☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कविता संग्रह – “मृगजळाकाठी” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

पुस्तकाचे नांव : कविता संग्रह – मृगजळाकाठी

लेखिका : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन

प्रथम आवृत्ती : २७फेब्रुवारी २०१७

किंमत : रु.१००/—

श्रीमती उज्ज्वला केळकर

मृगजळाकाठी विसावण्यापूर्वी  थोडं कवियत्री सौ. ऊज्वला केळकर यांच्याविषयी..

ऊज्वलाताई या हाडाच्या शिक्षीका. मुख्याध्यापक पदावरुन आता निवृत्त असल्या तरी विद्द्यार्थांमधे असलेला प्रचंड ऊत्साह आजही त्यांच्यात टिकून आहे.

विवीध साहित्य प्रकारातील आणि अनुवादित अशी जवळ जवळ साठाच्यावर त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.चंद्रपाखीची वाट नंतर “मृगजळाच्या काठी ” हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.  या संग्रहातील कविता सहा विभागात वाचायला मिळतात.

सर्व कविता मुक्तछंद, छंदोबद्ध, कणिका, हायकु या काव्याप्रकाराच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आहेत..

त्यांच्या सर्वच कविता भावना, बांधीलकी आणि विचारांनी समृद्ध आहेत.कqविता वाचताना, निसर्ग प्रेम, संवेदनशील मन, वैचारिक दृष्टीकोन,शब्द आणि भाषेवरील प्रभुत्व, प्रामुख्याने जाणवते. कल्पकता आणि मन:चक्षुने रेखाटलेली शब्दचित्रे कवितेतून जाणवतात. मनाला भिडतात, आनंद देतात.

“गंध गाभार्‍या तळी” या विभागातल्या निसर्ग कविता सृष्टीची विवीध रूपे उलगडतात. पानगळ, शिशीरऋतु च्या रुपाशी आपलं भावुक नातं जुळतं. “अवलिया” च्या,  रुपात

एक व्यक्ती म्हणूनच, शिशीर ऋतु ऊभा ठाकतो.

भरली झोळी फकीर गेला

धुळीमातीची विभूती लावूनी

मलीनधुक्याचे लक्तर लेऊन

सृष्टी बसली भणंग होऊनी…

अवलिया येतो, गळलेली पानेफुले झोळीत भरतो, त्याच्या येण्यानं सृष्टी धुळकट,ओकीबोकी, रूक्ष बनते. वाचता वाचताच जाणवते हा अवलिया दुसरा तिसरा कुणी नसून

साक्षात शिशीर ऋतुच.कवियत्रीच्या कल्पनेला,मन मग भरभरून दाद देतं….

“सांज सजे अलबेली रात काळोखी..”

या विभागातून रात्रीची अनेक रुपे डोळ्यासमोर येतात. रात्र.. कुणाची अशी तर कुणाची कशी..

“सांज सजे अलबेली..कुणी हिला नादावली..”

किंवा

“चंद्र नकली,चांदण्याही चांदव्याला टांगुन आले”

 नाहीतर…

“रात्र लडिवाळ.गोष्टीवेल्हाळ..”

रात्र..”मृतवत् जीवनात प्राण फुंकणारी..”

रात्र.चंद्रबनातून अलगद ऊतरणारी…”

“चंचल,मद् होश नटनारी रात्र…”

अशी, कधी व्याकुळ, वेदनादायी, प्रेममयी, कुटील कारस्थानी रात्र या काव्य पंक्तीतून आपल्याही जाणीवांना टोकरते….कविता आणि कवियत्री एकरुप झाल्यासारख्या वाटतात.

“पाऊस,रानातला..अंगणातला..मनातला..कवितेतला..”

या विभागात वाचक पावसात चिंब भिजतो.. पावसाविषयीच्या विवीध भावना…पाऊस हवा,पाऊस नको..पाऊस लडीवाळ, बालीश..ऊदास नाहीतर वादळी..

कवियत्रीचं मन पावसाशी गप्पा मारतं. रागावतं, भांडतंही. नव्हे धिक्कारही करतं!!

“घन ओंबून आले ।क्षण माथ्यावर झुकले। परि न बरसले….”

“पाऊस ऊरी जपताना।कोसळे भिंत भवताली।

मोकळ्या स्तनांवर झुकली ।घनगर्द तुझी सावली।

ऊज्वलाताईंच्या या काव्यातले हे टपटपणारे शब्द

मनातल्या बोथट बीजांना अंकुर फोडतात..

“कविता तुझ्या माझ्या..त्याच्या तिच्या…”

या विभागात नाती ऊलगडतात..” स्त्री आणि पुरुष यांच्यामधील आर्त,स्वप्नाळु,ओढाळ,सैल घट्ट भावनाविष्कार या कवितांतून जाणवतात.

“प्रवाह” ही कविता काहीशी रुपकात्मक वाटते.

वादळ आणि झाड यांच्यातील हा संवाद आहे. धडका देणारं वादळ आणि झाडांची रुजलेली मुळं.. एका परिपक्व नात्याचेच महत्व सुंदरपणे ऊलगडत जाते.

“तुझ्या प्रवाहावर झोकून देणं कसं घडेल?

त्यापेक्षा तूच आवर ना तुझा आवेग..!

या थोड्याच शब्दांत केव्हढा मोठा आशय!!!

“व्रतोत्सव “या विभागात जगण्याचं व्रत घेतलेल्या माणसांच्या कविता आहेत..

“तूही पेटव तुझ्या अंतरात

एक आशेची शलाका

जी ऊजळून टाकेल

काळजात कोंडलेले

शाश्वत नैराश्य…आणि करील तेजोमय अवघे प्राण..

सकारात्मक विचार जणु जगण्यास बळ देतात.जगणं फुलवतात…

आपल्या एकाकीपणाकडेही तटस्थपणे पाहताना, कवियत्री म्हणते,

मीच दिलेल्या शस्त्रांनी ।

माझे बंध तोडून!

मीच दिलेल्या ऊंटावर।

मीच दिलेले जवाहर लादून।

सारे गेले निघुन।

मला एकाकी टाकून…।।

तेव्हां जाणवतो जगातला पोकळपणा..धूसर खोटेपणा..

“अनुवादित कविता” हा शेवटचा विभाग. यात मान्यवर हिंदी कवींच्या अनुवादित कविता आहेत.

आपल्याला आवडलेलं रसिकांच्यात वाटावं, या समृद्ध भावनेतून केलेली ही पुरवणी. ऊत्कृष्ट विचारांचं ऊत्कृष्ट भाषांतर.

घनश्याम अग्रवाल यांची अनुवादित,”देशभक्तीची कविता..” मनाला भिडते. देशभक्तीची एक नवीनच सापडलेली व्याख्या थक्क करते.कविता दूर सरहद्दीवर असते

डबडबलेल्या डोळ्यांनी बघते

विचार करते

जितकं दु:ख वेदना इथे आहे

तितकच दु:ख वेदना तिथेही आहे..

कवितेसाठी तहान लागली असता

स्वत:ला पिणं, म्हणजे देशभक्ती

कुणा दुसर्‍यामधे

 स्वत:ला ढाळून जगणं

म्हणजे देशभक्ती….

कविता किती निस्पृह मनातून आलेली असते याचाच वस्तुपाठ हे शब्द देतात.

“मृगजळाकाठी..” या कवितासंग्रहावर लिहीताना एक सांगावसं वाटतं की मूळात हे शीर्षकच किती बोलकं आहे..अस्तित्वातच नसलेल्या भासमय गोष्टी मिळवण्यासाठी आपण अव्याहत धडपडतो…पण जे स्वप्नांत असतं ते कवितेत मात्र गवसतं..आकारतं.. आणि मग त्या मृगजळाकाठी आपली आनंददायी सैर घडते… कविता वाचतांना त्या काव्याची ,कवीच्या मनातली पार्श्वभूमी आपल्याला अवगत नसली तरीही आपल्या मनांत विवीध अर्थ उलगडतात आणि त्यातच आपण डुंबतो…तरंगतो..हे तरंगणं म्हणजेच काव्याचं यश…

ऊज्वलाताई या कवितांतून हा अनुभव देतात,म्हणूनच हा कवितासंग्रह वाचनीय आहे असे मी खात्रीपूर्वक म्हणू शकते..

माझ्या आनंदातले काही कण आपणही वेचावेत….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments