सौ. सुनिता गद्रे

 ☆ जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

 सकाळी- सकाळीच सानवी ने, आमच्या धाकट्या कन्येने दोन हॅन्ड बॅग्ज आणि एक सॅक  माझ्यासमोर टाकला.

मम्मा आपण दोघी राजस्थानमधल्या दोन तीन खेड्यात जातोय.त्या दृष्टीने आपले साधारण तीनेक दिवसांचे कपडे पॅक कर.” तिने फर्मानच ऐकवले.’आता हे काय नवीनच खूळ?’ मी विचार करत राहिले.

ह्या मुलीत रक्ताबरोबरीनं एक अजब रसायन वाहतं असं मला नेहमीच वाटत आलंय.अल्लड, बडबडी, भांडखोर, थोडीशी हटवादी अशी ही.तर मोठी सोनाली समजूतदार, अबोल,शांत स्वभावाची. पण तरीही  सानवी च्या वागण्यात,तिच्या हट्टात मला एक तर्‍हेचा गोडवा जाणवतो.लोकांना आपलंसं करण्याची जादू तिच्या स्वभावातच आहे.

आई तर नेहमीच म्हणतात, “मोठी गुड गर्ल तर धाकटी गोड मुलगी.”

आमच्या गुड गर्ल चं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. जावई पण तिच्या सारखाच डॉक्टर. सगळी फॅमिलीच यु. एस्.ची सिटीझन. त्यामुळे ही पण तिथे छान सेट झाली. आठ महिन्याच्या तेजस ला घेऊन ती नुकतीच इंडियात येऊन गेली. इथे दिल्लीतच, तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं. मग काय बाळालाआमच्याकडे सोपवून लग्नात धमाल करायला ती मोकळी झाली ! शॉपिंग,हिंडणं-फिरणं मनसोक्त करून मागच्या आठवड्यात ती परत गेली अन् घर सुनं सुनं वाटायला लागलं.कंपनीच्या कामामुळे निनादचा नेहमीच एक पाय घरात तर एक परदेशात अशी स्थिती. परवाच तो यु. के.ला गेला, तेही चांगलं दोन महिन्यांसाठी. घरात मी एकटी.कारण कामामुळे आमची गोड मुलगी दिवसभर  घराबाहेरच असायची.

एम् एस् सी झाल्याझाल्या इथं दिल्लीतच तिनं एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब स्वीकारला.’ गैरपारंपारिक ऊर्जा स्रोत’ हा तिचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आणि ती कंपनी पण सोलर एनर्जी  प्रॉडक्टवर काम करणारी. त्यामुळे नोकरीत ती छान रमली. बरेचदा तिला कामाच्या निमित्ताने गुजरात, राजस्थान, हरियाणा यांच्या पश्चिमी जिल्ह्यांत जावं लागायचं. त्यांचा सहकार्‍यांचा ग्रुप काम आणि भटकंतीत छान रमायचा.

‘पण आज हे मला”तू पण राजस्थानात चल म्हणणं,” म्हणजे काय प्रकार आहे ?’मी अंदाज बांधत राहिले.

नऊ च्या सुमाराला ती पुन्हा घरात दाखल झाली.

“हे काय मम्मा,तू अजून तयार नाही झालीस ?मी माझी बाहेरची कामे पण उरकली.“मला पारोश्या अवतारात बघून ती उदगारली.

“मला तुझा प्लॅन कळल्याशिवाय मी एक पाऊल पण पुढे टाकणार नाही.”मी ठामपणे सांगितले.

“त्याचे असे आहे की पुढचे चार दिवस आम्हाला सुट्टी आहे.पण मी आमच्या गॅंग बरोबर नाही जाणारेय.”ती म्हणाली.

“का?”न राहवून मी विचारले.

“त्याचं काय आहे ना,” एखाद्या तत्वज्ञान्याच्या अविर्भावात ती बोलू लागली, “आपल्या घरात एक छोटीशी मुळूमुळू रडणारी मुलगी आहे. डॅडी घरात नाही…ते सोनालीचं गुब्बू- गूब्बू बाळ सुद्धा लळा लावून त्याच्या देशात निघून गेलं…. आता मी पण

गावाला गेले ना,तर ती मुलगी जेवण-खाण,काम धंदा सोडून नुसती रडतच बसेल आणि गंगा-यमुनेच्या पुराने घर वाहून जाईल…… दॅट्स व्हाय…!”

ती पुढे काय- बाय सांगत होती.पण ती माझ्याबद्दल एवढा विचार करते.माझी तिला काळजी वाटते. हा विचारच मला सुखावून टाकणारा होता. गुगल मॅप वरून तिने सगळा प्लॅन मला समजावला. “जोधपूरहून पुढे ही चार खेडी  मी कव्हर करणार आहे. हस्तकला, हस्तशिल्प,कॉटेज इंडस्ट्री साठी हा एरिया प्रसिद्ध आहे.उच्च प्रतीच्या लाखेपासून केलेल्या वस्तू आणि बांधणी वर्क त्याला लागणारे नैसर्गिक रंग असं खूप काही मला शिकायचंय.” ती सांगत गेली. तर ठरल्याप्रमाणे तू माझ्याबरोबर येणार आहेस. आपली राहण्याची सोय पण केलीयआणि जोधपुरपासून पुढे हिंडण्या- फिरण्यासाठी  मी कॅब पण बुक केलीय. तेव्हा नो चिंता,नो फिकिर.” तिने मला अधिकारवाणीने सांगितले.

“आणखी एक गंमत आहे.” ती म्हणाली. ‘गंमत?व्वा! आता कुठं सगळ्या प्लॅनला सानवी टच् येतोय’ मी मनात म्हणाले.

आपल्या खोलीतून एक जाडजूड डायरी -खूप जुनी अशी- आणून तिनं माझ्या हातात ठेवली. वीस-एक वर्षांपूर्वीची ती डायरी माझ्या जुन्या आठवणी ताज्या करून गेली. निनाद त्यावेळी तीन वर्षाचं साऊथ आफ्रिकेतील काम संपवून इकडं परत आला होता. इतर खूप वस्तूंबरोबर आणलेल्या दोन डायर्‍यांपैकी त्या आणि त्याच डायरी साठी दोघी बहिणींनी केलेलं झिंज्या पकडू भांडण मला आठवलं.

मी हसत-हसत डायरीची पानं चाळू लागले. “जास्त बघू नको मम्मा, फक्त फर्स्ट पेज बघ. ती म्हणाली… आणि…मम्मा जी गंमत फर्स्ट पेज वरच आहे. म्हणूनच माझ्या लक्षात राहिलीय.”ती उदगारली.

मी पाहू लागले इंग्लिश मध्ये ओम, जय माता दी, त्याखाली स्वतःचं नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तुकडी वगैरे आणि त्याखाली कागदाचा वेडावाकडा फाडलेला तुकडा चिकटवला  होता. त्यावर बलदेव सिंग... सिंधोरा कलाँ… नियर हनुमान गढी… जोधपुर.…असं लिहिलेलं होतं.तर बाजूला बाण काढून जवान अंकल,सन सचिन असं लिहिलेलं होतं…. वाचलं अन् माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

      क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments