सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “मन्मनीच्या गंधकोषा...” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
☆
मन्मनीच्या गंधकोषा एकदा
स्पर्शून जा
उमलत्या पुष्प परागा हलकेच
चुंबून जा.. ।ध्रु।
*
तुजसाठी चांदण्यांचा साज
मी केला
शेला मृदू पाकळ्यांचा मंचकी
अंथरला
त्या गंधात रमण्या एकदा
येऊन जा
मन्मनीच्या गंध कोषा एकदा
स्पर्शून जा.. १
*
देह हा माझा एक कमळ
फुललेले
धुंद तुझ्या मिठीत शिरण्या
आसुसलेले
त्या रोमातल्या ठिणगीला
विझवून जा
मन्मनीच्या गंधकोषा एकदा
स्पर्शून जा …
*
सांगू कसे तुला मी भाव
स्पंदनातले
दावू कसे मोती ते अंतरीच्या
शिंपल्यातले
दवबिंदूत रे भ्रमरा एकदा
भिजून जा
मन्मनीच्या गंध कोषा एकदा
स्पर्शून जा …
☆
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




