उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ त्या दिवशी असं झालं… भाग ३ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर

(अचानकच विहीरीच्या अधिक खोलवरून निघाल्यासारख्या अधीकच गुदमरलेल्या आवाजाने कहाणीचा धागा पकडला..) – इथून पुढे – – 

 ‘सगळं कसं पापणी लावते न लावते, तोच घडलं. सुरूवातीला ठरलं होतं, त्याच्या उलट जागा बदलल्या गेल्या. गौरव आणि सिद्धार्थच्या बड्डींनी आपआपल्या रायफल तळघराच्या तोंडाच्या निशाणावर ठेवल्या. सिद्धार्थ आपल्या दोन्ही हातात एक एक ग्रेनेड घेऊन सिद्ध झाला. लांस नायक खुशहालने तळघर झाकलेली लाकडाची पट्टी उचलायला सुरुवात केली, इतक्यात ती पट्टी जोराच्या आवाजासहित खालून वर उसळली गेली. आणि तळघरातून होणार्‍या गोळ्यांच्या वर्षावाने लांस नायक खुशहालला धराशायी केलं आणि दूसर्‍या फैरीत सिद्धार्थला. एका ओझरत्या क्षणी गौरवला खुशहाल आणि सिद्धार्थ एक चित्कार करत धराशायी होताना दिसले आणि दुसर्‍या क्षणी उघडलेल्या तळघरातून पठाणी कुर्ता घातलेले आणि लांब लांब दाढया असलेलेले दोघे जण उडी मारून बाहेर येताना दिसले. दोघे आतंकवादी आपली एके -४७ चारी दिशांनी फिरवत अंदाधुंद गोळीबार करू लागले. क्षणार्धात गौरवला त्याच्या शरिराच्या मध्यात कसला तरी झटका बसल्यासारखं जाणवलं. डाव्या हातात आणि पोटात काही तरी तीव्रसं टोचलं. पुढच्या क्षणी तो माळ्याच्या पायर्‍यांवरून गडगडत पहिल्या मजल्यावर येऊन पडला. पडता पडता त्याला, कॅप्टन सिद्धार्थचा बड्डी हेमचंद्र, पहिल्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर उडी मारताना दिसला. सगळीकडे फक्त धूरच धूर आणि जिथे गौरव धडपडत येऊन पडला होता, त्याच्या आजूबाजूला होत होता धूळ उडवणार्‍या गोळ्यांचा वर्षाव. स्वत:ला घसटत घसटत पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत जाऊन भिंतीचा आडोसा घेत त्याने वरच्या बाजूला गोळीबार करणं सुरू केलं.

गौरवच्या आठवणीत आता सगळं दृश्य धूसर धूसर दिसतय. गोळीबार आणि त्यामुळे पसरलेला धूर याच्यामधून, माळ्यावर उठणार्‍या दोघा आतंकवाद्यांच्या घोषणा ‘नारा-ए – तकबीर – अल्लाह- ओ- अकबर’, ऐकू येत होत्या. याच वेळी गौरवचे आपल्या डाव्या हाताकडे लक्ष गेले. त्यातून रक्ताची धार वहात होती. रायफलवरील त्याच्या डाव्या हाताची पकड ढिली होत होती. त्याचबरोबर त्याने आपल्या वर्दीवर घातलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटखाली पोटात वेदना जाणवू लागल्या होत्या आणि वर्दी ओलसर चिपचिपित झाली होती. वरच्या माळ्यावरून दोघे आतंकवादी थांबून थांबून गौरवच्या दिशेने गोळीबार करत होते. गौरव भिंतीच्या आडून, थांबून थांबून त्यांच्या फायरिंगला प्रत्युत्तर देत होता. त्याचा डावा हात सुन्न होऊ लागला होता. त्यातून वहाणारं रक्त त्याचे बूट आणि खालची फरशी रंगवत होतं. बुलेट प्रूफच्या आतील त्याची वर्दीही वाहणार्‍या रक्तामुळे अधिकच चिपचिपित होत होती. या सगळ्या आवाजात एक क्षीणसा आवाज त्याला ऐकू आला, खूप दबका आवाज… त्याला स्पष्ट ऐकू आला… ‘गौरव सर सेव्ह मी प्लीज… ’ थोड्या वेळाने पुन्हा हाक आली, ‘गौरव सर…. ’ त्या हाकेने जणू गौरवच्या धमण्यांमधून टपकणार्‍या रक्ताच्या थेंबांना ठिणग्यांमध्ये परावर्तीत केलं. आपल्या सार्‍या वेदना विसरून गौरव खोलीतून बाहेर आला आणि वर माळ्याकडे धावणार, इतक्यात ‘मर काफिर, मर’च्या आवाजाबरोबर गोळ्यांचा आवाज आला आणि शेवटी घुमली कॅप्टन सिद्धार्थची किंचाळी. सुन्न झालेला गौरव तिथेच फरशीवर धप्पकन बसला.

एनकाऊंटर सुरू होऊन जवळ जवळ एक तास झाला होता. सूर्य आता माथ्यावर आला. होता. गौरवला आता खूप थकल्यासारखं वाटत होतं. आता त्याच्याजवळ तीस गोळ्यांची फक्त एक मॅगझीन शिल्लक होती. त्याला नक्की माहीत होतं की त्या दोन आतंकवाद्यांजवळ गोळ्यांची काही कमतरता नाही. त्यांच्या स्वत:जवळच्या गोळ्या आणि आता लांस नायक खुशहाल नि सिद्धार्थच्या जॅकेट मध्ये असलेली मॅगझीन्स आता त्यांचीच संपत्ती बनलेली असणार. त्याचा बड्डी खुशहाल आणि सिद्धार्थ यांच्या जिवंत असण्याची कुठलीही आशा आता उरली नव्हती. वर्दीच्या खिशात ठेवलेला रेडियो सेट सुरुवातीच्या फायरिंगमधे कधीचाच बंद पडला होता. घराच्या बाहेर तैनात असलेल्या आपल्या तुकडीला संदेश पाठवण्याचा कुठलाच मार्ग आता गौरवकडे नव्हता. एकच आशा होती. सिद्धार्थचा बड्डी, शिपाई हेमचंद्र बाहेर उडी मारून गेला होता, तो काही मदत घेऊन आला, तर आला, पण मदत येणार असती, तर एव्हाना यायला हवी होती. प्रत्येक जाणारा क्षण घातक वाटत होता. खूप रक्त वाहून गेल्यामुळे आपल्या शरीरात अजिबात ताकद नाही, असं त्याला वाटत होतं. त्याचे डोळे मिटू लागले होते. डोळे मिटता मिटता टिप्सीचा चेहरा डोळ्यापुढे तरळला आणि मनात विचार आला की टिप्सीला आता या जगात आपल्या पप्पांशिवायच मोठं व्हावं लागेल. गीतालीचा गोल चेहरा डोळ्यापुढे नाचू लागला. टिप्सीला मांडीवर घेऊन बसेलेली गीताली…. त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर असलेल्या वॉलपेपरवरचं छायाचित्र…. मोबाईल बघता बघता, अचानक काही तरी गौरवला आठवलं आणि तो त्याच्या कॉँटॅक्ट लिस्टवरचे काही नंबर डिलीट करू लागला. डोक्यावर असलेल्या मृत्यूच्या व्याकुळ छायेतही गौरवचे विचार कुठे कुठे भटकत होते. मग त्याने एक निर्णय घेतला की मरायचच जर आहे, तर या माथेफिरूंना मारून का मरू नये? आणि तो आपली शेवटची मॅगझीन आपल्या रायफलवर चढवत त्यासाठी तयार झाला.

त्यानंतरचं सगळं गौरवच्या स्मृतीत धूसर घूसरच आहे. त्याला स्पष्ट आठवत नाही. इतकच आठतय की तो आपली रायफल घेऊन गोळ्यांची बरसात करत जिन्यावरून धावत गेला. त्याच्या बुलेट प्रूफ जॅकेटला तीन – चार गोळ्या लागल्या आणि त्याच वेळी खालच्या जिन्यावरून फौजी बुटांचा धप धप आवाज ऐकू येऊ लागला. दुसर्‍या दिवशी त्याचे डोळे उघडले, तेव्हा तो बेस हॉस्पिटलच्या बेडवर होता. डावा हात प्लॅस्टरमध्ये हवेत लटकत होता. एका क्लिपने तो स्टॅंडला अडकवलेला होता आणि त्याच्या पोटावर मोठीशी पट्टी बांधलेली होती. नंतर कळलं त्याच्या पोटातून चार गोळ्या, आणि डाव्या हाताच्या बोटांचा जोड व कोपरापासून एक आशा तीन गोळ्या काढल्या होत्या. त्याच्या उन्मादी आक्रमणात ते दोघे आतंकवादी ठार झाले होते. त्यांच्या मृत शरीरातून काढून जप्त केलेल्या कागदपत्रावरून, ते अफगाणी असल्याचं कळलं होतं.

आपली सगळी कहाणी ऐकवल्यावर गौरव एकदम गप्प गप्प झाला. धापा टाकू लागला. जसा काही मैलो – न – मैल पळून आत्ताच इथे येतोय. मणा मणाचं ओझं जसं काही त्याच्या छातीवर पडलय आणि गेले पंधरा-वीस दिवस तो ते आपल्या छातीवर वागवतोय. क्षणभर त्याला औदासिन्यानं घेरलं आणि मग… मग भारी भक्कम ओझ्याखाली अस्वस्थ, झालेल्या, तळमळणार्‍या त्याला, थोड्या वेळासाठी अगदी थोड्या वेळेसाठी का होईना, पण त्याच्या उखडलेल्या श्वासाच्या अवती भवती, थंडगार झुळुक फिरत असल्याचा भास झाला.

‘गॉड ब्लेस यू माय सन… माझं नशीब किती चांगलं की तुझ्यासारख्या ब्रेव्ह सोल्जरची देखभाल करण्याची संधी मला मिळाली. ’ आपल्या ओलसर झालेल्या डोळ्यांच्या कडा पुसत शकुंतला मॅम म्हणाल्या.

‘कसला ब्रेव्ह सोल्जर मॅम? दररोज सिद्धार्थ माझ्या बेडच्या जवळ उभा राहतो आणि माझ्याकडे टवकारून बघतो. ज्या गोळ्यांनी त्याचा जीव घेतला, ती खरं तर माझ्या नावाने निघाली होती. ’

‘मी समजू शकते गौरव, तुझ्यावर कोणता प्रसंग ओढवलाय! पण आता काही करता येणार नाही ना! इतका विचार केलास, तर तुझी तब्बेत सुधारणं अवघड होऊन जाईल. ’

‘मला बरं व्हायचंच नाहीये. आय वॉँट टू सफर… कदाचित तेच माझं प्रायश्चित्त असेल! ही वेदना, हे दु:ख माझ्याजवळ राहावं… अगदी कायमसाठी… ’

‘असा विचार करू नकोस बेट! . आपल्या फौजेचे हे बलीदान थेट गॉडसमोर रुजू होतं! ’

‘ही सगळी नुसती बडबड आहे. सांगण्या-ऐकण्याच्या मोठमोठ्या गोष्टी…. कुणालाच या बलिदानाची जाणीव नाही की त्याचं महत्व कळलेलं नाही. नाही तर गेल्या तीस-चाळीस वर्षात काश्मीरमध्ये इतके जीव गेले आहेत की त्या हिशेबाने बघितलं तर हा स्वर्ग, खराखुरा स्वर्ग व्हायला हवा होता पण इतक्या सगळ्या बलिदानानंतरही आम्ही लोक फक्त गोळ्याच खात रहातोय. देशवासीयांना आमच्या सगळ्या चुकाच चुका दिसताहेत फक्त! ’

‘मला कळतय गौरव… बरं ते जाऊ दे… त्या शेवटच्या क्षणी तुला काय वाटलं? मृत्यूला इतकं जवळ उभं राहिलेलं पाहून… ओह… माझा तर केवळ विचारानेच थरकाप होतोय. ’

‘काही खास नाही मॅम.. बस! मुलीची आठवण झाली. सहा वर्षाची होईल आता ती. मला असं वाटलं की आता तिला मोठं होताना तिचे पापा पाहू शकणार नाहीत. ’ गौरवच्या या बोलण्यावर हॉस्पिटलची ती हेड नर्स स्फुंदून स्फुंदून रडू लागली. खूप वेळेपर्यंत ऑफिसर वॉर्डच्या त्या कोपर्‍यातल्या अवती-भवती दबलेले हुंदके गुंजत राहिले. मग वातावरण तणावमुक्त करण्यासाठी शकुंतला मॅम म्हणाल्या, ‘आपल्या बायको-मुलीला बोलाव ना इथे! त्या इथे राहिल्या, तर पेन किलरच्या डोसाची गरजही कमी भासेल. मीदेखील बघीन माझ्या ब्रेव्ह सोल्जरची गोड छोकरी! ’

‘नाही मॅम! त्या दोघींनी मला आशा स्थितीत पाहावं, असं मला वाटत नाही. मी त्या दोघींचा हीरो आहे आणि हीरो कधी बेडवर पडलेला, पट्ट्या लपेटलेला असतो का? ’

‘ गॉड… तू आणि तुझे विचार… बरं हे सांग, तिथे तुझ्यावर गोळ्यांची बरसात होत होती आणि अशातही तू मोबाईलवरून कुणाचे नंबर डीलीट करत होतास? ’

शकुंतला मॅमच्या या प्रश्नावर गौरव काहीसा संकोचला पण त्याने जे उत्तर दिले त्यामुळे शकुंतला मॅम चकीतच झाली.

तो काहीसा शरमिंदया स्वरात म्हणाला, ‘मॅम, त्याचं काय आहे की मी दोन-तीन मुलींचे नंबर डीलीट करत होतो. ’

‘काय? … पण का? ’

‘त्याचं काय आहे ना मॅम, सोल्जरच्या बॉडीबरोबर त्याचं सगळं सामान त्याच्या फॅमिलीकडे पाठवलं जातं. मी मेल्यावर माझा मोबाईल माझ्या बायकोकडे गेला असता आणि तिने बघितलं असतं की त्या दोन-तीन मुलींच्या संपर्कात मी अजूनही आहे, तर तिला किती वाईट वाटलं असतं! मी तर तिला सांगितलं होतं की आता माझा त्या जुन्या गर्ल फ्रेंडशी काहीही संबंध नाही.

मेजर गौरव वत्सच्या बोलण्यावर हेड नर्स शकुंतला बर्मन इतकी मोठमोठ्याने हसू लागली, की तो हास्यध्वनी, किती तरी वेळ तिथे रेंगाळत राहिला. ते हसू, ऑक्टोबरच्या त्या कुडकुडणार्‍या दुपारी, ऑफिसर वॉर्डमधल्या त्या ठणक्याला थोडीशी ऊब देण्याची मेहरबानी करत राहिलं.

समाप्त –

मूळ हिंदी  कथा – ‘गर्लफ्रेंड’  मूळ लेखक – गौतम राजऋषि

अनुवाद –  उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments