प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ बापाची सायकल…..! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

बापाच्या बँक खात्यात दोन पैसं आलं की नेहमीप्रमाणं आमच्या आप्पांची आईच्या मागं भूणभूण असायची. मला हे घेऊन दयायला सांग म्हणून. त्यातच वरच्या आळीतली सरमाडी पोटात गेली की मग साऱ्या गावात हाय लय भारी म्हणत ओरडत रहायची त्यांची सवय साऱ्या घरादाराला आणि गावाला पण काही नवीन नाही.

आमच्या लहानपणापासून आम्ही आप्पांना असंच पहात आलोय. सारं आयुष्य झिंगतच काढलेल्या बापाची ही सवय काही अजून तर सुटलेली नाही. चार दिवस आईबरोबर भूणभूणत राहणाऱ्या आप्पाचं -मला सायकल तर नवीन घेऊन दयायला सांग नाहीतर इलेक्ट्रिक गाडी तर घ्यायला सांग – त्याला शिकवलंय कुणी -मी- अशी रोजचीच बडबड आई फोनवरून सांगत रहायची. “बरं घेऊया ” म्हणत मी ऐकत रहायचो-आणि क्षणभर मन भूतकाळात जाऊन यायचं…..!

गावातनं १५ किलोमीटरवर असणाऱ्या आटपाडीच्या साखर कारखान्यात करकरणाऱ्या सायकलीने पाय खोडत केलेल्या बापाच्या पाळ्या नजरेसमोरून हटता हटत नाहीत. पाच सहा महिन्यातनं एकदा झालेला पगार तिकडच गडप करून आलेल्या बापाचं रिकामंपण अजूनहीं विसरता म्हणता विसरता येत नाही. कारखाना बंद पडला.. बापाचं कामपण बंद झालं. पण बापाच्या अंगाचा कारखान्याच्या मळीचा वास आणि लिकरची साथ काय सुटली नाही. कारखान्यात असताना आटपाडीच्या स्टँडवर सायकल एकीकडे आणि बाप एकीकडे पडलेला दिसायचा. खरंतर दारुड्या विठूची पोरं म्हणूनच आजही गावात आमची ओळख. (मी सेट/नेट झाल्यावर व दिल्ली येथे भारतीय दलित साहित्य अकादमीचा माझ्या  ‘काळजातला बाप’ या पुस्तकाला फेलोशिप मिळाल्यावर पोरांनी गावातल्या चौकात मोठे पोस्टर लावले होते. त्या पोस्टर पुढं बाप कितीतरी वेळा पिऊन पडलेला असायचा. गावी गेलो की अजूनही पोरं सांगत राहतात.)….बाप चांगला असला की त्यांच्यासारखा कुणी नाही पण बिघडला की बापासारखा कुणी नाही ; असं आजही कुणी कुणी बोलत असतं. पोरांनी शिकावं म्हणून उपदेशाचे डोस देत रहाणारा बाप नेहमीच आठवत राहतो. त्यांच्या भीतीनं कोपऱ्यात अभ्यास करत बसलेल्या आम्हा तिघा भावंडाना पाहून बापाचं काळीज सुपाएवढं व्हायचं. “मला हे दत्तगुरु दिसले ” हे गाणं म्हणत बाप तिथंच बडबडत रहायचा. पगार झाल्या झाल्या बाप आटपाडी स्टँडवरच्या पेपर स्टॉलवरून चंपक आणि चांदोबा पुस्तकं हमखास आमच्यासाठी आणायचा. पोरांना जगाची ओळख व्हावी म्हणून बाप त्याही काळी रोज आटपाडीतून कामावरून येताना वर्तमान पेपर नेमानं आणायचा. “शिक्षण हा तिसरा डोळा राहू नको तू भोळा”अशी गाणी म्हणत रहायचा. आई मात्र काबाडकष्ट करून बापाचा संसार जगवत रहायची.स्वतः अडाणी असून पोरांच्या शिक्षणासाठी शेतामातीत झिजत राहायची.

आजही बापाचं जगणं आणि आईचं झिजणं जसंच्या तसंच आहे…..!

गेल्या महिन्यात विदयापिठाच्या पीएचडीच्या इंटरव्ह्यूनंतर सिलेक्शन झाल्यावर पहिल्यांदा बापाला फोन लावला आणि सांगितले – “आप्पा, पीएचडी म्हणजे काय माहीत आहे का.”…”होय माहित आहे की ”  ……. “तुमच्या पोराला पीएचडीला अँडमिशन मिळाले आहे. तुमच्या दोस्तांना सांगा दारुड्या बापाचं पोरगं पीएचडी करतय म्हणून “…..बाप फोनवर क्षणभर स्तब्ध झाला. मनापासून हसला. कारखान्यातल्या गोड साखरंसारखा बापाचा भास मला विद्यापीठाच्या त्या आवारात जाणवत राहीला. आईला विचारलं “आई तू शाळेत गेली होतीस का “……”हं कशाची शाळा बाबा”…….” मग तू पण सांग तुझ्या मैत्रिणींना,अडाणी आईचं तुझं पोरगं पीएचडी करतंय म्हणून.. “……नकळत तिच्या झिजलेल्या शरीरावरही मुठभर मांस चढल्याचं क्षणभर जाणवलं. (खरंतर पूणे, कोल्हापूर, सोलापूर आणि जळगाव या चार विद्यापीठाची मी एकाच वेळी पीएचडी साठीची पेट परीक्षा दिली होती.या चारही विद्यापिठाच्या पीएचडीसाठी मी क्वालिफाईड झालो होतो.हा अनुभव माझ्यासाठी खरंतर माझं सगळं घरच पीएचडी झाल्यासारखा होता.)

……………….. नेमका हाच धागा बापानं पकडून ठेवला होता. आणि आईच्यामागं सायकल किंवा मोटर सायकल पाहिजेच आणि तीही ‘झेंडा उंचा ‘च्या दिवसापर्यंतच- म्हणून भूणभूण लावली होती….वर “मीच शिकवलंय पोराला “..म्हणून जरब मात्र ठेवला होता……!

सायकल की मोटार सायकलवरून शेवटी सायकलवरचा त्यांचा शिक्का फायनल झाला. (गावी आजही बापाच्या नावानं घेतलेली ओमनी गाडी व सीडी हंड्रेड या गाडया आहेत. शिका म्हंटलं तरी बापानं कधी चालवल्या नाहीत. गाडीच्या पाठीमागे मोठ्या अक्षरात ‘आप्पा’लिहलेली अक्षरे पाहूनच बाप समाधानी. त्यामुळं कदाचित बाप सायकलीवर ठाम झाला असावा.)…….आणि मग ठरलं. ‘तुम्हाला कसली सायकल पाहीजे ती घेऊया की..या सांगलीला’-  म्हणून सांगलीत बोलवून घेतले.सायकलच्या दुकानातील वेगवेगळ्या देखण्याझार दिसणाऱ्या सायकलीवरुन बापाची नजर फिरत फिरत एकदाची एक सायकल फायनल झाली.२४ इंचीच सायकल पाहिजेचा हट्टही पुरा झाला. हरक्युलसवरून टाटाची दणकट सायकल बापाला आवडली.जे हवे ते सर्व पार्टस् बसवून सायकल स्वारी तयार झाली…… “लगेच गावी घेऊन जाणार,मी काही थांबणार नाही ” म्हणत बाप एसटी स्टँडकडे निघाला सुद्धा.सांगलीचे एसटी कंट्रोलर असणारे माझे मित्र मोरे साहेबांना सायकलीबद्दल अगोदरच सांगितले होते.त्यांच्या सहकार्याने नवी कोरी सायकल एसटीच्या टपावर व्यवस्थित बांधली.आप्पांना एसटीत बसविले आणि सायकल करगणीत उतरून घ्यायला सांगितले.गावी भावाला फोन करून करगणीत एसटीची वाट पहायला सांगितले…..एसटी हलेपर्यंत हरखून गेलेल्या बापाबरोबर काही क्षण घालवले.ज्या एसटीने बाप मला जेवणाची गाठोडी पाठवायचा आणि ती गाठोडी आटपाडी-जोतिबा गाडीतून ज्या ठिकाणी घ्यायचो ती सांगली स्टॅडवरची जागा डोळेभरून मी पहात होतो.

आज त्याच डेपोतील एसटीने माझ्या बापाची सायकल रुबाबात जिथे बाप पोराच्या शिक्षणासाठी एसटीत डबे ठेवायचा त्या ठिकाणी निघाली होती….!

…..घरी मात्र अजूनही करकरणारी बापाची जूनी सायकल…आता तिला काय वाटत असेल याच विचारात मी हरवून गेलो होतो…..आणि बापाची नवी कोरी सायकल त्या एसटीच्या टपावरून खुद्कन् हसत मला टाटा-बाय-बाय करत होती……!!

 

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

‘काळजातला बाप ‘कार..

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments