सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  जीवनरंग ?

☆ अनुवादित लघुकथा – अंतरात्म्याचा आवाज… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

 

आय. सी. यू. विभागाचे प्रमुख डॉ. गुप्ता, त्यांच्या केबिनमध्ये खुर्चीत मान मागे टेकवून बसले होते. खूप अस्वस्थ दिसत होते. कसला तरी गंभीर विचार करत असावेत, हे सहजपणे कळत होतं. पंधरा मिनिटांनी त्यांना सकाळच्या राऊंडसाठी जायचं होतं. त्यांना नक्की माहिती होतं की, तिथल्या तेरा नंबरच्या बेडवर, गेल्या पंचवीस दिवसांपासून पडून असलेल्या पेशंटचे – गीताचे वडील, पापणीही न हलवता त्यांच्या येण्याची वाट पहात बसलेले असणार होते. ते तिथे पोहोचताच , नेहेमीच अगदी कमीत कमी प्रश्न विचारणाऱ्या त्या गरीब  पित्याच्या डोळ्यात मात्र रोज त्यांना हजारो प्रश्न दिसायचे. टेबलावरच्या ग्लासमधले पाणी घटाघटा पिऊन डॉ. गुप्ता राऊंडसाठी निघाले.

रोजच्यासारखेच आजही गीताचे वडील लिफ्टसमोर उभे होते — अगदी केविलवाणेपणाने.

” डॉक्टरसाहेब — माझी मुलगी –” कसंतरी  इतकंच बोलू शकले ते.

” हे पहा , आज त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा आहे. काल बाहेरचे स्पेशालिस्ट डॉक्टरही येऊन पाहून गेलेत तिला. हवा भरलेल्या गादीसाठीही मी सांगितलं आहे. कदाचित पुन्हा एम. आर. आय. टेस्ट करावी लागेल. आणि मेंदूत जर पाणी साठलेलं असेल तर ताबडतोब एक ऑपरेशनही करावं लागेल.”

” डॉक्टर आत्तापर्यंत पाच लाख रुपये खर्च झालेत. कालच मी चाळीस हजार जमा केले होते. आज त्यांनी आणखी साठ हजार भरायला सांगितलेत. इतके पैसे मी —-” त्यांचे पुढचे शब्द गळ्यातच अडकले होते.

” हे पहा, तुम्हाला पैशांची व्यवस्था तर करावीच लागेल—” असं म्हणत डॉक्टर वॉर्डमध्ये निघून गेले.

अस्वस्थ मनानेच पेशंटना तपासता तपासता त्यांनी नर्सला विचारलं–

” तेरा नंबर पेशंटला इंजेक्शन दिलं का ? ”

” हो दिलंय. आता एकदम संध्याकाळीच त्या शुद्धीवर येतील. ”

डॉ. गुप्ता हातून काहीतरी अपराध झाल्यासारखे तिथून बाहेर पडले, आणि लिफ्टकडे जाण्याऐवजी जिना उतरून त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसले. खूप अस्वस्थ झाले होते ते. हॉस्पिटलच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी त्यांना अगदी बजावल्यासारखी सांगितलेली गोष्ट त्यांना आठवली— त्यातला एकेक शब्द मनात जणू घुमू लागला —-” हे बघा डॉ. गुप्ता , वैद्यकीय क्षेत्रात तुमचं विशेष नाव आहे हे मान्य. पण या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतो. कितीतरी रुग्ण फक्त तुमचं नाव ऐकून इथे येताहेत. इथे तुम्हाला पगाराचे जे पॅकेज मिळते, ते तुमच्या आधीच्या पॅकेजच्या दुपटीपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे अर्थातच काही गोष्टी तुम्हीही लक्षात घ्यायला हव्यात. डॉ. मणी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतील….. इथे भरती करून घेणं , वेगवेगळ्या टेस्टस, ऑपरेशन, स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या व्हिझीट्स, आय. सी. यू.त ठेवणं, व्हेंटिलेटर, काही विशेष उपकरणांची सोय , आणि अशाच इतर गोष्टी — मग रुग्णाला या गोष्टींची गरज असो किंवा नसो — लक्षात येतंय ना तुमच्या ? पुढच्या सहाच महिन्यात तुमच्यामुळे हॉस्पिटलचा लौकिक आणि उत्पन्न, दोन्हीही चांगलंच वाढायला पाहिजे — आणि त्यामुळे तुम्हीही कुठून कुठे जाल — नाहीतर — नाहीतर दुसरीकडे कुठे जाण्याबद्दल तुम्हालाच गंभीरपणे विचार करावा लागेल —“.

नकळत डॉ. गुप्ता यांच्या डोळ्यातून उष्ण अश्रू  टपकले—- ते संतापाचे होते, तिरस्काराने भरलेले होते की खेदाने — कोण जाणे. त्यांनी लॅपटॉप उघडला, आणि घाईघाईने काहीतरी टाईप करायला लागले — शेवटची ओळ टाईप करून झाली तेव्हाच त्यांची बोटं थांबली —–

“म्हणून मी माझ्या नोकरीचा राजीनामा देत आहे ” ——–

आता प्रिंटरमध्ये कागद घालतांना त्यांचा चेहरा अगदी शांत दिसत होता.

 

 

मूळ हिंदी कथा : श्री. सदानंद कवीश्वर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments