श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र- मी स्वप्न पाहिलं होतं ते फक्त कर्तव्यपूर्तीचं आणि कितीही यश आणि ऐश्वर्य प्राप्त झालं तरीही न उतण्या-मातण्याचं त्या स्वप्नाची पूर्तता हेच माझं जीवन ध्येय होतं आणि ते ध्येय साध्य झाल्याचं समाधान हीच माझ्या उर्वरित आयुष्याला पुरूनही उरुन राहील अशी कृतार्थता..!

मला मिळालेली ही स्वस्थताच माझ्या मुलाला उत्तुंग स्वप्ने पहात उंच झेपावण्यासाठीचं विस्तिर्ण आकाश देऊ शकली.)

पिढीनुसार फक्त परिस्थितीतच नाही तर मुलांच्या आचारा-विचारातही फरक पडत जातो. तसा तो माझ्या मुलाच्या बाबतीतही पडत असणारच हळूहळू. पण त्याचं संगोपन करत असताना,तो मोठा होत असताना, त्याच्या आचार-विचारातला फरक आम्हाला फारसा जाणवलाच नव्हता. आमच्या पिढीतल्या बऱ्याच आई-बाबांचे संपूर्ण व्यवधान, मुलांची संख्या मर्यादित असल्यामुळे असेल, पण त्यांच्या मुलांभोवतीच केंद्रित झालेले असे.त्यांच्या प्रत्येक हालचालीवर,  प्रत्येक निर्णयावर,प्रत्येक मतांवर त्यांच्या आई-बाबांना कांही ना कांही म्हणायचे असायचेच. मित्रांच्या गप्पात डोकावून आई-बाबा एखादं वाक्य जरी बोलले तरी त्यांच्या मुलांना ते रुचायचं नाही. मुलं मग त्यांच्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त करीत रहायची.पालक म्हणून मुलांच्या बाबतीतली जागरुकता कितीही आवश्यक असली, तरी त्यांच्या ‘स्पेस’मधे आपण अतिक्रमण तर करीत नाही ना याचे भान पालकांकडून बऱ्याचदा राखले जात नसे.यातील ‘स्पेस’ या शब्दाचा आणि अपेक्षेचा जन्म आमच्या सलिलच्या पिढीतलाच. आमच्या लहानपणी कुठल्याच वयोगटाची ‘ स्पेस ‘ ही गरज नसायचीच. तेव्हाची घरं म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’अशीच. खूप नंतर हळूहळू शेजारही ‘परका’ होत चाललाय, पण त्या काळी मात्र वाडा संस्कृतीतला शेजार एकमेकांच्या घरात घरच्या सारखाच वावरे.

या पिढीत त्यामुळेच असेल मुलं मित्रांमधेच जास्त रमतात. शिवाय मनातल्या बारीक-सारीक गोष्टीही मोकळेपणाने आई-बाबांशी नाही तर मित्रांशीच बोलून मन मोकळं करतात. आमच्याबाबतीत तरी हा प्रश्न कधीच येणार नाही असं आपलं आम्हाला वाटत होतं. कारण सलिल मित्रात रमायचा, त्याच्या मित्रांचं आमच्या घरी जाणंयेणं असायचं, तरीही तो आमच्याशीही मोकळेपणाने बोलायचा. पण त्यादिवशी मात्र आमच्यातला संवाद नकळत का होईना तुटत चाललाय का अशी एक पुसटशी शंका माझ्या मनात डोकावून गेलीच.सलिल सातवी- आठवीत असतानाची ही गोष्ट. रविवारचा दिवस होता.संध्याकाळ  होत आली तसे त्याचे तीन चार मित्र त्याला खेळायला बोलवायला आले. आमच्या घरासमोरच्या विष्णूघाटावरील ग्राउंडवर त्यांचा क्रिकेटचा ‘रियाज’ तासनतास चालायचा. रविवारीच नाही फक्त तर रोज संध्याकाळी. त्या दिवशी  हॉलमध्ये त्याच्या मित्रांच्या गप्पा रंगलेल्या. मी बाहेर जाण्यासाठी म्हणून हॉलमधे आलो तेव्हा सलिलच बोलत होता आणि तो मला पाहून बोलता-बोलता वाक्य अर्धवट सोडून कावराबावरा होऊन बघत राहिलेला. मी आपलं हसून दार उघडून निघून गेलो तरी माझं ते हसणं वरवरचंच होतं.’हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय का’ हीच अनाठायी शंका मनात ठाण मांडून बसलेली. मी परत येईपर्यंत टीम क्रिकेट खेळायला गेलेली होती. मी माझ्या मनातली शंका आरतीला बोलून दाखवली तेव्हा ती हसलीच एकदम.

