सौ. मीनल केळकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ व्यथा तिची, कथा माझी… – लेखिका : प्रतिभा परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆
सुमनने नाश्ता टेबलावर ठेवून मुलांना आवाज दिला.
कालच मुलांची परीक्षा संपली होती त्यामुळे घरी सगळं रिलॅक्स्ड झालं होतं.
मागचे दहा-बारा दिवस मुलांच्या अभ्यासापुढे सुमनला काही सुचत नव्हतं. घर काम पटापट आवरून ती मुलांना अभ्यासाला बसवी. आता घराकडे लक्ष द्यायला हवे आहे, उन्हाळा ही सुरू होतो आहे.
गरम कपडे धुवायला काढून ते धुवून सुमन बाल्कनीत वाळत टाकायला गेली.
बाल्कनीत खाली खूपसा कचरा काड्या, पिसं पडलेली होती. तिने कपडे वाळत टाकून कचरा गोळा करून टाकला.
उद्यापासून एक एक खोली आवरायची असं ठरवून कामाला लागली.
दुपारी जरा झोपली तो चिवचिवाटाने तिला जाग आली.
काय बाई कल -कल आहे म्हणत ती बाल्कनीत आली. खाली परत कचरा पडला होता. सुमनने वर पाहिलं, बाल्कनीत एक विंड चाईम लावलेलं होतं त्यावर चिमणीने घरटे बांधले होते. “आता इथे ही घरटं ! बाई -बाई आणखीन कुठे जागा नाही का गं तुला मिळाली??” सुमन चिमणीकडे पहात बडबडली.
अचानक चिमणी खिडकीत येऊन बसली. सुमनला वाटले चिमणी तिच्याकडे पाहून बोलतिये.
“मग कुठे बांधू?? एक तरी झाड सोडल कां तुम्ही आमच्यासाठी? तुम्ही आमच्या जागेवर आपलं घर बांधलं, मग आता आम्ही तुमच्या घरात घरट बांधतोय.
अचानक घर मोडणं आणि त्यानंतर कुठे जायचं हे माहित नसल्यावर काय स्थिती होते हे तुम्हा माणसांना कसे समजणार??”
चिमणीचे बोलणे ऐकून सुमनच्या डोळ्यासमोर तिचे चाळीतले घर आले.
लग्न होऊन ती उदय बरोबर चाळीतल्या घरात आली होती. वर्षभरात अंकिताचा जन्म झाला. एक दिवस कुजबुज सुरू झाली येथे हायवे बनणार आहे तेव्हा त्यांची चाळ मोडून इथून हायवेचा पूल बनणार. तेव्हा ही जागा रिकामी करायची ऑर्डर आहे असे ऐकायला येत होते. मालकांनी आम्ही प्रयत्न करतो असे खोटे आश्वासन दिले. पण अचानक एक दिवस बुलडोजर घेऊन कामगार आले आणि एकच गोंधळ उडाला. कसेबसे सामान बाहेर काढून लोक बाहेर येऊन बसले.
उदयच्याएका मित्राने एका खोलीचे घर रिकामे असल्याचे सांगितले. भाडं जरा जास्त होतं, पण मागचा पुढचा विचार न करता उदयने ते घर घेतले. पैशांसाठी तिने सोन्याच्या बांगड्याही विकल्या.
पुढे उज्वल झाला. नशीब पालटले. उदयला बढती मिळाली आणि त्यांनी हा दोन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला. फ्लॅट नवीनच बांधलेले होते.
रस्ता पक्का करण्यासाठी बरीच झाडे कापली गेली होती. हे सर्व आठवून सुमनला तो दिवस आठवला आणि चिमणीची व्यथा जाणवली.
मुलांचा रिझल्ट लागला दोघे छान पास झाली म्हणून दोन दिवसासाठी चौघे गावी देवदर्शनाला जाऊन परत आली.
इकडे आता चिमणा चिमणीच्या घरट्यात चिवचिवाट वाढलेला होता. अंड्यांतून पिल्लं बाहेर आली होती. चिमणी चिमणा पोरांसाठी किडे, धान्य गोळा करून आणत होती.
सुमनही एका ताटलीत भात, पोळीचा चुरा ठेवायची. हळूहळू बाळ मोठे होत गेली.
काही दिवसांनी चिमणबाळे फुर्र– फुर्र उडू ही लागली आणि अचानक त्यांचं येणं बंद झालं.
चिमणी ही फारशी दिसत नव्हती.
आता सुमनला दुपार रिकामी रिकामी वाटू लागली.
चिमणी घर सोडून गेली वाटतं. ती विचार करू लागली. अचानक तिला चिऊ चिऊ चा आवाज आला. वाटलं चिमणी तिला बाय-बाय करायला आली आहे.
“पुढच्या वर्षी इथेच घरटं बांधायला ये हं!” सुमन चिमणीला म्हणाली.
“मी असेल कि नाही माहित नाही पण ही माझी बाळ त्यांच काय होणार??”
सुमनला जाणवले चिमणीला काय सांगायचे आहे! तिने मनाशी ठरवले बाल्कनीत कुंडीत लावलेले वडाचे व आंब्याचे रोप समोरच्या पार्कमध्ये नेऊन लावूया. चिमणीच्या पुढच्या पिढ्यांसाठी तरी घराची सोय होईल.
लेखिका : प्रतिभा परांजपे
प्रस्तुती : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






