☆ जीवनरंग : लोककथा- उंट आणि माणूस.. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

एका दूर दूरच्या वाळवंटी प्रदेशात कुठेही पाणी नव्हतं तरी माणसे तिथे रहात होती.  वाळवंटातल्या प्राण्यांना पाणी कसे मिळवायचे आणि साठवायचे हे माहीत होते,  माणसं त्यांच्या मागावर जायची,  त्यांनी साठवलेलं पाणी तर प्यायचीच वर त्यांना भूकेला मारूनही खायची. एक भल्या उंटाने एका थोड्या कमी दूष्ट माणसाला त्याबाबत छेडले.. तेव्हा  तो कमी दूष्ट माणूस म्हणाला… “माणसं आळशी असतात रे!  शिवाय मूल्याशिक्षण वगैरे घेऊनही ती मूल्ये हवी तेव्हा धाब्यावर बसवतात.” तो भला उंट त्या कमी दूष्टाच्या  ज्ञानाने थक्क आणि अवाक् झाला.  त्यावर तो माणूस म्हणाला शिवाय माणसांना उपकार केल्याची फेड कशी करून घ्यायची हे ही चांगले कळते.  आता मी तुला एवढे ज्ञान दिले त्या बदल्यात मला पाण्याचा साठा दाखव.   उंटाला वाटले बरोबरच आहे,  याला पाणी दाखवणे त्याचे कर्तव्यच आहे असे समजून तो त्या कमी दूष्टाला पाठीवर घेऊन पाण्याकडे निघाला. थोड्याच वेळात तो माणूस पेंगुळला आणि झोपीही गेला.  इकडे हा उंट बिचारा चालतोय… चालतोय… त्याला वाटेत भेटलेल्या जवळ जवळ सर्वांनीच माणसाला पाण्याचा साठा दाखवू नये,  असा सल्ला दिला परंतू उंट बिचारा उपकाराच्या ओझ्याने एवढा दबून गेला की कोणाचे काही न ऐकता तो आपला चालतोय… चालतोय..जसा पाण्याचा साठा जवळ आला तशी माणसालाही जाग आली.  तो उंटावर खूप रागवला… “अरे किती लांब आलोय आपण, मूर्ख! शोधत बसतील ना सगळे मला! ” उंटाची ट्यूब थोडी उशीरा का होईना पेटली.  पण माणसाशी पंगा कशाला घ्या,  म्हणून तो शांतपणे म्हणाला, ” पाणी हवं असेल ना तेव्हा थोडा काळ तरी सग्यासोय-यांचा विरह होणार. ”  शिवाय परत जातानाही तुम्ही झोपणार त्यामुळे पाण्याची वाट तुम्हाला कळणार नाही,  त्यामुळे फक्त आतापुरती तहान भागेल एवढे पाणी पिऊन घ्या!  पुन्हा तहान लागली तर आणखी काही  ज्ञानकण ओता….

आता परतफेड करण्याची पाळी माणसाची होती!

© डॉ. मंजुषा देशपांडे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

बोधप्रद कथा????