डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शाळा” – श्री मिलिंद बोकील ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

“शाळा” हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अनेकांकडून त्याची भरभरून स्तुती झाली. म्हणून मी आवर्जून तो बघितला. पण मला काही तो फारसा रुचला नाही. तोपर्यंत मी पुस्तक वाचले नव्हते. पण तेवढ्यातच माझ्या साहित्यिक मित्राने या चित्रपटावर व पुस्तकावरही खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि मी आधी जाऊन हे पुस्तक खरेदी केले.

पुस्तक वाचू लागले आणि मग मला चित्रपटातील संदर्भ उलगडत गेले. बऱ्याचदा असे घडते की एखादे पुस्तक आपण वाचलेले असते आणि आपल्या कल्पेनेतून त्या पात्रांची निर्मिती केलेली असते. त्यामुळे त्यावर तयार केलेली कलाकृती आपल्याला भावतेच असे नाही. पण ‛शाळेच्या’ बाबतीत माझा उलटा प्रवास होता. तरीही मला पुस्तकच जास्त भावले , कारण त्यातील वातावरण, व्यक्तिरेखा लेखकाने ठळकपणे मांडल्या आहेत. वेळेचे किंवा शब्दांचे बंधन नव्हते . त्यामुळे मुकुंदाचे भावविश्व सहज उलगडले गेले आहे.

खरे तर हे पुस्तक म्हणजे मुकुंद आणि त्याच्या मित्रांचा पौगंडावस्थेतील भावभावनांचा प्रवास आहे. आत्ताच्या भाषेत आणि आत्ताच्या काळाला अनुसरून  म्हणायचे झाले तर “ first crush” ही रुढ झालेली आणि कौतुकाने मिरवली जाणारी  संकल्पनाच लेखकाने यात मुकुंद, सुऱ्या, चित्रे, फावड्या यांच्या माध्यमातून मांडली आहे. त्या अर्धवट वयातील त्यांचे अपरिपक्व विचार, संकल्पना, मस्ती याचे चित्रण यात आहे. सुऱ्याने केवड्याला प्रपोज करणे आणि त्यातून घडलेले रामायण! त्या प्रसंगात मुकुंदच्या वडिलांनी दाखवलेला संयम एक आदर्श पालक   आपल्यासमोर उभा करतो.

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मांडली गेलेली ही कथा आहे. म्हणजेच साधारण ७० ते ८० च्या दशकातील! त्यामुळे त्या काळातील सामाजिक, राजकीय संदर्भ देत लेखकाने कथानकाला कुठेही धक्का न देता वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय यातील प्रत्येक पात्र वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातील आहे. त्यामुळे त्यांना घरातून मिळणारे संस्कार पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणूनच मुकुंद जरा चलबीचल झाला तरी पुन्हा झटून अभ्यास करतो आणि परीक्षेत सुयश प्राप्त करतो.

वास्तविक  त्या वयात असणाऱ्या सर्व मुलामुलींच्या आयुष्यात घडणारे हे सर्व प्रसंग आहेत. फक्त स्थळ- काळात थोडा बदल असेल. कालानुरूप प्रसंग, संदर्भ थोडे बदलत असतील. पण सर्वांनीच अनुभवलेले हे भावविश्व या पुस्तकात मांडले गेले आहे. जणू काही आपलेच अनुभव वाचत असल्यासारखे वाटते. म्हणूनच सर्वांनी एकदा तरी वाचले पाहिजे असे हे पुस्तक आहे.

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments