सौ. अमृता देशपांडे

? काव्यानंद ?

☆ घाल घाल पिंगा वा-या – कृष्ण बलवंत निकंब ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. अमृता देशपांडे ☆

घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात

माहेरी जा सुवासाची कर बरसात ll

 

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात

आईभाऊसाठी परि मन खंतावत ll

 

विसरली का ग भादव्यात वर्ष झालं

माहेरीच्या सुखाला ग मन आंचवलं ll

 

फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो

चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो ll

 

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार

हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार ll

 

परसात पारिजातकाचा सडा पडे

कधी फुले वेचायाला नेशील तू गडे  ll

 

कपिलेच्या दूधावर मऊ दाट साय

माया माझ्या वर तुझी जशी तुझी माय ll

 

आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला

माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll 

********

का आणि कसे कुणास ठाऊक, एखाद्या कवितेची, गीताशी,  एखाद्या वाक्याशी किंवा व्यक्तिशी आपले नाजुक भावबंध जुळले जातात.  कधीही, कुठेही क्षणभर जरी आठवण झाली तरी त्यांच्याशी संलग्न भावना तीव्रतेने जाग्या होतात आणि झपकन मन तिथे पोचतं.

माझंही त्यादिवशी असंच झालं. माझ्या अतिशय आदरणीय प्राध्यापकांनी ह्या कवितेची आठवण करून दिली. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गाणंच मला भेट दिलं. हे गाणंअसं मला अचानक भेटेल, अशी मी कधी कल्पना सुध्दा केली नव्हती. मी थोडीशी चकित झाले, खूप खूप आनंदित झाले. ” कशी करू स्वागता ” अशी माझी धांदल उडाली.

ही कविता मी इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा ऐकली.मराठी च्या तासाला बाईंनी शिकवायला सुरुवात केली.  शब्दांचे अर्थ सांगितले.

पिंगा, मन खंतावतं, चंद्रकळेचा शेव, यांचे अर्थ समजले. कपिला गायीची नंदा कशी खोडकर होती, हे न सांगताच कळलं.पण ” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला l माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला” हे सांगत असताना बाईंचा आवाज वेगळाच झाला आणि डोळ्यात पाणी आलं,  हे जाणवलं. ( तेव्हा बाईंना आज बरं वाटंत नाही असं वाटलं)

पुढे आठव्या इयत्तेत परत या कवितेनं पिंगा घातला.  ही कविता परत एकदा अभ्यासक्रमात आली. आतापर्यंत कवितेचे शब्दशः अर्थ समजले होते. आता शिकवताना बाईंनी कवितेचा भावार्थ  सांगितला, त्यातल्या स्त्री सुलभ भावनांची घडी उलगडली,  आणि तेव्हा अनेक  भावना आणि कल्पना मनाच्या उंबरठ्यावर फुलांसारख्या उमलल्या. त्यांची नवी ओळख झाली. तो एक सुंदर अनुभव होता.

” लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला आपल्या आईची, भावाची, माहेरची आठवण होऊन तिचे मन गलबलते आणि ती भिरभिरणा-या वा-यालाच सांगते की, ” अरे वा-या, असाच पिंगा माझ्या माहेरच्या परसात घाल आणि आईला सांग, मला तिची आणि सगळ्यांचीच खूप आठवण येते. आपली कपिला आणि तिची नंदा यांचीही आठवण येते. परसातला पारिजातकाचा सडा मला खुणावतोय.  कधी नेशील मला फुलं वेचायला? कपिलेच्या दुधावरची  मऊ दाट साय अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. आई, विसरलीस का? अग, एक वर्ष झालं भाद्रपद महिन्यात मला इथे  येऊन.  माहेरी जायला मन आतुरलं आहे. परत परत आठवण येते सर्वांची आणि डोळे भरून येतात,  ते पुसून पुसून माझ्या चंद्रकळेचा पदरही  ओलाचिंब होतो. “

इतका सारा निरोप ती वा-याला सांगते,  पण सुरवातीलाच सांगते कि,

 ” आईच्या कानात सांग, तुझी लेक सासरी सुखात आहे “.

कारण आईची काळजी तिला ठाऊक आहे,  माझी लेक कशी असेल? या विचारात ती हरवली असेल,  म्हणून निरोपाच्या सुरवातीलाच ती आईचे मन निर्धास्त करते. आणि मग पुढे ती माहेरच्या आठवणीनी भिजलेला पदर दाखवते. माहेरच्या लाडक्या लेकीचं लग्न झाल्यावर तिला आलेल्या एक प्रकारच्या पोक्तपणाचं , शालीनतेचं हे लोभस रूप.

मन आठवणींनी गदगदून गेलंय.  ” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला,  माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll ” असं म्हणत ती गप्प होते. आणखी काही बोलणं शक्यच नसतं!

इथेच कविता संपते. मन व्याकुळ असतानाही ती वा-याला विनवीते की, माझ्या माहेरच्या परसात जा आणि सुवासाची बरसात कर.

सुवासाची बरसात ‘  या शब्दातून माहेरी सर्वजण सुखात असोत, सर्वांना स्वास्थ्य मिळो , ही तिच्या मनातली इच्छा ती व्यक्त करते.  पृथ्वीतलावरच्या प्रत्येक स्त्रीची , मग ती कोणत्याही वयाची असो,  तिच्या मनातली ही भावना कवीने ” माहेरी जा सुवासाची कर बरसात ” पाचच शब्दात व्यक्त केली आहे.  सासरी गेलेल्या मुलीच्या अंतःकरणातला एक हळवा कोपरा म्हणजे ” माहेर” . कवी कृ.ब. निकुंब यांनी स्त्री मनाची तरल स्पंदने अतिशय साध्या पण थेट काळजाला भिडतील अशा  शब्दात मांडली आहेत.

गायी – वासरे, चंद्रकळेचा उल्लेख, ऐसपैस किंवा टुमदार घर,  दारातला पारिजातकाचा सडा या सगळ्या खुणा तो पूर्वीचा काळ सुचवतात.

कृ.ब. निकुंब यांनी ‘ उज्वला’,

‘ उर्मिला’ या काव्यसंग्रहातूनही  स्त्रीमनाचे  हळुवार तरंग व्यक्त केली आहेत. त्यांच्याच एका  कवितेतली ओळ आहे,

 ” जिथे वाळू-रणी झाले,  जीव तृषार्त व्याकुळ l

तेथे होऊ द्या हो रिती, 

माझ्या अश्रूंची ओंजळ ll

आता काळ बदलला, सर्वच बदलले. कवितेतले संदर्भ कालबाह्य झाले. पण अजूनही  अगदी पन्नाशीतल्या, साठीतल्या,  सत्तरीतल्या स्त्रीला विचारलं कि कवितेतल्या खजिन्यातली कुठली कविता तुला वाचायला आवडेल तर ती नक्कीच ही कविता  पसंत करेल.

कालिदासानं प्रियकराचा निरोप प्रेयसीला पाठवण्यासाठी ‘ मेघदूत ‘ धाडला.  तसाच निकुंबांचा हा ‘  वायुदूत ‘.

अतिशय संवेदनशील शब्द,  काळजाला हात घालणारे भावदर्शन,  आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मन हेलावून टाकणारी व्याकुळता. कविता वाचून झाल्यावर किंवा हे गाणं ऐकत असताना इतक्या वर्षांनी सुद्धा अश्रूंची ओंजळ रिती होतेच. हा परिणाम म्हणजे शब्दांचं आणि स्वरांचं सामर्थ्य म्हणायचं का हळुवार स्पंदनांची परमोक्ती? दोन्हीही.

जेव्हा माझं विश्व माहेर आणि सासर यात विभागलं गेलं,  तेव्हा मला कळलं कि ‘ कविता वाचताना बाईंचा आवाज कापरा का झाला, डोळ्यात पाणी का आलं’ . जेव्हा कवितेतल्या संवेदना  स्वतः अनुभवल्या  तेव्हा या अजरामर गीताच्या ओळी मनात सतत रुंजी घालू लागल्या. आता ते बालपण ही सरलं आणि तारुण्य ही सरलं, माहेरी आईही नाही . आई असलेलं माहेर आणि आई नसलेलं माहेर यात फरक असला तरी ” घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात l माहेरी जा सुवासाची कर बरसात ‘ ह्या ओळी कानावर पडल्या  कि डोळे भरलेलं मन  मागे, आठवणींच्या खुणा शोधत धावतंच. भाऊ- भावजयीच्या संसारात हरवलेलं माहेर शोधत धावतं.   माहेराची फुले वेचायला आसुसतं. नकळत जड मनातून शब्द येतात,

” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला l

माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll”

आता भाऊ वहिनी भाचे कंपनी यांच्या रूपातल्या माहेरासाठीही  परत मन वायुदूताला निरोप धाडतं,

” घाल घाल पिंगा वा-या

माझ्या परसात

माहेरी जा सुवासाची कर बरसात “ll

 

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा 

9822176170  

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments