श्रीमती उज्ज्वला केळकर

(निवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण। )

☆  काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

‘पैंजण’ ही नीलम माणगावे यांचीनिवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण कविता, चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे.

आजी जड, वजनदार पैंजण घालून  आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.

आईने जड, वजनदार पैंजण  वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.

तिसर्‍या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ने हे सगळं सहन केलं.

आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊदेत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी….’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.

स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी’ असं म्हणणारी तिची मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.

कविता मुक्तछंदात आहे. प्रत्यक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची….’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं , ना खुपणं, ना चिघळणं,’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळाणं, फाटणं काहीच नको. …’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले असणार.

२०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास ती अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे.

महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भरतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3.3 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

सुंदर रसग्रहण

Prabha Sonawane

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उज्वलाताई??⚘

सुहास रघुनाथ पंडित सांगली

रसग्रहणामुळे कविता छान समजली.त्यामुळे काव्याचा आनंद वाढला.

Shekhhar Palakhe

अर्थपूर्ण रसग्रहण, कवितेइतकचं सुंदर!!!