” काही नाही हो. त्यांच्या त्यांच्या गप्पा असतात. आपण लक्ष नाही द्यायचं ”

” हो पण त्याने तरी लपवायचं कशाला?”

” त्यांची खेळाची नियोजनं असतात ती.किंवा इतर विषय. आपण प्रत्येक गोष्ट सांगत बसतो का त्याला. आवश्यक असेल तेवढंच सांगतो. हो ना? मुलांचंही तसंच असतं. त्याला सांगावसं वाटतं ते तो न विचारताही सांगतो.”

“अगं पण..”

“हे बघा, ‘तू कितीही वेळ खेळ पण अभ्यास झाल्याशिवाय मी टीव्ही बघून देणार नाही आणि झोपूनही देणार नाही हे लक्षात ठेव.’असं एकदा सांगितलंय न् तो ते करतोय. मग काळजी कसली?”

तिचं त्याच्यावर आवश्यक तेवढं लक्ष होतं म्हणून मी निश्चिंत असायचो. पण त्याचा दहावीचा रिझल्ट लागला आणि त्याची वकिली करायची जबाबदारी मोठ्या विश्वासाने त्याने माझ्यावरच टाकली. कारण वकिली करायची होती ती त्याच्या आईकडे..!

तोवर दहावीनंतर पुढे काय करायचं, कोणत्या साईडला जायचं, पुढे त्याने काय व्हायचं हे त्याला गृहीत धरून हिने मनोमन ठरवूनच टाकलेलं होतं. त्याला सायन्स आणि मॅथस् मधे खूप चांगले मार्क्स होते तसेच चारही भाषांमधेही. ‘ अवांतर वाचनाची आणि क्रिकेटची टोकाची आवड वर्षभर बाजूला ठेवून त्याने मी सांगते म्हणून अभ्यास एके अभ्यास केला असतान एक वर्ष भर, तर तो बोर्डातही आला असता’ यापेक्षाही आपला बोर्डातला नंबर थोड्याच मार्कात हुकल्याचं त्याला काहीच वाईट वाटत नाही याचं हिला वाईट वाटत होतं आणि रागही येत होता. तरीही काही न बोलता ती शांत होती.त्याने सायन्सलाच जायचं हे तिने ठरवलं होतं म्हणण्यापेक्षा गृहितच धरलेलं होतं. कारण चांगलं करिअर म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर हे सर्रास गृहीत धरलेलं असण्याचा तो काळ.त्यातून अनेक वर्षे शिक्षकी पेशात ती विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका  म्हणून कार्यरत.शाळेतले तिचे शिष्य प्रत्येक गोष्ट तिला विचारुन करायचे. त्यामुळे सलिलच्या बाबतीतला योग्य तो निर्णय तिने स्वतःशी घेऊन ठेवलेलाच होता. त्यात गैर असं कांही नव्हतंही.पण त्यामुळेच आज सलिलची वकिली तिच्याकडे करायची वेळ मात्र माझ्यावर आली होती. कारण त्याला सायन्सला जायचंच नव्हतं.

त्यालाही त्याचा म्हणून काही एक विचार आहे, त्याची काही स्वप्नं आहेत, हे मला त्याच्याबाबतीत जाणवलं ते त्यावेळी प्रथम.

“बाबा, तुम्ही सांगा ना आईला. ती तुमचंच ऐकेल. मला सायन्सला जायचं नाहीये. “

“मग कुठे जायचंय?”

“कॉमर्सला”

“कॉमर्सला ?”मला आश्चर्यच वाटलं.”कॉमर्सला का?”

“असंच”

त्याच ‘असंच ‘ हे उत्तर मला स्विकारता येईना.काय बोलावं तेही सुचेना.निर्णय घ्यायला एक दोन दिवसांचा अवधी होता. तोवर त्याची समजूत काढता येईल असा मी विचार केला.

“हे बघ,तुझी आई फक्त ‘आई’ म्हणून हे सांगत नाहीये. ती स्वतः टीचिंग लाईनमधे आहे. ती हे का सांगतेय ते तू नीट समजून घे आणि तुला कॉमर्सलाच का जायचंय हेही तिला पटवून दे. हवं तर माझ्यासमोर दोघं बोला. मी तुला शब्द देतो, तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही होऊ देणार नाही. पण शक्यतो आईला दुखवून काही करायला नको. हो की नाही?” माझ्यापेक्षा तो त्याच्या आईशी जास्त अॅटॅच्ड होताच. म्हणूनच तर त्याला तिला दुखवायला नको होतंच.त्यामुळे मी सांगितलेलं त्याला लगेच पटलंही.

त्यानंतरचा त्यांचा संवाद म्हणजे वाग्युद्ध नसलं तरी ‘वाद विवाद स्पर्धा’ नक्कीच होती. आणि अर्थातच कसलेला प्रतिस्पर्धी समोर असल्यामुळे हरला सलिलच.त्याचा तेव्हाचा कसनुसा चेहरा आजही मला आठवतोय.

“तुला सायन्स-गणित या विषयांमधे चांगले मार्क्स असताना सायन्सला न जाता कॉमर्सला जाणं माझ्या दृष्टीने तरी अनाकलनीयच आहे.”

“मला चारही भाषांत चांगले मार्क आहेतच की. सायन्स गणितात मी खूप अभ्यास केला म्हणून स्कोअरिंग झालंय.त्या विषयांचा मी आवडीने अभ्यास केला म्हणून नाही.”

“भाषांचा तरी अभ्यास मनापासून आणि आवड होती म्हणूनच केलायस ना ? मग आर्टस्  कां नाही?काॅमर्सच कां?”

“आर्टस् ला जाऊन करिअरचं काय ?”

“तुझं अवांतर वाचन चांगलं आहे. इतिहासाची तुला आवड आहे. तू इंग्लिश लिटरेचर मधे पोस्ट ग्रॅज्युएशन कर. एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षांची तयारी कर.”

“मला सरकारी अधिकारी होण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीय.”

“कॉमर्सला जाऊन तरी काय करणारायस? कुठंतरी नोकरीच ना?”

“आम्ही सर्व मित्र दांडेकर मॅडमशी बोललोय सविस्तर. नोकरी खेरीजही इतर अनेक संधी उपलब्ध असू शकतात. काय करायचं ते पुढचं

 पुढं बघता येईल.”

“पुढचं पुढं नाही.आत्ताच ठरवायचं. उद्या निर्णय चुकले म्हणून आयुष्यातील फुकट गेलेली वर्षं परत येणार नाहीयेत. तुझे मित्र कॉमर्सला जाणार म्हणून तू कॉमर्सला जातोयस हे मला पटत नाही.”

“मित्र जातायत म्हणून मी जात नाहीयेss” सलिल रडकुंडीलाच आला ” बाबाs.., तुम्हीतरी सांगा ना हिला. मला क्रिकेट खेळायचंय. ट्रेकिंगला जायचंय.ते सगळं मनापासून करून मी अभ्यास करणाराय. मग न आवडणाऱ्या विषयांच्या अभ्यासाचं ओझं मी कां म्हणून वाढवून घ्यायचं ?”

“तुला दहावीपर्यंतच्या अभ्यासात कॉमर्सचा एकही विषय नव्हता.ते विषय आवडतील हे गृहीत धरून तू कॉमर्सला जाणार. उद्या ते विषय नाही आवडले तर..? मग सगळंच अधांतरी.”

सलिल निरुत्तर झाला. केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात राहिला. मी त्याला नजरेनेच दिलासा देऊन शांत करायचा प्रयत्न केला पण आपले भरून आलेले डोळे लपवत तो उठून त्याच्या रुममधे निघून गेला.आरती अस्वस्थच.

“तुम्ही तरी सांगा, समजवा ना हो त्याला.”

“मी बोलतो त्याच्याशी. समजावतो त्याला.पण कॉमर्सच्या विषयात न आवडण्यासारखं काही नसतं हे माझ्या अनुभवावरून मी तुला सांगतो. तो शहाणा आहे. समंजस आहे. त्याच्या मनाविरुद्ध काही करायला नको एवढं लक्षात ठेवू या. अखेर आयुष्य त्याचं आहे. आपण आपली मतं सांगू.तो घेईल त्या निर्णयाला मनापासून पाठिंबा देऊ.”

तिलाही हे पटलं असावं.पण कळलं तरी वळायला मात्र दुसरा दिवस उजाडावा लागला.

त्या रात्री सलिलला बाहेर घेऊन जाऊन मी त्याच्याशी सविस्तर बोललो. तुला क्रिकेट मधेच एवढा इंटरेस्ट आहे, तर त्यात करिअर कर. फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर क्रीडा पत्रकार विश्लेषक अशा अनेक संधी त्याही क्षेत्रात असतील असंही त्याला सुचवलं.

“बाबा, खेळाकडं मी करिअर म्हणून नाही तर आवड म्हणून बघतो. खेळ, ट्रेकिंग, अवांतर वाचन हे फक्त आवड म्हणूनच मला जपायचंय. मी कोणतंही करिअर केलं तरी या सगळ्या आवडी रिलॅक्सेशन म्हणूनच मला जपायच्यात”

त्याचा निर्णय ठाम होता.

“मी आहे तुझ्याबरोबर. अर्थात तुझ्या आईच्या गळ्यात घंटा बांधायचं काम मात्र तुझं. ती तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही. तू निश्चिंत रहा “

तो हसला. त्याने होकारार्थी मान हलवली. आम्ही घरी आलो.

“मग काय ठरलं?”आरतीने उतावीळपणे विचारलंच.

“आज रात्रभर विचार करतो. उद्या सकाळी नक्की सांगतो ” सलिल शांतपणे म्हणाला.आमचं बाहेर बोलणं झालं तेव्हा तो स्वतःशीच हसला तेव्हाच त्याने आईचं काय करायचं ते मनाशी ठरवलेलं आहे  हे मी ओळखून होतो. काय ठरवलंय याबद्दल मात्र मलाही उत्सुकता होतीच.

दुसऱ्या दिवशी सकाळी चेहऱ्यावर नाराजी घेऊन तो किचनमधे घुटमळत राहीला.

“आई,…”आई वाट पहात होतीच. ” आई,मी तुझ्या मना विरुद्ध काहीही करणार नाहीय.तू म्हणतेस तशी मी सायन्सला ऍडमिशन घेतो. अभ्यासही चांगला करतो.” मी आश्चर्याने पहातच राहिलो. तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद. पण सलिल गंभीरच होता..”..पण, कोणत्याही कारणाने मी नापास झालो तर मात्र तू मला दोष द्यायचा नाहीस.” तो बोलला आणि चोरट्या नजरेने माझ्याकडे पहात बाहेर निघून गेला.आरती हतबुद्ध होऊन फक्त पहात राहिली.

” बघितलंत ना? हा असला अधांतरी आज्ञाधारकपणा काय कामाचा?”

” त्याने पडतं घेतलंय ना?

झालं तर मग “

“व्हायचंय काय? उद्या तो खरंच नापास झाला तर तुम्ही दोघेही दोष देणार मलाच. नकोच ते. होऊ दे त्याच्या मनासारखं. पण तरीही मी त्याला बजावून सांगणाराय. कॉमर्सला जा पण क्रिकेट खेळत आणि बाहेर उंडारत कशीबशी डिग्री मिळवलीस तर मला चालणार नाही.त्या क्षेत्रातली उच्च डिग्री मिळवण्याची तयारी असेल तरच मी मान्य करीन. नाहीतर सायन्सला जाऊन नापास झालास तरी चालेल” तिने तसे स्पष्ट शब्दात त्याला बजावलेही. आणि त्यानेही ते मान्य केले.

आता कसोटी सलिलची होती.त्या कसोटीला तो पुरेपूर उतरला.सीए करता करता बरेच विषय आणि अभ्यासक्रम सारखाच आहे हे लक्षात घेऊन त्याने एम्.काॅमसुध्दा पूर्ण केले.तेही  डिस्टिंक्शनमधे.सीएची परीक्षा बुद्धी न् हुशारी इतकीच

चिकाटीचीही परीक्षा घेणारी.पण सीएही त्याने फर्स्ट अॅटेम्टलाच यशस्वीपणे पूर्ण केले. त्याच्या बरोबरीचे एक-दोन मित्रही सीए झाले. ते मल्टिनॅशनल कंपनीत हाय पॅकेजवर रुजूही झाले. सलिलने मात्र स्वतःची प्रॅक्‍टिस सुरू करण्याचा निर्णय घेतला.

योग्य वेळ आल्यावर मोकळेपणानं तो आमच्याशी जे बोलला, त्यातून त्यांचे स्वप्न न् आयुष्याकडे पहाण्याचा त्याचा नेमका दृष्टिकोन स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला होता.

‘मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करून स्वतःच्या बुद्धीचा उपयोग दुसऱ्याच्या फायद्यासाठी करू देण्यापेक्षा त्याच बुद्धीचा उपयोग करून मी स्वतः प्रॅक्टिस केली तर इतर स्थानिक गरजूंनाही त्यांची आयुष्यं उभी करायला मी मदत करु शकेन. मल्टीनॅशनल कंपन्यातील पगाराइतका आर्थिक लाभ मला प्रॅक्टिस सुरू केल्याबरोबर मिळणार नाही याची मला कल्पना आहे. पण कांही वर्षातच माझ्या व्यवसायात स्थिर होऊन मी माझं आयुष्य त्या सर्वांपेक्षाही अधिक अर्थपूर्ण रितीने जगू शकेन आणि तेच माझं ध्येय आहे.पुण्यामुंबईल्या हाय पॅकेजसाठी मला पहाटपासून स्वतःला चरकात पिळून घ्यायचं नाहीय..’ हे त्याचे विचार स्वतःच्या आयुष्याचा त्याने किती खोलवर विचार केलाय याचेच निदर्शक होते.

“बाबा, मी आपल्या सर्व कुटुंबाची आर्थिक जबाबदारी अजून किती महिन्यांनी घ्यावी असं तुम्हाला वाटतं..?”प्रॅक्टिस करायचा निर्णय घेतल्यानंतर त्याने मला विश्वासात घेऊन विचारलं होतं.

“गरज म्हणशील तर तू कधीच नाही घेतलीस तरी चालू शकेल.तेव्हा त्याचे दडपण नको. केवळ पैशासाठी व्यवसायवृद्धी करायची तर तत्त्वांशी तडजोड करावी लागेल.ते यश तात्पुरतं समाधान देणारं असेल.तुझे हे क्षेत्रही निसरड्या वाटांचेच आहे हे लक्षात ठेव. चार पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण तोल जाऊ देऊ नकोस.एरवी तुझं भलंबुरं तू जाणीवच.” मी त्याला सांगितलं होतं.

आज प्रॅक्टिस सुरू करून पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे. त्याने फक्त सधनताच नाही तर निखळ यश आणि नावलौकीकही मिळवलाय. आज जवळजवळ वीस कर्मचारी असलेलं त्याचं ऑफिस माझ्या अभिमानाचा विषय आहे.त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक लाभ देत व्यवसायवृद्धीतला योग्य वाटा तो न मागता त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. अनेक सामाजिक उपक्रमांशी त्याने स्वतःला जोडून घेतलेय. सूनही कर्तबगार आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलावर तिचीही खंबीर सक्रिय साथ त्याला मिळते आहे.

माझ्या बाबांच्या आणि माझ्या आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांना तिलांजली न देता तीही स्वप्ने मुलासुनेने स्वतःच्या स्वप्नांशी जोडून घेतलेली पहायला मिळणं यापेक्षा आमच्यासाठी वेगळी कृतार्थता ती काय असणार..?

हे होतं स्वप्न. माझं..,माझ्या बाबांचं न् माझ्या मुलाचं. त्या स्वप्नांचा हा मागोवा. पिढी बदलेल तशी परिस्थितीनुसार स्वप्नेही वेगळी. पण तिन्ही पिढ्यात स्वप्नांइतकाच त्यामागचा विचारही महत्त्वाचा. पिढी बदलते तसे विचारही बदलतात. पण त्यामागची भावना तितकीच निखळ असते याचेही हा मागोवा एक निदर्शक म्हणता येईल. आमची तिघांचीही आयुष्यं आणि स्वप्नेही त्या त्या पिढीचं सर्वार्थाने प्रतिनिधित्व करणारी नसतीलही कदाचित. तरीही वैयक्तिक संदर्भ थोडेफार वेगळे असले तरी भू बरंमिका मात्र जवळपास अशाच असतील याची मला खात्री आहे.

पूर्णविराम

 ©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments