सौ. राधिका भांडारकर

 

☆ काव्यानंद ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ सौ. राधिका भांडारकर

सुश्री संजीवनी बोकील

रसग्रहण:

काही दिवसांपूर्वीच संजीवनी बोकील यांची नि:संग ही कविता वाचनात आली. एकेका शब्दांत मी रमून गेले.

मनातला एक  विचार इतक्या सहज आणि साध्या शब्दांत मांडण्याचं कसब, संजीवनीताईंच्या काव्यात जाणवलं… या कवितेतून त्यांनी एक सुंदर संदेश दिलाय्. भरकटणार्‍या, खचलेल्या, थकलेल्या सैरभैर झालेल्या मनाला एक सकारात्मक दिशा दाखवली आहे.

माणसाच्या मनात भय का आणि कधी निर्माण होतं? जेव्हां.. स्वत:च्या सामान्यत्वाला सामोरं नसतं जायचं… पंखातलं बळ ठाऊक नसतं… भरारी गरुडासारखी घ्यायची असते… ऊंच आकाशाला गवसणी घालायची असते…. मग ओंजळीत येतो तो न्यून गंड.. निराशा… अपयश…. आणि एक छान आयुष्य आनंदालाच विन्मुख होतं….!!! अशा मानसिकतेसाठी कवियत्री म्हणते,

।।स्वत:चं  सामान्यत्व फार सलू लागलं की बघावं, नि:संग  भिरभिरणार्‍या म्हातारीच्या पिसाकडे ।।

म्हातारीचं पिस..!!

हातभरच ऊडणार्‍या या पिसाला, आनंदाने भिरभिर उड्या मारत पकडणार्‍या बाळपणीची सहज आठवण झाली… पण या नि:संग, स्वत:च्याच मस्तीत आकाशात गिरक्या घेणार्‍या या म्हातारीच्या पिसांतूनच,संजीवनी बोकील यांनी जीवनानंदाचं एक तत्व किती सहजतेनं उलगडलंय!!

त्याला कुणी गरुड म्हणत नाही याचं दु:खं नाही, पंख बळकट नसल्याचा खेद नाही….. आकाशाचा अंत गाठायचा हव्यास नाही….. उंची गाठायचा मोह नाही… भिरभिरत, हवेशी जुळवून घेत, हलक्या अस्तित्वाला सहज स्वीकारत ते मजेत जगून घेतं…!!

ना जमिनीची भीती ना आकाशाचा मोह…. नि:संग जगण्याची शिकवण अशी निसर्गातूनच मिळते… जगणं महत्वाचं….!!

जगण्यातली स्वीकृती महत्वाची… संतांनी सुद्धा हेच म्हटलंय् ना..

।।ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।।

जे. कृष्णमूर्तींच्ंही असंच एक वाक्य…. Know yourself..!! Be with you…. happiness is within you..!!

सत्यात, सहजतेत, स्वीकृतीत आनंद आहे.. स्पर्धेत, मृगजळापाठी धावून दमछाक का करुन घ्यायची…?

संजीवनीताईंच्या या नि:संग, हवेत मस्त भिरभिरणार्‍या म्हातारीच्या पिसाने शिणवटलेल्या मनावर हलकेच फुंकर घातली..,,

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments