श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात  आपण पहिलं – `नाग नाही, नागीण आहे. बहुतेक कात टाकणारे…त्यामुळेच तिची गती संथ झालीय. नाही तर आतापर्यंत सगळ्या वाड्यात फिरून आली असती. ‘ पहिल्या नोकराने विस्तृत माहिती दिली. आता इथून पुढे )

`मग तुम्ही लोकांनी तिला घेरून मारलं का नाही?’

`अरे बाबा, हे लोक सापाला मारत नाहीत ना! त्यांच्याकडे तर नागदेवतेची पूजा केली जाते.’

`मग तुम्ही लोक एवढ्या जाड जाड लाठ्या घेऊन का उभा राहिलाय?’ रमलूनेविचारले.

`शेठजीम्हणाले, त्यावर लक्ष ठेवा, नाही तर कुठे घुसेल, कुणासठाऊक!’

`मग आता कुठे आहे?’

`त्या कोपर्‍यात पुस्तकांच्या कपाटाखाली वेटोळं घालून बसलाय.’

रमलूला आपल्या वडलांची आठवण झाली. साप पकडण्याचं चांगलंच कसब त्यांच्याकडे होतं. अनेकदा त्यांच्या`साप-पकड- अभियानात रमलूदेखील सहभागी व्हायचा.

रमलूने डोळे मिटून भोळ्या शंकराचं स्मरण केलं. त्याचे वडील तसंच करायचे. मग म्हणाला, `एक मोठा माठ आणा आणि एक चांगलं मजबूत कापड. माठाच्या तोंडावर बांधण्यासाठी…. तुझा हा पंचासुद्धा चालेल.’ त्याने एका नोकराच्या खांद्यावरचा पंचा घेऊन आपल्या गळ्याभोवती लपेटला. मगत्याने ४-५ फूट लांबीची काठी घेतली आणि तो खोलीत शिरला. त्याने कपाटाला थोडासा धक्का देताच सापाने एक फुत्कार टाकला आणि तो सर्रकन बाहेर आला.

दरवाजाशी उभा असलेला एक नोकर ओरडला, `रमलू सावध राहा रे बाबा!’ दुसरा म्हणाला, लक्ष ठेव साप उसळी मारून, उलटा होऊनसुद्धा चावतो. ‘

रमलू अधीक सावध झाला. खोलीत लावलेल्या गुळगुळित टाईल्समुळे सापाला वेगाने सरकता येत नव्हतं. तो भिंतीच्या कडेने दरवाजाच्या दिशेने सरपटू लागला. रमलू सावधपणे पुढे झाला आणि लाठीचं टोक सापाच्या मानेपाशी पूर्ण ताकदीने दाबलं आणि उजव्या हाताने त्याची शेपटी मजबुतीने पकडून झटकन त्याला उलटं पकडलं. साप रमलूपेक्षा एखदा फूट जास्तच उंच होता. सापाला सावधपणे पकडून रमलू अंगणात आला. शेठजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी साप पाहिला, तेव्हा त्यांचे डोळे विस्फारलेच. तर्‍हेतर्‍हेच्या चर्चा सुरू झाल्या. या दरम्यान रमलूच्या इशार्‍यानुसार नोकर मोठं मडकं घेऊन तिथे आला. रमलूने सापाला मडक्यात सोडलं आणि पापणी लवायच्या आतआपल्या गळ्यातला पंचा काढून मडक्याचं तोंड बांधून टाकलं. सापाच्या अस्वस्थपणामुळे हलणारं मडकदेखील वाड्यातील लोकांच्या मनात भीतीचे शहारे उठवायला पुरेसं होतं. इकडे रमलूचं सारं शरीर पानाप्रमाणे थरथर कापत होतं. घामाने न्हाऊन निघाला होता रमलू. त्याने कोणत्या खुबीने सापाला कैद केलं, त्यालाच कळलं नव्हतं. शरीराची थरथर थोडी कमी झाली, तेव्हा घामाने ओला चिंब झालेला आपला सदरा काढला. पिळला आणि त्याने आपला देह पुसू लागला. शेठजी हे सगळं बघत होते. ते पुढे झले आणि रमलूला म्हणाले, `आज तू अगदी तुझ्या वडलांप्रमाणे बहादुरीचं काम केलंस. मी त्यांना साप पकडताना पाहिलं होतं.’

रमलूची बोलतीच बंद झाली होती. मोठ्या मुश्किीलीने त्याच्या कंठातून शब्द फुटले, `शेठजी, आता मला निघायला हवं. अंधार होण्यापूर्वी याला जंगलात सोडायला हवं. मुकादमांना, मला झोपडीपर्यंत पोचवायला सांगा.’

`झोपडीत जाऊन काय करणार? मुकादम थेट जंगलापर्यंत तुला घेऊन जाईल.’

`झोपडीत जाऊन मटक्याला शेंदूर लावायला लागेल. आम्हीदेखील सापाची पूजा करतो. पूजा झाल्यावर जंगलात सोडून येईन.’

`तुझे वडीलसुद्धा असं सगळं करत होते?’

`हो!’

`ठीक आहे. तू म्हणशील, तिथे मुकादम तुला सोडून येईल.’ शेठजींनी हाक मारली. एका क्षणात तिथे मुकादम हजर झाला. रमलूने माठ उचलला आणि मोटारसायकलच्या दिशेने निघाला. शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा काढून रमलूच्या खिशात ठेवत म्हंटलं, `हे तुझं इनाम’

`माफ करा शेठजी, या कामासाठी कोणतंही इनाम घेतलं जात नाही. माझ्या वडलांनी शेकडो साप पकडून लोकांची सुटका केली होती. पण कधी कुणाकडून एक पैसासुद्धा घेतला नाही.’

`तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’

भाग 2 समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments