील गंगामूळचे. गावी होणाऱ्या जाचामुळे त्यांना रमाबाईंनी पुण्याजवळच्या केडगाव येथे मुक्ती मिशनमध्ये बोलवलं. तेथील अनेक इमारतींचं बांधकाम कृष्णरावांच्या देखरेखीखाली झालं. पुढे ते नगरला स्थायिक झाले. नगरमधील अनेक इमारतींचे काम त्यांनी केलं. क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूलची कौलारू वास्तू त्यांनीच बांधली. सध्या धरती चौक म्हणून अोळखला जाणारा भाग सव्वाशे वर्षांपूर्वी बाभळींनी व्यापलेला होता. साहेबराव निसळांकडून जागा विकत घेऊन कृष्णरावांनी तिथं १९१८ ते २० दरम्यान घर बांधलं. तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं. अनेक देशातील युद्धबंदी नगरच्या किल्ल्यातील लष्करी छावणीत होते. त्यातील चांगली वर्तणूक असलेल्यांना दिवसभर बाहेर काम करण्याची मुभा ब्रिटिश सरकारनं दिली होती. त्यात काही चिनी सुतार होते. त्यांचं कौशल्य हेरून कृष्णरावांनी त्यांच्याकडून मलबारी सागवानी लाकडात आपल्या घराचं बांधकाम करून घेतलं. चुन्यातील अतिशय सुबक आणि आखीव-रेखीव काम अजूनही जसंच्या तसं आहे.

चांदोरकर कुटुंबानं काळानुसार या धाब्याच्या घरात थोड्या सुधारणा केल्या. मधले काही लाकडी खांब काढून फरशी बदलण्यात आली. धुळीचा त्रास टाळण्यासाठी खिडक्यांना काचा लावण्यात आल्या, गॅलरी बंदिस्त करण्यात आली. तथापि, हाॅलमधील लाकडी खण तसेच ठेवण्यात आले आहेत.

नामवंतांच्या मैफली

प्रसिद्ध गायक-अभिनेते पंडितराव नगरकर, पंडित वालावलकर यांच्यासह अनेक नामवंत गायकांच्या मैफली ‘डोंगरे सदन’मध्ये झाल्या आहेत. कांचन यांच्या वडिलांना संगीताबरोबरच फोटोग्राफी व यंत्रांच्या दुरूस्तीची आवड होती. वाद्ये तर ते लीलया दुरूस्त करत. त्यांच्याकडे मोठा आॅर्गनही होती. चांदोरकर कुटुुंबाकडे आकाराने सर्वात छोट्या बायबलची प्रत आहे.

सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जगात सर्वात सिनिअर बनण्याचा मान भारताचे यष्टीरक्षक रघुनाथ चांदोरकर यांना मिळाला आहे. ‘डोंगरेसदन’ मध्ये राहणारे नगरचे रणजीपटू बाबा चांदोरकर यांचे ते थोरले भाऊ. दोघेही भाऊ रणजी खेळले. कर्जतला जन्मलेल्या व सध्या डोंबिवलीला राहणाऱ्या रघुनाथरावांनी मागील वर्षी शंभरी अोलांडली. न्यूझीलंडचे अॅलन बर्जेस यांच्या निधनानंतर ते सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू बनले आहेत.

संग्राहक – सुश्री मानसी आपटे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments