सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग ३  ☆ सुश्री सुमती जोशी ☆

“काय गं तू मला हाका मारत होतीस का?” नंदिता हळूच बेडरूममध्ये डोकावली. तिला पाहून शुकताराचं अवसान गळालं. रडत रडत ती म्हणाली, “कंबरेच्या दुखण्यामुळे मी आज आडवी झालेय. मला हलताही येत नाहीय आई.”

“आज पाखीला रंगीत तालमीला कोण घेऊन जाणार?” हुंदके देत शुकतारा विचारू लागली, “तुला ते जमणार नाही. तिला घेऊन जाणारं मला कोणी भेटलं नाही.”

नंदितानं क्षणभर विचार केला. भीत भीत म्हणाली, “पाखीच्या याच नाचावरून तुझा जावयाशी खटका उडाला होता, हे मला माहितेय. ऑफिसमधून ताबडतोब निघून पाखीला पोचवून येऊ दे त्याला! चंद समंजस आहे. मी सांगते त्याला.”

शुकताराला थोडा धीर आला. चंद्रोदयला फोन करून तिनं आपली असहाय्यता सांगितली आणि विचारलं, “काय हो, तुम्ही येऊ शकाल का?”

“येऊ शकेन. आलोच.” चंद्रोदयनं शांतपणे उत्तर दिलं.

“प्लीज आणखी उशीर करू नका. ताबडतोब बाहेर पडा.”

शुकतारा रडू लागली. नंदितानं पाहिलं, एवढया गोंधळातही नात गाढ झोपली होती.

——————————————————————————–

शाश्वतीदी ग्रीनरूममध्ये कोणालाच येऊ देत नव्हत्या. लहान, मोठया, मध्यम वयाच्या मिळून पन्नासएक मुली ग्रीनरूममध्ये होत्या. त्यात भर म्हणून पालकांनी आत जायचा प्रयत्न केला तेव्हा गोंधळ उडाला. शाश्वतीदींनी योग्य निर्णय घेतलाय असं शुकताराला वाटलं. अपाला नावाच्या एका विद्यार्थिनीवर त्यांनी या चिल्ल्यापिल्ल्यांची जबाबदारी सोपवली होती.  बहुतेक जणांच्या हातात कॅमेरा किंवा हँडीकॅम होता.  चंद्रोदयला कसलाच ताण वाटत नव्हता. नवीन कपडे घालून नटलेल्या लहानग्या पाखीला बघायला तोही डिजिटल कॅमेरा घेऊन सज्ज होता.

अस्वस्थ पालकांच्या गर्दीतून वाट काढत रेणू बाहेर आली. तिच्याबरोबर तिचे पती होते.

शुकताराने चंद्रोदयची ओळख करून दिली. नाचाच्या कालासमध्ये कधी न गेल्यामुळे त्याला कोणीच ओळखत नव्हतं. आज चंद्रोदय आला होता. शुकतारासाठी हा भाग्ययोग होता. गेल्या आठवडयात पाखीला याच मंचावर पोचवायचं आणि रंगीत तालीम झाल्यावर घरी आणण्याचं काम चंद्रोदयने मोठया निष्ठेनं केलं होतं. पाखीला घरी घेऊन येण्याआधी तो शाश्वतीदींना भेटला. शुकताराच्या पाठदुखीविषयी त्यांना सांगितलं. मग म्हणाला, “या लहान मुलींचा  इतके वेळा सराव करून घेता, शिवाय रंगीत तालीम ठेवता हे त्रासदायक आहे. त्यात हा उकाडा! पोरी आजारी पडल्या नाहीत म्हणजे मिळवलं.” त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत शाश्वतीदी म्हणाल्या, “मुली आजारी पडणार नाहीत. उलट रिद्धीच्या आईप्रमाणे त्यांचे आई-बाबाच आजारी पडतील. मुलांकडून काही करून घ्यायचं तर खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्या मुलीनं स्टेजवर यावं असा पालकांचा हट्ट असतो आणि तो आम्हाला पूर्ण करावा लागतो. तसं बघायला गेलं तर आमची आणि मुलींची अवस्थाच दयनीय असते.”

शाश्वतीदींपाशी जात चंद्रोदय म्हणाला, “आपण ही चर्चा आता थांबवू या आणि आत जाऊ या.”

ते सर्वजण आत गेले, पण एकत्र बसले नाहीत. शुकतारानं नंदिताला मधल्या रांगेत बसवलं होतं. सगळ्यांच्या ओरडया आरडयामुळे हॉलमध्ये गोंधळ उडाला होता. शुकतारा पॅसेजजवळच्या सीटवर बसल्यावर कृष्णा धावत तिच्यापाशी आली आणि विचारू लागली, “मुलींच्या नाचात कितीजणी आहेत, माहितेय का तुला?”

“छे! मला काहीच माहीत नाही.”

“मी ऐकलंय की तीस मुलींना घेतलंय. फार गडबड झालेली दिसतेय. तुला काय वाटतंय?”

गालातल्या गालात हसत शुकतारा म्हणाली, “ते सगळं जाऊ दे. तुझ्या माझ्या मुलीला एक चांगली संधी मिळालीय हे महत्वाचं. दुसरा काही विचार आता करू नकोस.”

कृष्णाचं समाधान झालं. ती आपल्या जागेवर परत गेली. दोन मिनिटात ‘नुपूर निक्कण’ या नाचाच्या क्लासचा वार्षिकोत्सव सुरू झाला. चंद्रोदयनं घडयाळात पाहिलं. कार्यक्रम सुरू करताना नानाविध कारणांनी उशीर होतो पण आज फक्त चार मिनिटांचा उशीर झाला होता. कार्यक्रमाची सुरुवात वेळेवर करून शाश्वतीदींनी पालकांना चकित केलं होतं.

गुरुवंदनेनं सुरुवात झाली. रंगमंच व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, संगीत सगळं ठाकठीक होतं. निष्ठापूर्वक आणि योजनाबद्ध व्यवस्था केल्याचा ठसा सगळीकडे उमटला होता. चंद्रोदयला समाधान वाटलं.

श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ या बंगाली कथेचा भावानुवाद

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments