श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ अश्रू …भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

आणि आज वयाची विशी ओलांडल्यावर कधी नव्हे ते पप्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती. घरात तो  उत्साहाने वावरत होता. का तर त्याचा आज बेवडा बाप मेला होता. आयुष्यभर रखमाला म्हणजेच त्याच्या आईला मारहाण करणारा त्याचा हैवान बाप मेला होता. पप्या आज खूपच खुशीत होता. बाप मेल्याचं दुःख न करता तो घरात मोकळ्या मनाने वावरत होता. बापाचे दिवस न घालता, रखमाला न जुमानता त्याने चक्क घराच्या दाराशी एक गुढी उभारून मोकळेपणाने स्वातंत्रदिन साजरा केला. आज रखमाला पप्याचे एक वेगळेच रूप बघायला मिळत होते. पप्याच्या कोरड्या डोळ्यात एक विलक्षण चमक दिसत होती. त्याच्यात तिला आज एक घरातला कर्ता पुरुष दिसत होता. 

पप्या काही ना काही कामे करून रखमाच्या हातात पैसे आणून ठेवत होता. छोटी आता मोठी झाली तरी तिला तो छोटीच बोलत होता. तिला काही पाहिजे असेल ते प्रेमाने आणून देत होता. थोडा लोकांत मिसळायला लागला होता पण मोकळे पणाने जगणे त्याच्याकडून काही होत नव्हते. भूतकाळाचे भूत त्याच्या मानगुटीवरून काही जात नव्हते. आईवर आणि बहिणीवर खूप माया होती पण ती कधी त्याच्या तोंडून बाहेर पडत नव्हती आणि अशाच एका दिवशी वयात आलेली छोटी रखमाला आणि पप्याला सोडून गावातल्या एका मुलाबरोबर मुंबईला पळून गेली. पप्या स्वतः कोसळला पण रखमाला आधार दिला. आपलेच संस्कार कमी पडले असे रखमाला सांगून त्याने तिला धीर दिला. छोटीशिवाय त्याला घरात वावरणे मुश्किल होत होते. छोटी लहानाची मोठी त्याच्याच मांडीवर झाली आणि आता भुर्रकन उडूनही गेली. त्यानं स्वतःला सावरत रखमालाही सावरले पण त्याचे कोरडे डोळे काही ओले झाले नाहीत. 

एका वर्षाच्या आत मुंबईला गेलेली छोटी पोटुशी होऊन घरी परत आली ती कायमसाठी. काहीच काम करत नसलेल्या छोटीच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून तिला मुंबईला नेले आणि नवलाईच्या दिवसांची मौज करून पैसे संपल्यावर छोटीला एका ठिकाणी घर कामाला लावले. लग्न न करताच छोटीच्याच पगारावर भाड्याने घर वसवले आणि काही दिवसांनी दुसऱ्याच मुलीशी लग्न करून छोटीला परत गावाला पाठवून दिले. छोटीने रडत रडत तिची कर्मकहाणी ऐकवली. तिचा जगण्यावरचा विश्वास उडाला होता. एकसारखी जीव द्यायच्या गोष्टी करत असे. पप्याने तिला खूप समजवून धीर दिला पण  एक दिवस छोटीने मोठा निर्णय घेऊन घराच्या मागच्या विहिरीमध्ये स्वतःचा जीव देऊन केलेल्या पापाचे प्रायश्चित घेतले. पप्या आणि रखमाच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पप्याच्या कोरड्या डोळ्यात दुःखाची झालर दिसली. पापण्या ओल्या न करता मनात रडण्याचे त्याचे कसब रखमाला जाणवले. 

त्याचे आतल्या आत रडणे, डोळ्यांत अश्रू न येणे, घुम्यासारखे वागणे ह्या गोष्टीतून त्याला बाहेर काढायचे रखमाने ठरविले आणि पप्याला एकदा तिने जवळ बसविले. मायेने त्याचा डोक्यात हात फिरवून कळकळीने बोलायला सुरवात केली ” पप्या राजा, का असा वागतोस. आता तरी तुझ्या भूतकाळातून बाहेर ये. मला माहित आहे तुझा लहानपणीचा काळ तुझ्या बापाने नासवला पण आता तो भूतकाळ आहे. झटकून टाक तुझ्या मानगुटीवरचे ते भूतकाळाचे भूत. झटकून टाक तुझ्या डोळ्यावरची झापडे. जरा उघडया डोळ्याने ह्या सुंदर जगाकडे बघायला शिक. ही  झोपडी म्हणजे जग नाही. बाहेर पडून जगाकडे नव्या नजरेने बघ. बाहेरचे जग खूप सुंदरआहे. त्या जगात खूप सुंदर, चांगल्या वर्तनाची माणसे ही आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेव आणि नवीन सुंदर आश्वासक असे तुझे भविष्य घडव. मनातले सगळे मळभ बाहेर काढ. आजपर्यंत मनात साचलेल्या अश्रूंना डोळ्यातून बाहेर पडायला वाट दे” आणि रखमाने रडत पप्याला जवळ घेऊन कवटाळले. पप्या रखमाच्या कुशीत शिरला आणि त्याच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला. पप्या रखमाला मिठी मारून खूप वेळ रडत होता. त्याच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबामधून त्याचा बापाचा दुस्वास आणि त्याने भोगलेले वाईट क्षण जे त्याच्या मनातल्या एका कोपऱ्यात दडी मारून बसले होते ते बाहेर पडत होते. रखमाच्या अंगावर शहारे आले. पप्याच्या डोळयातील पाणी अबोल होते पण ते खूप काही बोलत होते. त्याच्या मुसमुसून रडण्याच्या प्रत्येक हुंदक्यातून त्याच्या बापाने नासवलेला त्याचा भूतकाळ बाहेर पडत होता. आज तो खऱ्या अर्थाने मोकळा झाला होता. आज पप्याला नवीन जन्म मिळाला होता. पुढील सुंदर आयुष्य घडविण्यासाठी त्याचा आज पुनर्जन्म झाला होता.

—-समाप्त.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
4 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

सुंदर भावपूर्ण रचना